मान्सून मुंबईत पोहोचला, या जिल्ह्यात 'रेड अलर्ट', टायफूनचा पावसावर परिणाम होईल?

फोटो स्रोत, Getty Images
मान्सूननं आता मुंबईसह महाराष्ट्रात आणखी आगेकूच केल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
दक्षिण कोकणात मान्सून सक्रीय असून, काही भागांत अतीजोरदार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिले आहेत.
मान्सून कुठे पोहोचला आहे, पुढच्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचं प्रमाण कसं असेल, आणि फिलिपिन्सजवळच्या चक्रीवादळाचा भारतातील मान्सूनवर परिणाम होऊ शकेल का? जाणून घेऊयात.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील सीमा आता महाराष्ट्रात डहाणू आणि वर्धा इथून जाते आहे. म्हणजे राज्याचा उत्तरेकडचा काही भाग वगळता इतर ठिकाणी मान्सून ऑन्सेट जाहीर करण्यात आला आहे.
पण म्हणजे राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडतोय, असं मात्र नाही. 23 जूनच्या दुपारी सॅटेलाईट दृश्यांमध्ये कोकणात, विशेषतः दक्षिणेकडेच्या भागात दाट ढग दिसून येतायत.
गेल्या चोविस तासांत दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी, उत्तर कोकणात अनेक ठिकाणी तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
पुढच्या चार पाच दिवसांत कोकणात, विशेषतः दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जोरदार पावसामुळे रत्नागिरीला 23 जूनला संध्याकाळसाठीही रेड अलर्ट दिला आहे तर रायगड, सिंधुदुर्ग आणइ पुण्याच्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट आहे.
त्याशिवाय नाशिकचा घाट प्रदेश, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशात पावसासाठी यलो अलर्ट आहे. राज्यात इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आजच्या रात्री थंडरस्टॉर्म म्हणजे गडगडाटासह विजा आणि सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळू शकतो.
24 जून रोजीही रत्नागिरीत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतीजोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर राज्यात इतर बहुतांश ठिकाणी थंडरस्टॉर्मची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेची तीव्रता जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुढच्या चोविस तासांत पूर्व विदर्भात काही ठिकाणी 40 अंश सेल्सियसपर्यंत कमाल तापमानाची नोंद होऊ शकते. राज्यात बाकी ठिकाणी कमाल तापमानत बरीच घट झाली आहे.
किमान तापमानातही हळूहळू घट होतेय, पण विदर्भात रात्रीचा पाराही वरती राहतो आहे.
दरम्यान, पॅसिफिक महासागरात फिलिपिन्सच्या समुद्रात टायफून म्हणजे मेखला हे चक्रीवादळ घोंघावतंय.
हे चक्रीवादळ उत्तरेला जपानकडे सरकण्याची शक्यता असल्याचं जपानच्या हवामानखात्यानं म्हटलं आहे.
या चक्रीवादळापासून भारताला कुठला धोका नाहीये, पण काहीवेळा या प्रदेशातल्या वादळांचा जेट स्ट्रीमवर आणि मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वादळांवर नजर ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























