उद्धव ठाकरे : शिवसेनेचं नाव, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला #5मोठ्या बातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. शिवसेनेचं नाव, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला - उद्धव ठाकरे

"माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला. आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, शिवसेना संपवायची या हेतूने सगळं करण्यात आलं", असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मंगळवारी (18 ऑक्टोबर) बुलडाण्यातील शिवसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन आपण पुढे जात आहोत. धनुष्यबाण रामाचा होता, त्या धनुष्यबाणाच्या मदतीनेच रावणाचा वध रामाने केला. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे ती घेऊन पुढे जात काम करू."

"पहिल्यात निवडणुकीत मशालीची ताकद दिसली. अंधेरीत पराभव दिसला म्हणून भाजपने माघार घेतली. त्यांना शिवसेना संपवायची होती. पण शिवसेना एक अंगार आहे. ती कधीच संपणार नाही. जिथे अंधार असेल तिथे आपली मशाल जाईल," असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

2. दिवाळीच्या 10 दिवसांत पुण्यात वाहतूक पोलिसांकडून दंड नाही

दिवाळीच्या दिवसांत नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या चलनांमुळे रस्त्यातच कोंडी होते. ती टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात वाहतूक पोलीस कोणतेही चलन फाडणार नाहीत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, facebook

"पुणे शहरात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सीएसआर निधीतून 600 वाहतूक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक चौकात एक-दोन कर्मचारी वाहतूक नियमन करतील, त्यामुळे दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्यात मदत होईल," असं पाटील यांनी म्हटलं.

"दरम्यान, पुणे शहरात मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त करण्यात येणार आहेत. पाऊस संपल्यानंतर कामास सुरुवात होईल. महापालिका आणि महामेट्रो यांनी मिळून ते काम करावे," असंही पालकमंत्री पाटील म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. एसटीतील 89 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं 89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपयांची घोषणा सरकारनं केली आहे. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी दिला जाईल.

एसटी बस

फोटो स्रोत, Getty Images

या निधीतून एसटी अधिकाऱ्याना पाच हजार आणि कर्मचार्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळी रक्कम मिळणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारर 21 ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं आज जारी केले होते. ही बातमी ई-सकाळने दिली.

4. हिंदी भाषेविरोधात तामिळनाडू विधानसभेत ठराव

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारने मंगळवारी तामिळनाडू विधानसभेत (18 ऑक्टोबर) हिंदीविरोधात ठराव मांडला. यावेळी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या हिंदीसंदर्भातील धोरणांवर टीका केली.

एम. के. स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "भाजप केवळ हिंदी लागू करण्यासाठीच देशात आलं आहे. भाजपला हिंदी भाषेला ताकदीचं प्रतिक बनवायचं आहे. त्यांना इतर भाषा संपवायच्या आहेत. पण आम्ही तसं होऊ देणार नाही.

भाजपला प्रशासनातून इंग्रजी पूर्णपणे काढून टाकायची आहे. त्यांना देशातील नागरिकांना इंग्रजी भाषेचं ज्ञान घेण्यापासून थांबवायचं आहे, असा आरोपही यावेळी स्टॅलिन यांनी केला. ही बातमी लोकमतने दिली.

5. "पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…"

पुण्यात सोमवारी झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी तुंबल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात टीकाकारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, "काल पुण्यात पडलेल्या पावसाने मागील 10 वर्षांचा विक्रम मोडला आहे. ड्रेनेज तयार करताना इतक्या पावसाचा विचार केलेला नसतो."

"हे ड्रेनेजचे डिझाईन भाजपाने तयार केलेले नाही. हे ड्रेनेज 40 वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ड्रेनेज लवकर तयार झाले पाहिजेत यासाठी पुणे मनपा निश्चितपणे प्रयत्न करेल," असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)