बेगम हजरत महल : शेवटपर्यंत इंग्रजांच्या तावडीत न सापडलेल्या लखनऊच्या राणीची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
गोष्ट आहे 3 जुलै 1857 ची. लखनऊच्या कैसरबाग महालाकडून चाँदीवाली बारादरीकडे एक मोठा मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या मध्यभागी 14 वर्षांचा एक सडपातळ बांध्याचा सावळा मुलगा चालत होता.
या मुलाचं नाव होतं बिरजिस कद्र. वर्षभरापूर्वीच हद्दपार करण्यात आलेले अवधचे नवाब वाजीद अली शाह यांचा तो मुलगा होता. या मुलाच्या आई होत्या बेगम हजरत महल. वाजीद अली शाह यांनी लखनऊ सोडण्यापूर्वी तलाक दिलेल्या नऊ महिलांपैकी त्या एक होत्या.
14 वर्षांच्या बिरजिस कद्रला अवधचा नवा नवाब घोषित करणं, हा त्या मोर्चाचा उद्देश होता.
'इंग्रजांना असं वाटत होतं की, त्यांच्या विरोधात बंड करणारे केवळ एका सांकेतिक मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. पण तसं नव्हतं. तो एक अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. इंग्रजांनी अवध प्रांतावर ताबा मिळवल्यानंतर एकाकी पडलेल्या समुहाच्या नेत्यांना एकत्र येण्याची संधी त्या मोर्चामुळे मिळाली होती. हे सर्व नेते त्यांच्याकडून हिसकावलेलं राज्य, पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात होते,' असं रोझी लिऊलिन जोन्स यांनी त्यांच्या 'द ग्रेट अपरायझिंग इन इंडिया: अनटोल्ड स्टोरीज इंडियन अँड ब्रिटिश' या पुस्तकात लिहिलं आहे.
1857च्या बंडाची आग दिल्ली, मेरठ आणि कानपूर नंतर लखनऊमध्येही पोहोचली होती. बंडाची पहिली ठिणगी 30 मे, 1857 रोडी उडाली होती. तेव्हा शहरातील मारियन छावणीतील सैनिकांनी अधिकाऱ्यांची घरं पेटवून देत, तीन ब्रिटीश सैनिकांची हत्या केली होती.
बेगम हजरत महल यांच्यावर कारभाराची जबाबदारी
लखनऊचे चीफ कमिश्नर सर हेन्री मोंटगोमेरी लॉरेन्स यांनी सर्व ब्रिटीश महिला आणि मुलांना रेसिडेन्सीमध्ये (राहण्याची वस्ती) जाण्याचा आदेश दिला होता.
त्यानंतर सुमारे 5000 बंडखोर सैनिक शहराकडे येत असल्याचं लॉरेन्स यांना 30 जून रोजी समजलं.
लॉरेन्स यांनी घाई-घाईत त्यांचा सामना करण्यासाठी सुमारे 600 सैनिक गोळा केले.
या दोन्ही सैन्यांमध्ये लखनऊ शहरापासून सहा मैल दूर अंतरावर असलेल्या चिनहटमध्ये लढाई झाली. त्यात ब्रिटिश सैनिकांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर बंडखोरांनी लखनऊला पूर्णपणे घेराव घातला.
तीन दिवसांनंतर बिरजिस कद्रला अवधच्या गादीवर बसवण्यात आलं. पण त्यावेळी ते लहान असल्यामुळं राज्य कारभाराची संपूर्ण जबाबदारी त्यांची आई बेगम हजरत महल यांच्यावर आली.
आफ्रिकेतील गुलामाच्या कन्या होत्या हजरत महल
'हजरत महल या अत्यंत साध्या कुटुंबातील होत्या. त्यांचे पिता अंबर आफ्रिकेतील गुलाम होते. तर त्यांच्या आई महेर अफजा या अंबर यांच्या रखैल होत्या. हजरत महल लखनऊच्या परिखाना संगीत स्कूलमध्ये संगीत शिकायच्या, त्यामुळं त्यांना 'महक परी' म्हटलं जाऊ लागलं होतं,' असं इतिहासकार रोझी लिऊलिन जोन्स यांनी लिहिलंय.

फोटो स्रोत, Getty Images
'कलागुण किंवा सौंदर्य किंवा या दोन्ही कारणांमुळे त्यांनी वाजीद अली शाह, यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वाजीद अली शाह यांनी मुता (करार करून केलेला निकाह)च्या माध्यमातून त्यांना तात्पुरती पत्नी बनवलं. 1845 मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यामुळं त्यांचा दर्जा वाढला आणि त्यांना महल ही पदवी देण्यात आली,' असंही त्यांनी लिहिलं आहे.
पण 1850 मध्ये जणू हजरत महल यांच्या नशिबानं पाठच फिरवली. वाजीद अली शाह यांनी त्यांना तलाक तर दिलाच शिवाय त्यांना हरम (एखाद्या बादशाहच्या बेगम राहतात ती जागा) मधूनही बाहेर केलं.
रुद्रांग्शू मुखर्जी यांनी त्यांच्या 'अ बेगम अँड द राणी हजरत महल अँड लक्ष्मीबाई इन 1857' मध्ये याबाबत लिहिलंय. 'याचा परिणाम असा झाला की, वाजीद अली शाह यांना जेव्हा इंग्रजांनी लखनऊमधून हाकलून कलकत्ता इथं पाठवलं तेव्हा हजरत महल त्यांच्याबरोबर नव्हत्या. त्या बेगम राहिल्या नव्हत्या. पण त्यांचा मुलगा जेव्हा नवाब आणि मुघल बादशाहांचा वली म्हणजे गव्हर्नर बनला तेव्हा हजरत महल यांना आपोआपच बेगम हा किताब परत मिळाला. त्या बंडखोरांच्याच नव्हे तर, सर्वसामान्यांच्याही नेत्या बनल्या', असं मुखर्जींनी पुस्तकात म्हटलंय.
रेसिडेन्सीला 35,000 बंडखोरांचा घेराव
जुलै, 1857 पर्यंत शिपाई मंगल पांडेला ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळं बराकपूरमध्ये फाशी देण्यात आलेली होती. मेरठ, कानपूर आणि दिल्लीमध्ये बंडाची आग उसळली होती आणि झांशीच्या जोखून बागमध्ये इंग्रज महिला आणि मुलांच्या हत्येनंतर राणी लक्ष्मीबाई झांशीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या.
चिनहटमध्ये इंग्रज सैनिकांचा पराभव झाल्याची बातमी पसरायला सुरुवात होताच बंडखोर सैनिक लखनऊला पोहोचू लागले होते. त्यानंतर आठ महिने म्हणजे मार्च 1858 पर्यंत हजरत महल यांनी लखनऊमध्ये बंडखोरांचं नेतृत्व केलं.
दरम्यानच्या तीन महिन्यांपर्यंत 37 एकर परिसरात पसरलेल्या रेसिडेन्सीला घेराव घालण्यात आला. त्यात ब्रिटीश मुलं, सैनिक, इतर नागरिक, भारतीय सैनिक, त्यांचे समर्थक आणि नोकर अशा तीन हजार जणांचा समावेश होता.
एका रिपोर्टनुसार रेसिडेन्सीला जवळपास 35,000 बंडखोरांनी घेराव घातलेला होता. ही संख्या रोज वाढत चालली होती.

फोटो स्रोत, INDIAN POSTAL DEPARTMENT
'रेसिडेन्सीच्या आत परिस्थिती एवढी गंभीर बनली होती की, बंडखोरांसमोर जास्तीत जास्त 15-20 दिवसच आपला टिकाव लागू शकतो, असं लॉरेन्स यांना वाटू लागलं होतं,' असा उल्लेख जेम्स नील या इंग्रज अधिकाऱ्यांनी लॉर्ड कॅनिंग यांना लिहिलेल्या पत्रात आहे.
भारतातील या बंडखोरीचं वार्तांकन करण्यासाठी 'द टाइम्स' वृत्तपत्रानं व्हिवियम हॉवर्ड रसेल यांना पाठवलं होतं. 'तीन महिन्यांच्या घेरावादरम्यान तीन हजारपैकी अर्धे इंग्रज एकतर पळून जाण्यात यशस्वी झाले होते किंवा मारले गेले होते. बेगमने प्रचंड ऊर्जा आणि क्षमता दाखवत संपूर्ण अवधला त्यांच्या मुलाच्या बाजूनं लढण्यास तयार केलं,' असं रसेल यांनी त्यांच्या बातमीत म्हटलं होतं.
रेसिडेन्सीमध्ये लॉरेन्स यांचा मृत्यू
जुलै 1857 च्या सुरुवातीला एक दिवस हेन्री लॉरेन्स सर्व आढावा घेतल्यानंतर रेसिडेन्सीतील त्यांच्या खोलीत आले होते. त्याच्या आदल्या दिवशीच एक होवित्झर बॉम्ब त्यांच्या खोलीत येऊन त्याचा स्फोट झाला होता. पण लॉरेन्स यांना काहीही झालं नव्हतं.
'लॉरेन्स यांच्या सहकारी सैनिक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना रेसिडेन्सीत आतल्या बाजूला असेलल्या दुसऱ्या खोलीत जाण्याचा सल्ला दिला. लॉरेन्स यांनी दुसऱ्या दिवशी खोली बदलण्याचा निर्णय घेतला होता. एकाच ठिकाणी दोनदा निशाणा लावण्याचा विचार कोणताही निशाणेबाज करू शकणार नाही, असा विचार त्यांनी केला', असं रुद्रांग्शू मुखर्जी यांनी त्यांच्या 'डेटलाईन 1857 रिव्होल्ट अगेन्स्ट द राज' मध्ये लिहिलं आहे.
'पण प्रत्यक्षात तसंच घडलं. लॉरेन्स एका पत्राचा मजकूर सांगत असताना दुसरा बॉम्बगोळा तिथं येऊन पडला आणि त्याचा स्फोट झाला. त्यात हेन्री लॉरेन्स गंभीर जखमी झाले. ते एवढे जखमी होते की, त्यांना वाचवणं कठिण झालं. त्यामुळं 4 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना गोपनीय पद्धतीनं रेसिडेन्सीमध्येच दफन करण्यात आलं. त्यानंतर काही दिवस कुणालाही त्यांच्या मृत्यूची चाहूलही लागू दिली नाही,' असंही मुखर्जी यांनी लिहिलंय.
तारा कोठीमध्ये भरायचा बेगमचा दरबार
इंग्रजांचा सामना करण्याबाबतचे सर्व निर्णय बेगम हजरत महल यांच्या दरबारात घेतले जात होते.
एका प्रत्यक्षदर्शीनं साक्ष देताना याबाबत माहिती दिली होती. 'बेगम यांचा दरबार जेव्हा भरत होता, तेव्हा सरकारमधील सर्व सदस्य आणि कमांडर त्यात भाग घ्यायचे. अशा प्रकारची बैठक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तारा कोठीमध्ये होत होती. दरबारातून बिरजिस कद्र यांच्या नावाने एक प्रसिद्धी पत्रक काढलं जायचं, त्यात लोकांनी धर्म वाचवण्यासाठी लढा लढावा अशी विनंती केली जात होती. त्यात इंग्रज सरकारचा तीव्र शब्दांत निषेधही केला जायचा,' असं त्यानं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, PENGUIN
'त्याशिवाय दरबारातून बिराजिस कद्र यांच्या नावाने तालुकदारांना आदेश जारी केला जायचा. ज्याप्रकारे सामान्य नागरिक इंग्रजांचा विरोध करत होते, त्यावरून या आदेशांचा गांभीर्यानं विचार केला जात होता हेही स्पष्ट होतं आणि लोकांवर त्याचा परिणामही स्पष्ट दिसत होता,' असंही या साक्षीदारानं सांगितलं होतं.
लखनऊ रेसिडेन्सीमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी कानपूरहून पाठवलेल्या हेन्री हॅवलॉक आणि जेम्स आऊटरॅम यांच्या तुकड्यांना सर्वसामान्य गावकऱ्यांच्या तीव्र विरोधाचाही सामना करावा लागत होता.
लढाई वगळता लखनऊच्या रस्त्यांवर उत्साहाचं वातावरण होतं. लोक एकमेकांना मिठाई, हलवा पुरी वाटत होते.
दिल्लीतील पराभवानंतर लखनऊला पोहोचले बंडखोर
25 सप्टेंबर 1857 ला हॅवलॉक आणि आऊटरॅम यांचे सैनिक रेसिडेन्सीच्या आत घुसण्यात यशस्वी झाले, त्यामुळं बंडखोरांना पहिला धक्का बसला. पण संख्या कमी असल्यानं सैनिकांना पूर्णपणे ताबा मिळवता आला नाही,
आत जाऊन ते सगळे विखुरले गेले आणि त्यांचा सहकाऱ्यांबरोबरचा संपर्कदेखील तुटला होता.
'आउटरॅमचे तह करण्याचे सर्व प्रयत्न बेगम हजरत महल यांनी नाकारले होते,' असं चार्ल्स बॉल यांनी त्यांच्या 'हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी' मध्ये लिहिलं आहे.
त्याचं कारण म्हणजे, तोपर्यंत ब्रिटिशांनी दिल्लीवर ताबा मिळवला होता. त्यामुळं अनेक बंडखोर तिथून पळून अवधच्या बंडखोरांना मदत करण्यासाठी तिथं आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
'जानेवारी, 1858 उजडेपर्यंत लखनऊमध्ये बंडखोर सैनिकांची संख्या ही जवळपास एक लाखांच्या आसपास पोहोचली होती. इंग्रज लखनऊमधून गेले असले, तरी ते लवकरच परत येतील अशी शक्यता तेव्हा सर्वांना वाटत होती, असं मुखर्जी यांनी 'अवध इन रिव्होल्ट' पुस्कात लिहिलं आहे.
'इंग्रज परत आले तरी, त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागावा म्हणून बेगम हजरत महल लखनऊच्या बाजूने तटबंदी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी त्यासाठी सुमारे 15,000 मजूर कामाला लावले होते. कैसरबागच्या चारही बाजूंनी एक खोल दरी खोदण्यात आली, त्यात गोमती नदीचं पाणी आणलं जाणार होतं,' असंही त्यांनी सांगितलंय.
हजरत महलच्या सैनिकांचा इंग्रजांशी तीव्र संघर्ष
ब्रिटीश सैनिकांना नोव्हेंबर 1857 मध्ये रेसिडेन्सीमध्ये प्रवेश करण्यात यश आलं. कॉलिन कॅम्बेल यांच्या नेतृत्वात ब्रिटिश सैनिकांनी रेसिडेन्सीत अडकलेले इंग्रज आणि त्यांच्या समर्थकांना बाहेर काढलं.
'या संघर्षामध्ये 3000 बंडखोरांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या 80 तोफा इंग्रजांनी ताब्यात घेतल्या होत्या. यावरूनच त्यांचा इंग्रजांशी किती तीव्र संघर्ष झाला असेल, याचा अंदाज येतो.
डिसेंबर, 1857 पर्यंत वातावरण पूर्णपणे बदलू लागलं होतं. वाराणसीमध्ये कर्नल जेम्स नील यांनी बंडात सहभागी झालेल्यांना आंब्याच्या झाडावर फाशी आणि तोफेच्या तोंडी देत संपूर्ण परिसरात दहशत पसरवली होती,' असं चार्ल्स बॉल यांनी या संघर्षाबाबत लिहिलं आहे.
'आलमबाग महालात जेम्स आऊटरॅम आणि त्यांच्या सैनिकांची उपस्थिती ही बेगम आणि त्यांच्या सैनिकांसमोरची सर्वांत मोठी अडचण होती.

फोटो स्रोत, Getty Images
बेगमच्या सैनिकांनी आलमबाग महालावर नऊ वेळा हल्ला केला. पण इंग्रजांना तिथून काढण्यात किंवा कानपूरवरून त्यांना मिळणाऱ्या मदतीचा ओघ रोखण्यात त्यांना यश आलं नाही.
एका हल्ल्यात तर स्वतः बेगम हजरत महल हत्तीवर बसून सहभागी झाल्या होत्या,' असं इरा मुखौटी यांनी त्यांच्या 'हिरोइन्स पॉवरफुल इंडियन वुमेन ऑफ मिथ अँड हिस्ट्री' मध्ये लिहिल आहे.
रुद्रांग्शू मुखर्जी यांच्या मते, 'हजरत महल लढ्यात स्वतः सहभागी झाल्या नव्हत्या, पण लढाईची संपूर्ण आखणी त्यांनी केली होती. एवढंच नाही तर लढाईशी संबंधित सर्व आदेश, त्यांच्या दरबारातूनच देण्यात आले होते. बंडखोरांचं मनोधैर्य उंचावण्याचाही त्यांनी पूर्ण प्रयत्न केला.'
इंग्रजांनी 1856 मध्ये जेव्हा अवधला त्यांच्या राज्यात समाविष्ट करून घेतलं होतं, तेव्हा त्यांना एक गोळीही चालवावी लागली नव्हती. मात्र, 1858 मध्ये त्यांना लखनऊवर परत ताबा मिळवण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावाली लागली होती.
मौलवी अहमदुल्लाह शाह यांचे बेगमला आव्हान
बेगमला इंग्रजांपेक्षा जास्त आव्हान दिलं ते, त्यांच्याच राज्यातील मौलवी अहमदुल्लाह शाह यांनी. इंग्रजांना समूळ नष्ट करण्याचा आदेश आपल्याला थेट ईश्वराने दिल्याचा शाह यांचा दावा होता. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या मौलवींनी ते ग्वाल्हेरच्या मेहराब शाह यांचे शिष्य असल्याचं सांगितलं होतं.
'अहमदुल्लाह आगऱ्यात फकिरासारखे राहायचे. त्यांनी इंग्रजांविरोधात जिहाद पुकारला होता. तेव्हा त्यांचं वय सुमारे 40 होतं. ते फार कमी शिकलेले आणि काहीसे फारसी आणि अरबी बोलू शकत होते. चिनहटच्या लढाईच्या वेळीदेखील ते उपस्थित होते,' असं रुद्रांग्शू मुखर्जी यांनी 'अवध इन रिव्होल्ट' मध्ये म्हटलंय.

फोटो स्रोत, Twitter
'बेगम हजरत महल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मौलवींना लखनऊमध्ये घुसू द्यायचं नव्हतं. पण बंडखोरांवर इंग्रजांचा दबाव वाढू लागला तेव्हा, मौलवींच्या संदेशांकडं दुर्लक्ष करणं त्यांना कठिण जाऊ लागलं.
बंडखोरांचा लढ्यात पराभव होऊ लागला तेव्हा हजरत महल यांना त्यांना लखनऊत प्रवेश करण्याची परवानगी द्यावीच लागली. जानेवारी 1858 पर्यंत बंडखोरांमध्ये दोन गट पडले. अवधचे सैनिक बेगम हजरत महल आणि बिरजिस कद्र यांच्या पाठिशी होते. तर इतर शहरांतून आणि दिल्लीतून आलेले शिपाई मौलवींच्या पाठिशी होते.'
इंग्रजांच्या मदतीसाठी आले नेपाळचे गोरखा सैनिक
नेपाळच्या जंग बहादूर राणा यांचे धोकादायक गोरखा सैनिक इंग्रजांच्या मदतीसाठी लखनऊला येत असल्याची बातमी अचानक येऊन धडकली.
'इंग्रजांनी गोरखा सैनिकांच्या मदतीच्या मोबदल्यात जंग बहादूरला गोरखपूर शहर आणि लखनऊच्या लुटीतून मिळणाऱ्या खजिन्यात वाटा देऊ केला होता, अशी माहिती बेगमला मिळाली. त्यावर तोडगा म्हणून बेगम हजरत महल यांनी जंग बहादूर यांना एक नवा प्रस्ताव पाठवला,' असं रुद्रांग्शू मुखर्जी यांनी लिहिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्रजांची मदत करु नये यासाठी, त्यांनी गोरखपूरबरोबरच आझमगड, आरा आणि वाराणसी देण्याचं वचन त्यांनी जंग बहादूरला या प्रस्तावातून देऊ केलं. पण फकिराच्या वेशात जाणाऱ्या हेरांना इंग्रजांनी रस्त्यातच पकडलं आणि ठार केलं. त्यामुळं गोरखा सैनिकांनी इंग्रजांची मदत करत लखनऊकडं मार्गक्रमण सुरू ठेवलं.
इंग्रज महालात घुसण्यापूर्वी निसटल्या हजरत महल
फेब्रुवारी 1858 मध्ये बेगमला त्यांचा एक तालुकदार मान सिंहच्या गद्दारीचाही सामना करावा लागला.
यादरम्यान कॅम्बेल यांच्या नेतृत्वात सुमारे 60,000 इंग्रज सैनिक लखनऊकडे निघाले होते. त्यात 40,000 सैनिक युरोपातून लढाईसाठी भारतात आले होते. कैसर बागवर इंग्रजांनी सर्वांत शेवटी ताबा मिळाला. कारण त्याच्या रक्षणासाठी बंडखोरांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती.
'बेगमनं शेवटपर्यंत हार मानली नाही. त्या कैसर बागमध्ये तळ ठोकून होत्या. पण ब्रिटीश सैनिक त्यांच्या महालात घुसण्यापूर्वी 15 मार्च, 1858 ला त्या काही समर्थकांसह तिथून निसटण्यात यशस्वी झाल्या,' असं डब्लू एच रसेल यांनी त्यांच्या 'माय डायरी इन इंडिया' मध्ये लिहिलंय.

फोटो स्रोत, ANTHEM PRESS
त्यांनी लखनऊच्या बाहेर मुसा बागमध्ये इंग्रजांविरोधात लढा सुरू केला. 21 मार्च, 1858 ला त्यांनी मुसा बागेत मौलवी अहमदुल्लाह यांच्या साथीनं इंग्रजांच्या विरोधात अखेरचा लढा दिला, पण त्यात इंग्रज त्यांच्यापेक्षा वरचढ ठरले.
यामुळं सर्व बंडखोरांमध्ये पूर्णपणे गोंधळ निर्माण झाल्यानं ते विखुरले गेले. मौलवी रुहेलखंडकडं गेले. तिथं इंग्रजांनी त्यांना युद्धात अडकवून ठेवलं. पण नंतर त्यांच्याच एका सहकाऱ्यानं गद्दारी करत त्यांचं शीर धडावेगळं केलं.

फोटो स्रोत, Getty Images
बेगमने नेपाळमध्ये घेतला आश्रय
बेगम हजरत महल त्यांचा मुलगा आणि उरलेल्या सहकाऱ्यांबरोबर नेपाळच्या सीमेकडे गेल्या. त्यांनी घाघरा नदी पार केली आणि बहराइच जिल्ह्याच्या बुंदी किल्ल्यात काही काळ तळ ठोकला.

फोटो स्रोत, Getty Images
बुंदेलखंडहून वाचून निघालेले मराठा नेते नानासाहेबही तिथं पोहोचले. लखनऊपासू दूर गेल्यानंतरही बेगमबरोबर 15,000 ते 16,000 सैनिक होते. त्यांच्याकडे 17 तोफाही होत्या. एवढ्या दुरूनही त्यांनी अवधचा कारभार चालवण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत.
तिथूनही त्या बिरजिस कद्र यांच्या नावाने आदेश जारी करत होत्या. एवढंच नाही तर, त्यांच्या सैनिकांना वेतनही दिलं जात होतं. पण हळूहळू सर्व आशा मावळल्या आणि इंग्रज आपल्याला पकडतील अशी शक्यता वाटू लागली तेव्हा बेगमने नेपाळमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, HURST
नेपाळच्या जंग बहादूर राणा यांनी बेगम हजरत महल नेपाळमध्ये शांतपणे राहणार असतील, तर त्यांना तिथं राहू देण्याची घोषणा केली. नेपाळच्या भूमीवर त्यांना हिंसाचार करण्याची परवानगी नसेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर हजरत महल यांनी उर्वरित आयुष्य नेपाळमध्ये घालवलं.
नेपाळमध्येच घेतला अखेरचा श्वास
1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या तावडीत न सापडणाऱ्या अशा त्या एकमेव नेत्या होत्या.
दरम्यानच्या काळात, त्यांचे पूर्वाश्रमीचे पती वाजीद अली शाह हे हजरत महल यांच्या बंडाच्या भूमिकेवर खूप नाराज झाले होते.
हजरत महल त्यांच्या नावाचा वापर करत आहेत, याची माहिती नसल्याची तक्रार त्यांनी कर्नल केव्हेनाग यांच्याकडे केली होती.
वाजीद अली शाह यांनी त्यांचं उर्वरित आयुष्य कलकत्ता जवळच्या मतिया बुर्जमध्ये घालवलं.

फोटो स्रोत, PENGUIN
बेगम हजरत महल 1879 पर्यंत जिवंत होत्या. पण इंग्रजांनी अखेरपर्यंत त्यांची भारतात येण्याची इच्छा मान्य केली नाही. एस. एन. सेन यांनी त्यांच्या 1857 पुस्तकात याबाबत उल्लेख केलाय.
इंग्रजांनी त्यांना वाजीद अली शाह यांच्याप्रमाणं पेन्शन देऊ केलं, पण त्यांनी ते नाकारलं. नेपाळमध्येच त्यांचं निधन झालं आणि तिथंच त्यांना दफन करण्यात आलं. पण इंग्रजांचा थेट सामना करणाऱ्या या महिलेला इतिहासात त्यांच्या पात्रतेप्रमाणं स्थान कधीही मिळालं नाही.
राणी व्हिक्टोरिया गादीवर बसण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं बेगमचा मुलगा बिरजिस कद्रला माफी देण्यात आली. ते भारतात परतले आणि कलकत्त्यात राहू लागले. 14 ऑगस्ट 1893 ला तिथं त्यांचं निधन झालं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




















