शिवसेना-धनुष्यबाण वाद: सोमवारी दुपारपर्यंत शिंदे गटाचं नाव, चिन्हं ठरणार

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना

फोटो स्रोत, FACEBOOK/EKNATH SHINDE

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

"धनुष्यबाण चिन्ह गेलं याचं आम्हाला दु:ख आहे. सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हाबाबत माहिती देण्यात येईल", अशी माहिती शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

"उद्धव ठाकरे गटाची तयारी होती म्हणूनच त्यांनी नाव आणि चिन्हांसाठी प्रस्ताव दिला. चारवेळा तारखा बदलून मागितल्यामुळे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. कागदपत्रं सादर केली नाहीत. रावणाला गर्व झालेला म्हणून त्याला शिवधनुष्य उचलता आलं नाही. त्याचं गर्वहरण झालं. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाहीये," असा टोलाही त्यांनी हाणला.

आढावा बैठकीत 100 दिवसात विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ असंही त्यांनी सांगितलं.

प्रतिज्ञापत्रांच्या घोटाळ्यासंदर्भात त्या म्हणाल्या, "निर्मलनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेचार हजारांपेक्षा प्रतिज्ञापत्रं पकडण्यात आली आहेत. नोटरीचे वकील गायब आहेत असं पोलिसांकडून सांगितलं. 10 कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा आहे. 4500 हजार प्रतिज्ञापत्र हे केवळ हिमनगाचं टोक आहे.

शंभर ते दीडशे लोकांना आपलं नाव वापरलं आहे याची कल्पनाच नव्हती. राज्यातल्या अनेक भागात हे झालेलं आहे. गृहमंत्रालयाकडे सखोल तपासाची मागणी करणार आहोत", असं त्यांनी सांगितलं.

"बाप चोरला झालं, कार्ट झालं, नातू झालं. आता आईवर बोलले. नात्यांचं पावित्र्य राखलं जावं एवढी आमची अपेक्षा आहे", असंही म्हात्रे म्हणाल्या.

धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका- राज ठाकरे

धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. पक्ष प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याचं स्पष्ट होतं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असतांना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे.

मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

'आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे'

"धनुष्यबाणावर आमचाच अधिकार आहे. आम्ही रडत राहत नाही, लढत राहतो आणि तोच खरा शिवसैनिक. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे," असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

"आमच्यावर अन्याय झालाय. विचारांपासून तुम्ही लांब गेलात, आम्ही नाही, म्हणून ही वेळ आली. आम्ही प्रतिज्ञापत्रं कधी दिली याचा तपशील आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही दिलं आहे. आमच्याकडे काही शिल्लक नाही.

त्यांची बाजू खोटी आहे. चिन्ह आमचं आहे, ते गोठल्याचं दु:ख आम्हाला आहे. पर्यायी चिन्हासाठी त्यांची पत्रं गेली आहेत. आमचा दावा धनुष्यबाणासाठीच आहे. आम्हाला हे चिन्ह मिळायला हवं. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची भूमिका मांडणार आहोत", असं ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितलं, "भारत ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही शाबूत राखण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं आहे. भारतातल्या निवडणुकांची जग दखल घेतं. हरलो की घटनात्मक संस्थांची भूमिका चुकीची असं म्हटलं जातं. हे चूक आहे".

"लोक कोणाला निवडून आणतात ही लोकशाही आहे. लोकांनी युतीला निवडून दिलं होतं. त्यांना बाजूला ठेऊन दुसऱ्याच लोकांना घेऊन सरकार स्थापन होत असेल तर युतीचा अपमान आहे. लोकांचं मत डावललं जातं त्याला लोकशाहीची हत्या म्हटलं जातं.

चिन्ह गेलं म्हणून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. बाळासाहेबांनी सहानुभूतीचा आधार घेतला नाही. आम्ही बाळासाहेबांना मानतो. कामाने लोकांना जिंकायला लागतं. बाळासाहेबांना जसं काम अपेक्षित होतं तसं एकनाथ शिंदे गट करत आहे. असा राजकारणी दाखवा ज्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण केलं आहे", असं ते म्हणाले.

"चिन्ह गेल्यावर बाळासाहेबांचं नाव लावणार असा दावा केला जातोय. इतक्या वर्षात नाव लावावं असं का वाटलं नाही. हिंदुत्वाचा ज्यांनी अपमान केला, हिंदू देवतांना ज्यांनी शिव्या दिल्या त्या लोकांना तुम्ही व्यासपीठावर स्थान दिलंत", अशी टीका केसरकर यांनी केली.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टा पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, "जिंकून दाखवणारच."

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!"

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही बाजूंनी चिन्ह मिळवण्याचे प्रयत्न झाले. पण आयोगाचा निर्णय स्वीकारणं आम्हाला बंधनकारक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेऊन आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहोत," असं शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले.

तुम्ही बाळासाहेबांचा कोणता विचार पुढे घेऊन जाणार? - भास्कर जाधव

हा निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे. लोकशाहीचे भविष्य काय हा प्रश्न निर्माण करणारा आहे. संसदीय लोकशाही प्रणाली आहे की नाही? इंदिरा गांधींनी जाहीरपणे आणीबाणी लावली होती. पण देशात आता अघोषित आणीबाणी केलीय, असं मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

ते पुढे म्हणाले, "मी मागेही म्हटलं होतं की, शिवसेनेबाबत जो निर्णय होईल, तो केवळ शिवसेनेवर आघात करणारा नसेल, तर लोकशाहीवर आघात करणारा असेल. माझे ते शब्द खरे ठरले आहेत.

"ज्या पक्षासोबत 25 वर्षं युती केली तो पक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर पेढे वाटत होता. ज्या चिन्हावर तुम्ही आमदार-खासदार म्हणून निवडून आला, तेच चिन्ह गोठवलं. शिवसेना हा शब्द गोठवला. आता तुम्ही बाळासाहेबांचा कोणता विचार पुढे घेऊन जाणार आहेत, हा माझा एकनाथ शिंदेंना प्रश्न आहे."

उद्धव ठाकरे निर्णय घेतील- अनिल देसाई

"निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. सोमवारी दोन्ही पक्षांना बोलावून बैठक होईल अशी अपेक्षा होती, पण आयोगाने आधीच दिलेला निर्णय अनपेक्षित होता," असं मत खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ShivSena

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

"फ्री सिम्बॉल बाबत उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा होईल आणि मग निर्णय घेऊन आयोगाला ते सादर करू," असंही देसाई म्हणाले.

आज दोन्ही गटाच्या बैठका

निवडणूका आयोगाच्या निकालानंतर पक्षाच्या नावावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची आज संध्याकाळी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल काय?

शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे चिन्ह निवडणूक आयोगानं 8 ऑक्टोबर रोजी गोठवलं. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्थात, हा निर्णय केवळ पोटनिवडणुकीपुरता नसून चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत लागू राहील.

'शिवसेना' पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

शिवसेना कुणाची या वादाबाबत सुनावणी निवडणूक आयोगात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत कोणताच पक्ष किंवा गट या चिन्हाचा वापर करू शकणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)