एकनाथ शिंदेंची शरद पवारांसमोर टोलेबाजी, 'थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते' #5मोठ्याबातम्या

विविध वृत्तपत्र आणि डिजिटल मिडियावर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्या..
1. एकनाथ शिंदेंची शरद पवारांसमोर टोलेबाजी, थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते
मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुका आज (20 ऑक्टोबर)ला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल रिंगणात उतरलं आहे.
या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात शरद पवारांच्या समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
या निवडणुकीआधी पवार-शेलार पॅनलकडून राज्यातील क्रिकेट असोसिएशन संबंधित नेत्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक हे एकाच व्यासपीठावर होते.
"थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते. संधी मिळाली की बॅटिंग करतो. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सगळ्यांच्याच आशीर्वादाने ती मॅच जिंकली. काहींचे उघडपणे आशीर्वाद होते, काहींचे आतून होते, मनापासून होते, मी काही नाव घेत नाही," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हास्य केलं.
2. भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर अज्ञात आहेत. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने जाधव यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

फोटो स्रोत, Facebook / Bhaskar Jadhav
गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
ही बातमी सकाळने दिली आहे.
3. माझ्या कामाचा अहवाल खर्गेंना सादर करेल, पक्षातली माझी जागा तेच ठरवतील - राहुल गांधी
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसला गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आपण आपल्या कामाचा अहवाल हा त्यांना सादर करत जाऊ असे देखील त्यांनी सांगितले. असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.
देशभरातल्या काँग्रेस कार्यालयासमोर खर्गे यांच्या विजयानंतर आज कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. दुसरीकडे भारत जोडो यात्रा मोहिमेवर असलेल्या ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही खरगेंच्या नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"तर पक्षातील स्थानावर बोलताना नवे अध्यक्ष खर्गेजी माझा पक्षातील रोल ठरवतील," असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आंध्रप्रदेशात पोहचली आहे. दुपारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खर्गे विजयी झाल्यानंतर राहुल गांधींनी कुर्नूल येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील राजकारणावर, खर्गे यांच्या अध्यक्षपदावर आणि पक्षातील स्वत:च्या स्थानावर भाष्य केलं.
4. रितेश-जिनेलिया अडचणीत, 120 कोटींच्या कर्जावरून नवा वाद
रितेश आणि जिनेलिया देशमुख यांच्या मालकीच्या कंपनीवरून भाजपने गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप रितेश यांच्या कंपनीने फेटाळले आहेत.
रितेश-जिनेलिया या दोघांनी मागील वर्षी त्यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची घोषणा केली होती. ही बातमी लोकमत न्यूज 18 ने दिली आहे.
कंपनीच्या जागेवरून आणि घेतलेल्या कर्जावरून वाद निर्माण झाला आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्यावर भाजपनं गंभीर आरोप केले आहेत. या वादात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देखील संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

23 मार्च 2021ला कंपनीची नोंद करण्यात आली. तेव्हा रितेश आणि जिनेलिया दोघेही त्याचे मालक होते. रितेश जेनेलिया यांची 50-50 टक्के भागीदारी होती. सुरूवातीला कंपनीचं भांडवल 7.50 कोटी रुपये होतं. पण त्यानंतर कंपनीवर अनेक आरोप करण्यात आले.
कंपनीने 5 एप्रिल 2021मध्ये लातुरातील अतिरिक्त एम आय डी सीमध्ये अर्ज केला आणि हा अर्ज 15 एप्रिल 2021ला मंजूर झाला आणि कंपनीला जागा मिळाली. अवघ्या 10 दिवसात रितेश जेनेलियाला जागा कशी काय मंजूर झाली यावर भाजपनं प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.
हे सर्व काही नियमाप्रमाणेच आहे असं रितेश देशमुख यांच्या कंपनीने सांगितलं आहे. नियमानुसार ही जागा लीजवर घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
5. एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट
एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यासाठी राज्य शासनाकडून 45 कोटी रुपये निधी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे. याआधी प्रत्येक वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीत अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये भेट दिली जात होती. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असून त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोबरला अदा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधीच देण्याचे आदेश काढण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केली आहे. डिजिटल प्रभातने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























