पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा विसर्जनावेळी अचानक पूर, 7 लोकांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा विसर्जनावेळी अचानक पूर, 7 लोकांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा विसर्जनाच्या वेळी अचानक आलेल्या पुरात आठ लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. 30 ते 40 लोकांचा वाचविण्यात यश आलं आहे.
बीबीसी हिंदीने ही बातमी दिली आहे.
बुधवारी (5 ऑक्टोबर) संध्याकाळी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी भागात ही घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकारी मोमिता बसू यांनी दिली आहे.
माल नदीच्या काठावर शेकडो लोक मूर्ती विसर्जनासाठी एकत्र जमले होते. काल पाऊस येणार असा कोणताही अंदाज वर्तवला नव्हता. अचानक पाण्याची पातळी वाढली आणि ही दुर्घटना घडली. सिक्कीमच्या उंच भागात अचानक पाऊस पडल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
2. उत्तराखंडमधील हिमवादळात अडकलेले 27 गिर्यारोहक अद्यापही बेपत्ता
उत्तराखंडात आलेल्या हिमवादळात उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग चे 61 गिर्यारोहक सापडले आहेत. त्यातील 15 लोक बचावले आहेत, तर 27 लोकांचा शोध सुरू आहे. गढवाल येथील दंडा येथे ते गिर्यारोहणाला गेले होते. ITBP आणि SDRF च्या संयुक्त विद्यमाने 15 गिर्यारोहकांचा बचाव करण्यात यश मिळालं आहे.
टाइम्स ऑफ इंडिया ने ही बातमी दिली आहे.
आतापर्यंत चार मृतदेह सापडले आहेत. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. नौमी रावत आणि सविता कन्सल अशी त्यांची नावं असून दोघीही या संस्थेत प्रशिक्षक आहेत. इतर दोन मृतदेहांची ओळख अजून पटायची आहे.
ज्या ठिकाणी हे गिर्यारोहक अडकले आहेत ते समुद्रसपाटीपासून 18000 फूट अंतरावर आहे. त्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत असं बचावपथकाने सांगितलं.
3.ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबैर यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन
2022 सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत दोन भारतीय फॅक्ट चेकर्स असल्याची माहिती समोर आली आहे.
'ऑल्ट न्यूज'चे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे, याबाबतचं वृत्त 'टाइम'ने दिलं आहे.
नॉर्वेचे खासदार आणि ओस्लो येथील 'पीस रिसर्च इन्स्टिट्यूट'ने (पीआरआयओ) प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांना नामांकित केलं आहे.
लोकसत्ता ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Social media
विशेष म्हणजे नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत असणाऱ्या मोहम्मद झुबेर यांना अलीकडेच अटक करण्यात आली होती. 2018 साली केलेल्या एका ट्वीटप्रकरणी झुबेर यांना यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांच्या दाखल केलेल्या एफआयआरनुसार, "हे ट्वीट अत्यंत प्रक्षोभक आणि दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारे होते."
परंतु झुबेर यांना अटक केल्यानंतर जगभरातील अनेक लोकांनी निषेध व्यक्त केला होता. त्याचबरोबर भारतातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
झुबेर यांना एक महिना तिहार कारागृहात ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
4.राहुल गांधी यांनी मला अध्यक्षपदासाठी प्रोत्साहन दिलं- शशी थरूर
अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींनी मला अध्यक्षपदाचा अर्ज मागे घ्यायला सांगावं असं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार आणि खासदार शशी थरूर यांनी केला आहे. केरळममध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
केरळमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तुम्ही अर्ज केला तर पक्षाला त्याचा फायदाच होईल, असं राहुल गांधी मला म्हणाले असंही थरूर सांगत होते.
"त्यांनी मला आठवण करून दिली की, गेल्या दहा वर्षांत पक्षाध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्याच पाहिजेत."

फोटो स्रोत, Getty Images
"काही लोकांनी त्यांना येऊन थरूर यांनी उमेदवारी मागे घ्यावी असंही सांगितलं होतं. मी असं करणार नाही असं राहुल गांधींनी त्यांना सुनावलं. राहुल मला म्हणाले की तुम्ही उमेदवारी मागे घेऊ नका आणि निवडणूक लढवा," असं थरूर पुढे म्हणाले.
5.तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव आता भारत राष्ट्र समिती
भाजपविरुद्ध प्रभावीपणे लढा देण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती ने त्यांच्या पक्षाचं नाव भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे.
द मिंट ने ही बातमी दिली आहे.
ही घोषणा केल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांनी फटाके फोडले आणि पेढे वाटले. केसीआर जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
देश के नेता केसीआर अशा घोषणा आणि फलक यावेळी पहायला मिळाले. केसीआर यांचा गौरव करणारे अनेक फलक हैदराबादमध्ये बघायला मिळाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























