बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू थापा यांचा शिंदे गटात प्रवेश #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा

1. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू थापा यांचा शिंदे गटात प्रवेश

बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू संपासिंह थापा यांनी मातोश्रीची साथ सोडली आहे. सोमवारी सायंकाळी ते ठाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात शिंदे गटात सामील झाले.

अनेक दशकांपासून शिवसेना जवळून पाहणाऱ्यांना थापा यांचं मातोश्रीतून बाहेर पडणं निराशाजनक वाटू शकतं. थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत प्रिय आणि निष्ठावंत मानले जात होते. एबीपी माझा ने ही बातमी दिली आहे.

थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचे केवळ सर्वात विश्वासू मदतनीस नाही तर ते ठाकरे कुटुंबातील सदस्य म्हणूनही ओळखले जात होते.

थापा यांनी 27 वर्षं बाळासाहेब ठाकरेंना चांगल्या आणि वाईट परिस्थिती दिली आणि शेवटच्या काळात त्यांची काळजी देखील घेतली. नोव्हेंबर 2012 मध्ये शिवाजी पार्कवर ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारात लोकांनी त्यांना अत्यंत दुःखी अवस्थेत पाहिलं होतं.

2. ग्रामपंचायतीसाठी होणार 16 ऑक्टोबरला मतदान

विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील, 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी 13 ऑक्टोबरऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी 14 ऐवजी 17 ऑक्टोबरला होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

आयोगाने 7 सप्टेंबरला 1165 ग्रामपंचायतींच्या निवणडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यांसह थेट सरपंचाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल.

3. भारतात गेल्या दहा वर्षांत 20 टक्क्यांनी प्रजनन दर घसरला

भारतात गेल्या दहा वर्षांत प्रजनन दर 20 टक्क्यांनी घसरला आहे. 1000 प्रजननक्षम स्त्रियांमध्ये किती मुलं जन्माला आली यावरून हा दर ठरतो. गेल्या दहा वर्षांत हा 86.1 वरून 68.7 वर आला आहे. सँपल रजिस्ट्रेशन सिस्टिमने ही माहिती दिली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा दर जास्त आहे.

एम्स दिल्लीच्या स्त्रीरोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सुनीता मित्तल यांनी ही माहिती म्हणजे लोकसंख्या कमी होत असल्याचं लक्षण असून ते चांगलं असल्याचं म्हटलं आहे. लग्नाचं वय वाढलं आहे, अनेक गर्भनिरोधक उपाय यामुळे हा बदल झाल्याचं त्या म्हणाल्या.

जम्मू काश्मीर भागात हा दर सर्वाधिक आहे (29.2) तर दिल्ली (28.5) आणि उत्तर प्रदेशमध्ये (24) आणि झारखंडमध्ये (24 ) आहे . टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

4. रामचंद्र देखणे यांचं निधन

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (वय ६६) यांचं सोमवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

ऐसा वासुदेव बोलतो बोल, विंचू चावला, दार उघड बये आता दार उघड, सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहील तुला, शकुन सांगाया आले यमाई माझे नाव, अशा संत एकनाथांच्या भारुडांच्या सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनाचं काम डॉ. रामचंद्र देखणे यांनी केलं.

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील नोकरीतून निवृत्तीनंतर डॉ. देखणे यांनी संत साहित्य अभ्यासात झोकून देऊन काम केले. संत साहित्यासह लोक वाङमय व भारुडांचाही त्यांचा अभ्यास होता.

त्यांनी ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक ४७ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. विविध संत साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर कीर्तन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलं होतं.

मागील 35 वर्षांहून अधिक काळ संतविचार प्रबोधिनी दिंडीच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसाराचे काम ते करत होते. राज्य सरकारसह विविध संस्थांनी त्यांना शंभरवर पुरस्कार दिले आहेत.

5 माहिती प्रसारण मंत्रालयाने 10 चॅनेलवरून 45 व्हीडिओ काढून टाकण्याचे आदेश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 10 चॅनेलवरून 45 व्हीडिओ काढण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश 23 सप्टेंबर 2022 ला देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 नुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

द लाईव्ह टीव्ही या चॅनेलवरून 13, हिंद व्हॉईस वरून 9, इन्किलाब टीव्ही आणि देश इंडिया लाईव्ह या चॅनेलवरून प्रत्येकी सहा व्हीडिओ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नॅशनल अड्डा, ध्रुव राठी यांच्याही चॅनेलवरून व्हीडिओ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.

या चॅनेलवरून मॉर्फ केलेले फोटो आणि फेक न्यूज पसरवल्या जात असल्याचा आरोप मंत्रालयाने केला आहे. "हे चॅनेल देशात द्वेश पसरवण्याचं काम करत होते. या चॅनेलवरील मजकुरामुळे शेजारी देशांशी असलेल्या संबंधाना हानी पोहोचत होती." अशी माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)