आशिया कप भारताने जिंकला, श्रीलंकेवर दणदणीत विजय

फोटो स्रोत, Asian Cricket Council
महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं. बांगलादेशमधल्या सिल्हेट इथे ही स्पर्धा झाली.
भारताचं या स्पर्धेचं हे सातवं जेतेपद आहे. भारताने याआधी 2004, 2005-06, 2006, 2008, 2012, 2016 मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णत: फसला. भारताच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची दाणादाण उडाली. श्रीलंकेला 65 धावांपर्यंतच मजल मारता आली. इनोका रणवीराने सर्वाधिक 18 धावा केल्या.
रेणुका सिंगने 3 ओव्हर्समध्ये 5 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

फोटो स्रोत, James Allan
भारतीय संघाने स्मृती मन्धानाच्या नाबाद 51 धावांच्या खेळीच्या बळावर 9 विकेट्स राखून दिमाखदार विजय मिळवला. स्मृतीने 25 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 51 धावा केल्या. खणखणीत षटकारासह स्मृतीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

फोटो स्रोत, Fiona Goodall-ICC
स्पर्धेत प्राथमिक फेरीत भारताने श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवत सुरुवात केली. मलेशियाविरुद्ध डकवर्थ लुईस प्रणालीद्वारे भारतीय संघाने 30 धावांनी विजय मिळवला. युएईविरुद्ध भारताने तब्बल 104 धावांनी विजय साकारला.
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मात्र भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवातून बोध घेत भारताने बांगलादेशला 59 धावांनी नमवलं.
अनुनभवी थायलंडला भारताने अवघ्या 37 धावांत गुंडाळलं. एका विकेट गमावून भारताने हे लक्ष्य गाठलं.
सेमी फायनलमध्ये भारताने थायलंडविरुद्ध 148 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना थायलंडला 74 धावाच करता आल्या.
भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जने स्पर्धेत सर्वाधिक 217 धावा केल्या. भारताच्याच दीप्ती शर्माने सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या.
रेणुका सिंगला मॅन ऑफ द मॅच तर दीप्ती शर्माला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























