You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'लगान'साठी आमिर खानने वसवलं होतं एक अख्खं गाव, इंग्रजांना शिकवली हिंदी
- Author, रेहान फजल,
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी 'लगान' चित्रपट बनवण्याचं ठरवलं त्यावेळी 3 गोष्टी त्यांच्या विरोधात होत्या.
सर्वप्रथम दिग्दर्शक म्हणून त्यांचा इतिहास तोपर्यंत अतिशय वाईट होता. कारण त्यांचे आधीचे 'पहला नशा' आणि 'बाजी' हे दोन चित्रपट काही खास चालले नव्हते.
दुसरीकडे, लगान चित्रपटाची स्क्रिप्ट ही फिल्म इंडस्ट्रीचे त्यावेळचे नियम तोडत होती. त्यावेळी पीरियड फिल्म बनवणं किंवा ग्रामीण कथेवर पैसा लावण्यास कोणतेच निर्माते धजावत नव्हते.
शिवाय, खेळाची पार्श्वभूमी असलेला शेवट त्यावेळी चित्रपटांमध्ये विशेष चालत नव्हता. विशेष म्हणजे धोतर आणि बंडी घातलेला चित्रपटाचा नायक ही कल्पना करणंही त्यावेळी शक्य नाही.
एका निर्मात्याने आशुतोष गोवारीकर यांना म्हटलं की चित्रपटाचा क्लायमॅक्स थोडा अक्शन पॅक्ड बनवा. चित्रपटाच्या शेवटी भुवन हा कॅप्टन रसेलच्या पोटात स्टंप खुपसवत आहे, असं काहीतरी दाखवा, अशी मागणी त्या निर्मात्याने केली होती.
त्यावेळी मुंबईतील कोणत्याच निर्मात्याला या चित्रपटात रस नव्हता. कारण त्यांचं संपूर्ण जग हे चित्रपट ताऱ्यांभोवतीच एकवटलेलं होतं.
आमिरने पहिल्यांदा 'लगान'ची कथा रिजेक्ट केली होती...
लगान चित्रपटाची कथा ही चंपानेर गावची 1893 सालची एक काल्पनिक कथा आहे.
बिहारच्या चंपारण येथे 1917 साली महात्मा गांधी यांनी नीळ मजूरांसाठी केलेल्या आंदोलनातून कथेची प्रेरणा घेण्यात आली होती.
गोवारीकर यांनी ही कथा पहिल्यांदा आमिर खानला ऐकवली. पण त्यावेळी आमिरने ही कथा रिजेक्ट केली होती.
1893 साली लगान बंद करण्यासाठी गावकरी क्रिकेट खेळतात, हा विचार आमिरला तितका रंजक वाटत नव्हता.
पण तरीही आशुतोष गोवारीकर यांनी ही कहाणी कागदावर उतरवण्याचा निर्णय घेतला.
गोवारीकर ही कहाणी घेऊन पुन्हा आमिरकडे गेले, पण यावेळी आमिर खान त्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही.
यानंतर दुसरी समस्या अशी आली की, कोणताच निर्माता या चित्रपटाचं 25 कोटींचं बजेट देण्यास तयार नव्हतं.
अशोक अमृतराज, शाहरुख खानसह इतर अनेक निर्माते 'लगान'च्या स्क्रिप्टने प्रभावित झाले होते. पण त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपटापासून अंतर राखलं.
शेवटी कुणीच निर्माता पुढे न आल्याने आमिर खानने स्वतः या चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं.
पण, जेव्हा गोवारीकर आणि आमिर यांनी मिळून ही कहाणी कथा-गीतकार जावेद अख्तर यांना ऐकवली, तेव्हा तेसुद्धा जास्त प्रभावित दिसून आले नाहीत.
चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यास फक्त तीन महिने राहिले होते. त्याच वेळी भारतीय चित्रपटांतील एक यशस्वी कथाकार चित्रपट चालत नाही, असं मत व्यक्त करत असल्याचं पाहून आशुतोष आणि आमिर दोघांनाही धक्का बसला.
3 हजार जणांचे सलग 6 महिने अविरत परिश्रम
जावेद अख्तर यांच्यासोबतच्या चर्चेनंतरही आमिर खानने लगान बनवण्याचा विचार सोडून दिला नाही.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक शीला रावल लिहितात, "त्यावेळी भारताच्या सर्वात महागड्या चित्रपटापैकी एक मानल्या जात असलेल्या चित्रपटाचा पाया रचला गेला होता. सुमारे 3 हजार जणांनी 6 महिने सतत परिश्रम करून चंपानेर गाव वसवलं."
गोवारीकर आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी यासाठी गुजरातच्या भुजजवळ कुनारिया येथील एक ठिकाण निश्चित केलं.
चित्रपटात आमिरने भुवन नामक तरुणाचं पात्र साकारलं आहे. ग्रामीण भागात बहुतांश लोक मिशा ठेवतात, त्यामुळे भुवन या पात्रालाही मिशा असाव्यात, असं आमिरला वाटत होतं.
पण, आशुतोष यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, "चंपानेरमध्ये शतकातला सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. पाण्याचा थेंबही कुठे पाहायला मिळत नाही. अशा स्थितीत भुवन रोज सकाळी दाढी करण्यात आणि मिशा ठेवण्यात पाणी वाया घालवत आहे, हे कसं शक्य आहे?"
आशुतोष यांनी चित्रपटातील इतर कलाकारांनाही सल्ला दिला की त्यांनी पुढचे काही दिवस आपले केस कापू नयेत किंवा दाढीही करू नये.
40 पेक्षा जास्त अभिनेते इंग्लंडमधून भारतात
चित्रपटाला वास्तविकतेच्या जवळ न्यायचं असेल तर इंग्रज कलाकार ब्रिटनहून बोलावावे लागतील, असं आशुतोष आणि आमिर खान यांना वाटत होतं.
कथेच्या गरजेनुसार, 11 ब्रिटिश खेळाडू, तीन ज्येष्ठ अभिनेते आणि सुमारे 30 ज्युनियर कलाकार ब्रिटनहून बोलवावं लागणार होतं. या सर्वांचा हवाई प्रवास, त्यांची पाऊंडमध्ये द्यावी लागणारी फी या सर्व कारणांमुळे चित्रपटाचं बजेट आणखीनच वाढलं.
आमिर या चित्रपटासाठी खास लंडनला गेला होता. सत्यजित भटकळ आपल्या द स्पिरीट ऑफ लगान या पुस्तकात लिहितात, "सर्वात प्रमुख मुद्दा होता की ब्रिटिश कलाकारांना भारतीय चित्रपटात काम करण्यासाठी राजी करणं. ब्रिटिशांच्या तुलनेने लगान चित्रपटाचं बजेट अतिशय कमी होतं. जागतिक पातळीवर 'तिसऱ्या जगातील' मानल्या जाणाऱ्या देशात याचं चित्रीकरण होत होतं.
तिथले कास्टिंग डायरेक्टर्स आमिरला अनेक प्रश्नांची सरबत्ती करत. तुमच्या निर्मिती संस्थेने यापूर्वी कोणत्या चित्रपटांची निर्मिती केली आहे का, असं ते विचारत. आमिर त्याचं उत्तर नाही म्हणून द्यायचा. तो त्यांना सांगायचा की निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्यांचा पुढचा प्रश्न असायचा चित्रपट कोणत्या भाषेत असेल. हिंदी, असं उत्तर आमिरकडून मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रमावस्था दिसून येई."
दुर्मिळ वस्तूंच्या दुकानातून साहित्याची खरेदी
आमिरने त्यावेळी लंडनच्या सेंटर फॉर ओरिएंटल स्टडीजला भेट दिली. इथे त्याची एक मैत्रीण रशेल ड्वायर भारतीय सिनेमाचं शिक्षण देत असे.
त्यांची एक पाकिस्तानी विद्यार्थिनी समीनने ब्रिटिश कलाकारांना एका महिन्यात हिंदी शिकवण्याचा विडा उचलला.
रशेल आणि पॉल भारतात जाण्यासाठी सज्ज झाले, त्यावेळी त्यांनी आपल्या हिंदी संवादांवर प्रभुत्व मिळवलं होतं.
ब्रिटनमध्ये आमिर खानने अनेक ग्रंथालये, म्युझियम आणि दुर्मिळ वस्तूंची दुकाने पालथी घातली. चित्रपटात 1893 चं वातावरण तयार करण्यासाठी या वस्तूंचा उपयोग केला जाणार होता.
इतकंच नव्हे तर चित्रपटात वापरलेल्या बॅटसुद्धा 1893 च्या काळातीलच होत्या.
लंडनच्या एका दुर्मिळ वस्तूंच्या दुकानातून त्यांची खरेदी करण्यात आली. याच दुकानात जुन्या काळातील चेंडूही त्याला सापडले. त्यावर आजच्याप्रमाणे कंपन्यांचं चिन्ह छापलेलं नसायचं.
आमिरने दुकानाचे मालक शॉन अरनॉल्ड यांना उपलब्ध असलेल्या बॅटपासून ते स्टंप, पॅड, ग्लोव्ह्ज यांच्यासह सगळ्या वस्तू देण्यास राजी केलं.
खासगी आयुष्यातही आमिर खानला क्रिकेटबाबत खूप आवड होती. तज्ज्ञांशी चर्चा करून त्याने एक पीचही बनवून घेतलं. पण नंतर 22 यार्डचं ते पीच 13 यार्डचं करून घेण्यात आलं होतं.
कुनारिया गावातील कोरड्या मातीवर नदीच्या चिखलाचा लेप लावण्यात आला होता. 25 ट्रकमध्ये भरून हा चिखल आणला गेला होता.
आमिरसाठी सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे चंपानेर गाव वसवणं. लगानचे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यापूर्वी अनेक पीरियड चित्रपटांचे सेट बनवले होते. त्यांच्या मते, एका ओसाड जमिनीवर रचना करून गावाचा सेट उभा करणं अत्यंत अवघड काम होतं. पण त्यांनी ते लीलया पार पाडलं. त्यामुळेच चंपानेर गाव कुनारिया गावापेक्षाही जास्त खरा असल्याचा भास व्हायचा.
2 हजार धोतर आणि कुर्ते
चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी सगळे कलाकार चंपानेर गावात बनवण्यात आलेल्या खोट्या घरांमध्ये राहायचे.
तिथल्या वातावरणाशी मिळतंजुळतं वाटण्यासाठी त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, चित्रपटात सहभागी कलाकारांसाठी आमिरने 2 हजार धोतर-कुर्त्यांच ऑर्डर दिली होती. पण तेसुद्धा कमी पडल्यामुळे इतर काही जण पँट शर्ट घालून येऊ लागले.
ही समस्या पाहून प्रोडक्शन टिमने शर्ट पँट घालणाऱ्या लोकांना धोतर-कुर्ता घालणाऱ्यांच्या मागे लपवण्याची युक्ती शोधली.
गंमत म्हणजे, चित्रपटाच्या शेवटी भुवनचा संघ जिंकतो तेव्हा हजारो दर्शक मैदानात पळत येतात. या दृश्यात एक पँट शर्ट घातलेली व्यक्ती अचानक कॅमेऱ्यासमोर आली. त्यामुळे हे दृश्य पुन्हा एकदा नीट चित्रीत करण्यात आला.
अभिनेत्री ग्रेसी सिंहने मजल मारली
चित्रपटात अभिनेत्री म्हणून आमिर खानने नम्रता शिरोडकर, आमिशा पटेल आणि नंदिता दास यांचं ऑडिशन घेतलं होतं. प्रत्येक अभिनेत्रीकडे स्वतःचे वेगळे गुण होते. पण आशुतोष गोवारीकर यांच्या मनात एका ग्रामीण मुलीची प्रतिमा होती. या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या स्टार व्हॅल्यूपेक्षाही ती या भूमिकेत कशी योग्य दिसेल, हे महत्त्वाचं होतं.
सत्यजित भटकळ लिहितात, "त्यावेळी नवोदित अभिनेत्री ग्रेसी सिंह आशुतोष यांना भेटण्यासाठी आली होती. त्यादिवशी तिचा वाढदिवस होता. ग्रेसी तितकी ग्लॅमरस नव्हती, पण आशुतोष यांनी तिच्यातील आंतरिक सौंदर्य ओळखलं. त्यांनी ग्रेसीला ऑडिशनसाठी बोलावलं. आमिरने पाहिलं की ऑडिशनच्या दिवशी ग्रेसी शांत-शांत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती किंवा उत्साह या कोणत्याच गोष्टी दिसत नव्हत्या. ग्रेसीने ऑडिशन चांगल्या पद्धतीने दिला. अखेर, तिलाच या भूमिकेसाठी निवडण्यात आलं."
क्रिकेट खेळण्यात अडचणी
भुवनच्या संघातील 11 जणांसाठी आमिरने कलाकारांचं ऑडिशन घेतलं. त्यासाठी सुमारे 200 हून अधिक अभिनेत्यांनी ऑडिशन दिलं.
आशुतोष यांनी पहिल्यांदा लगानची स्क्रिप्ट लिहिली तेव्हा त्यांनी क्रिकेट सामन्याच्या दोन डावांचा विचार केला होता. पण अखेरीस इतरांच्या सल्ल्यानुसार हा सामना एका डावाचाच ठेवावा, असं ठरवण्यात आलं. सामन्यातील एक-एक गोष्ट अतिशय सूक्ष्मपणे स्क्रिप्टमध्ये समाविष्ट करण्यात आली होती.
सत्यजित भटकळ लिहितात, "कोणता खेळाडू किती धावा बनवेल, हे आधीपासूनच निश्चित करण्यात आलं होतं. कोण कसा बाद होईल, खेळाडूने मारलेला फटका कोणत्या दिशने जाईल, तो चेंडू अडवला जाईल की सीमापार जाईल, हे सगळं स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं. या सामन्याचे एकूण 1200 शॉट्स घेण्यात येणार होते. क्रिकेट सामन्याच्या चित्रीकरणासाठी 20 दिवस निश्चित करण्यात आले. म्हणजे रोज एकूण 60 दृश्यांचं चित्रीकरण. हे उद्दीष्ट अतिशय अवघड असं होतं."
एका दृश्यात देवाचं पात्र स्मिथच्या डाव्या बाजूने चेंडू टाकत असतं. फलंदाज स्मिथ हा चेंडू स्क्वेअर लेगवर असलेल्या लाखाकडे फटकवतो. तर लाखा आलेला झेल जाणूनबुजून सोडणार होता. पण देवाची भूमिका करत असलेले प्रदीपसिंह रावत हे एक अभिनेते होते, क्रिकेटर नव्हे.
त्यामुळे त्यांना चेंडू सरळ दिशेने फेकणं बिलकुल जमत नव्हतं. हा चेंडू कधी डावीकडे जायचा तर कधी उजवीकडे. हे दृश्य खूपवेळा चित्रीत करावं लागल्याने आशुतोष यांच्या चिंता वाढल्या होत्या.
दुपारच्या जेवणानंतर अर्जन सिंह यांना दोन चौके मारून बाद व्हायचं होतं. पण त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच क्रिकेट खेळलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना बॅटने चेंडू फटकावण्यात अडचणी आल्या.
सुरुवातीला स्मिथने टाकलेला चेंडू बॅटला स्पर्शही न करता थेट स्टंपवर जाऊन आदळला. पुन्हा चित्रीकरण करताना आशुतोष यांनी स्मिथला फ्रेममधून हटवलं. यावेळी चेंडू बॅटच्या बाजूने निघून गेला. पुढच्या वेळी चेंडूसुद्धा फ्रेममधून काढून टाकण्यात आला.
फक्त बॅट जोरात फिरव असं अर्जन यांना सांगण्यात आलं. फक्त त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव घेऊन या दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं.
कानावर चेंडू लागण्याचं कठीण दृश्य
यानंतर आणखी एका दृश्यात प्रचंड अडचणी आल्या. यार्डलीचा एक चेंडू आमिर खानच्या कानावर लागतो.
हा चेंडू त्याच्या कानावर लागणं गरजेचं होतं. कारण कानातून प्रचंड रक्त वाहत असल्याचं एक दृश्य पूर्वीच चित्रीत करण्यात आलं होतं. पण नेम धरून कानावर बाऊंसर मारणं ही कठीण गोष्ट होती.
यार्डलीची भूमिका करत असलेल्या ख्रिस यांनी आपल्या आयुष्यात कधीच चेंडू पकडलेला नव्हता. त्यामुळे कुणीतरी आमिरच्या कामावर चेंडू मारावा, तो अतिशय जवळून चित्रीत करावा, असं ठरवण्यात आलं.
खरं तर हे फारसं अवघड काम नव्हतं. पण या दृश्यात आमिर खानही त्याच वेळी खाली वाकत असतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जमून येणं अतिशय अवघड बनलं.
यादरम्यान, चेंडू कधी आमिरच्या गालावर लागायचा तर कधी डोक्यावर लागायचा. पण कानावर चेंडूचा नेम लागतच नव्हता. त्यामुळे आमिर खानला वेदनाही होत होत्या.
शूटिंगवेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना स्लीप डिस्कचा त्रासही झाला. ते उभे राहण्याच्या स्थितीतही नव्हते. पण त्यांना माघार न घेता, पलंगावर झोपून चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
इंग्रज अभिनेत्यांना हिंदी शिकवलं
गोवारीकर यांनी ब्रिटिश कलाकारांकडूनही प्रचंड मेहनत करून घेतली. 'लगान'मध्ये कॅप्टन रसेल या खलनायकाची भूमिका करणारे पॉल ब्लॅकथॉर्न म्हणतात, "सुरुवातीच्या काळात मला हिंदी भाषा आणि घोडेस्वारी शिकण्यास सांगण्यात आलं. मी त्याचा सराव केला. पण मला त्यात अनेक अडचणी आल्या. हे सगळं सोडून इंग्लंडला निघून जावं, असं मला वाटायचं. पण चार महिन्यात मी स्क्रिप्टमधील प्रत्येक शब्द शिकून घेतला."
चित्रपटातील भाषेचा लहेजा खडी बोली असावा की अवधी असावा यावरूनही आमिर आणि गोवारीकर यांच्यात बराच वादविवाद झाला.
'गांधी' चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या भानू अथय्या यांना वेशभूषेची जबाबदारी देण्यात आली.
भानू यांनी ब्रिटिश अभिनेत्री रशेल शेली यांच्या शेकडो हॅट्सचं डिझाईन केलं.
लगानसाठी भानू यांनी गांधी चित्रपटासारखीच रिसर्च केली होती. बाहेर तापमान कितीही असलं तरी प्रत्येक कलाकाराला बंडी आणि धोतर हाच पोशाख घालावा लागायचा. चित्रकरणाची पहिली शिफ्ट सकाळी 7 वाजता सुरू व्हायची. उशिरा उठणाऱ्यांना वाहन सुविधा नसायची. त्यांनी स्वतःच सेटवर यावं, असं सांगण्यात आलं.
एकदा तर आमिर खान वगळता सगळे चित्रीकरणासाठी निघून गेले होते. अनेकवेळा गोवारीकर यांना कलाकारांच्या नाराजीला तोंड द्यावं लागायचं.
कधी कधी शेली हिंदी बोलताना अडचणी आल्यानंतर नाराज व्हायची, पण तिने कधीच तक्रार केली नाही.
आमिर खानने कुनारिया गावातील लोकांना एक वचन दिलं होतं की चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तो गावात सर्वांना दाखवला जाईल. हे वचनही त्याने पाळलं.
नया दौर आणि एस्केप टू व्हिक्ट्रीमधून प्रेरणा
लगानने भारतीय सिनेमावर तोच प्रभाव टाकला, जो स्टार वॉरने हॉलीवूडवर.
सुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स गुन यांची सर्वाधिक आवडता भारतीय चित्रपट 'लगान' हाच आहे.
समीक्षकांच्या मते, 'लगान' चित्रपटाची प्रेरणा 50 च्या दशकात आलेल्या 'नया दौर' चित्रपटातून घेण्यात आली होती.
तर काहींच्या मते, 'एस्केप टू व्हिक्ट्री' चित्रपटाशी मिळतंजुळतं हे कथानक आहे. या चित्रपटात युद्धबंदी नाझी सैनिकांना फुटबॉल सामन्यात हरवतात.
तसंच प्रत्यक्ष इतिहासात मोहन बगान संघाशी याची तुलना होई शकते. या संघाने 1911 साली अनवाणी पायाने फुटबॉल खेळून ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंट संघाला हरवलं होतं.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या अनेक मुलांनी आपली नावे गोली आणि गुरन ठेवली. त्यावर्षी भारतात जन्मलेल्या अनेक मुलांचं नाव भुवन ठेवण्यात आलं.
योगायोगाने कुनारिया हे गाव भारताचे महान क्रिकेटपटू रणजी यांचा जन्म झालेल्या गुजरात राज्यात आहे.
भुवनने चित्रपटात इंग्रजांविरुद्ध मिळवलेला विजय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असाच आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)