शिल्पा नवलकरांची पोस्ट चर्चेत, मृणाल कुलकर्णींचा 'फक्त महिलांसाठी' सिनेमा नाटकावरून घेतला?

शिल्पा नवलकर

फोटो स्रोत, Facebook

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

काही दिवसांपूर्वी निर्माते परितोष पेंटर आणि राजेशकुमार मोहंती या दोघांनी मिळून सात चित्रपटांची घोषणा केली.

निरवधी, एप्रिल फूल, फक्त महिलांसाठी, थ्री चिअर्स, एकदा येऊन तर बघा, सुटका, ती मी नव्हेच अशा सात चित्रपटांची घोषणा पेंटर आणि मोहंती यांनी केली. मराठी चित्रपटसृष्टीतली अनेक दिग्गज नावं या सात चित्रपटांच्या निमित्तानं एकत्र आली आहेत.

पण या सात पैकी एका चित्रपटामुळे आता वादही निर्माण झालाय. फक्त महिलांसाठी या चित्रपटाची कथा आपल्या सेल्फी या नाटकाच्या कथेवर आधारित असल्याचं अभिनेत्री-लेखिका शिल्पा नवलकर यांनी म्हटलं आहे.

'फक्त महिलांसाठी' या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी करत आहेत.

प्रेम म्हणजे... प्रेम म्हणजे... प्रेम असतं आणि रमा माधव या चित्रपटांनंतर मृणाल पुन्हा एकदा 'फक्त महिलांसाठी'मध्ये दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाचं लेखन हे अभिनेता आणि मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस याने केलं आहे.

पण शिल्पा नवलकर यांनी या सिनेमाची कथा ही आपल्याच 'सेल्फी' या नाटकावरून घेतली असल्याचं म्हटलं आहे.

शिल्पा यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

चित्रपटाचे लेखक आणि अभिनेते विराजस कुलकर्णी यांनी मात्र सेल्फी आणि फक्त महिलांसाठी या दोन्ही वेगळ्या स्क्रीप्ट असल्याचं म्हटलं आहे.

शिल्पा नवलकरांनी काय म्हटलं आहे?

शिल्पा नवलकरांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की,

'2015 साली मी लिहिलेलं सेल्फी हे मराठी नाटक रंगभूमीवर आलं. ते हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांमध्ये परितोष पेंटर या निर्मात्याने सादर केलं. त्यावेळेस निर्माता म्हणून मला त्याचा उत्तम अनुभव आला. त्याच वेळेस त्याने मला सांगितलं होतं की, त्याला सेल्फी या नाटकावर चित्रपट करण्याची इच्छा आहे. पण मी त्याला म्हणाले की हे नाटक कथेच्या गरजेनुसार एका बंद जागेत (स्टेशनवरची वेटिंग रूम) घडत असल्यामुळे हा फिल्मचा विषय नाही.

शिल्पा पुढे लिहितात, 'त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून 2022 मध्ये मला पुन्हा परितोषचा फोन आला आणि मला भेटून त्याने मला सांगितलं की त्याला पुन्हा एकदा सेल्फी ह्या नाटकावर सिनेमा करण्याची इच्छा आहे. मी पुन्हा तेच उत्तर दिलं. पण तो ह्याच वर्षी सेल्फीवरचा चित्रपट करण्याबद्दल ठाम होता. अखेर मी आनंदाने त्याला त्या चित्रपटाची पटकथा लिहिण्यास होकार दिला. मी त्याला सांगितलं की आपल्याला नाटकाचा गाभा तोच ठेवून चित्रपटासाठी वेगळी कथा बांधावी लागेल.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

आमचं दोघांचं बोलणं झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून परितोषची आणि माझी पहिली निवड रेणुका शहाणे ही होती. पण दुर्दैवाने रेणुकाला ते शक्य नव्हतं. मग अनेक नावांचा विचार झाल्यावर अखेर दिग्दर्शक म्हणून मृणाल कुलकर्णीची निवड झाली.'

मृणालनेही आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं की, कथा नव्याने बांधायला हवी. त्यात थ्रिलर एलिमेंट, पोलीस तपास वगैरे आणायला हवा, ज्याला मी हो म्हणाले. (Big Little lies ह्या series मध्ये जसं एक बायको तिच्या abusive नवऱ्याचा खून करते आणि तो बाकी बायका लपवून ठेवतात, ते आपण करू शकतो हे तिचे शब्द होते, ज्याला मी नाही म्हणाले आणि पूर्णपणे वेगळी कथा बांधायचं ठरलं).

फिल्म लंडनमध्ये एका ट्रेनमध्ये चित्रित करायची, म्हणजेच त्या महिला काही वेळ सुरू असलेल्या आणि मग बंद पडलेल्या ट्रेनमध्ये अडकून पडतील हेही माझ्या हजेरीत ठरलं. पण फिल्म तातडीने म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये चित्रीत करायची असल्यामुळे मी सांगितलं की मला माझ्या सोयीसाठी एक सह-लेखक असेल तर आवडेल.

मी स्वतः विराजस कुलकर्णी ह्याचं नाव सुचवलं. विराजस जेव्हा पहिल्यांदा मीटिंगसाठी आला तेव्हा स्वतःबरोबर त्याचा एक सह-लेखक घेऊन आला, ज्याची मला आधी कल्पना नव्हती. ह्या आमच्या दोन मीटिंग्ज नंतर एक आठवड्याने तिसरी मीटिंग करून कथा बांधायला सुरुवात करायची असं ठरलं.

"पुढच्या आठवड्यात भेटूया" ह्या वाक्यानंतर मला परितोष पेंटरकडून एकही फोन आला नाही. आणि दोन दिवसांपूर्वी मला थेट परितोष पेंटर निर्मित मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित विराजस कुलकर्णी लिखित फक्त महिलांसाठी पीएमएस नावाची फिल्म अनाउन्स झालेली दिसली.

सेल्फी नाटकाचं पोस्टर

फोटो स्रोत, Facebook

'सेल्फी' नाटकाचा मूळ गाभा हा आहे की, पाच वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या महिला एका ट्रेन प्रवासासाठी भेटतात, एका अशा जागी अडकून पडतात जिथून त्यांना चटकन बाहेर पडता येत नाही आणि त्यानंतर त्यांचा एकत्र होणारा आंतरिक प्रवास... मृणालने काल दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचा हाच गाभा सांगितला आहे, फक्त पाच ऐवजी चार बायका आहेत आणि अर्थातच प्रवासात घडलेल्या घटना वेगळ्या असतील,कारण त्या नाटकापेक्षा चित्रपटासाठी वेगळ्या कराव्याच लागतात.

'सेल्फी' मध्येही सगळ्यांपासून पळून, लपून छपून प्रवास करणारी एक व्यक्तिरेखा होती, जिच्यासाठी पोलीस तपास सुरू असतो. फक्त तो नाटकात दाखवला गेला नव्हता. असा एक पोलीस तपास चित्रपटातही आहे असं मृणालच्या मुलाखतीवरून दिसतंय. शिवाय तो चित्रपटाच्या कथेत आणायचा हे आमच्या मीटिंगमध्ये ठरलं होतंच.

मी परितोष पेंटरशी या संदर्भात बोलले. त्याने अर्थातच मला सांगितलं की, आता कथा वेगळी असल्यामुळे मला पुढे काहीही कळवण्याची त्यांना गरज वाटली नाही. तो कामाच्या गडबडीत असल्यामुळे मला फोन करून कळवायचंही राहून गेलं की आता विराजसच ती फिल्म लिहिणार आहे. अर्थातच त्याने मूळ नाटकाच्या लेखकाला कुठल्याही प्रकारचे क्रेडिट देणं किंवा हक्क विकत घेण्याचा विचार केला नाहीये.

आता कथा वेगळी असली तरीही हा चित्रपट माझ्याबरोबर सुरू केला होता, त्यामुळे तो 'सेल्फी'वरचाच आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. शिवाय ट्रेनच्या प्रवासात असणाऱ्या वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या स्त्रिया व त्यांचा एकत्र प्रवास हा मूळ गाभा अजूनही तोच आहे. ज्या निर्मात्याने माझं 'सेल्फी' हे मराठी नाटक त्याला प्रचंड आवडलं म्हणून इंग्रजी आणि हिंदी मध्ये produce केलं, तो जेव्हा हाच concept घेऊन चित्रपट करतो,तेव्हा मात्र तो विराजस कुलकर्णी ह्याचा ओरिजिनल concept आहे ह्यावर विश्वास कसा ठेवायचा?'

या दोन्ही स्क्रिप्ट पूर्ण वेगळ्या- विराजस कुलकर्णी

फक्त महिलांसाठी या चित्रपटाचे लेखक विराजस कुलकर्णी यांची याबद्दल काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं त्यांच्याशी संवाद साधला.

विराजस कुलकर्णी

फोटो स्रोत, Instagram

विराजस यांनी म्हटलं, "शिल्पा ताई आणि मी एकदाच भेटलो होतो. पारितोष यांच्याच ऑफिसमध्ये भेटलो होतो. सेल्फी या नाटकावर सिनेमा करायचा आहे. शिल्पा नवलकर यांना वेळ नाही, असं त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे मी आणि माझा सहलेखक ओमकार गोखले निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो."

"पेंटर यांनी 'सेल्फी' नाटक हिंदी आणि इंग्रजीत प्रोड्युस केलं होतं. त्यामुळे त्या मीटिंगमध्ये साधारण निर्माते, मृणाल कुलकर्णी आणि स्वतः शिल्पा या सगळ्यांचाच साधारण सूर असा होता की पुन्हा तेच करण्यापेक्षा नवीन स्क्रिप्ट डेव्हलप करता येईल.

सेल्फी या नाटकात ड्रामा होता. त्याऐवजी थ्रिलर-कॉमेडी असा प्लॉट निर्मात्यांना हवा होता. ही कथा युकेत घडते अशीही चर्चा झाली. त्यानुसार आम्ही लिहायला होकार दिला. ओमकार आणि मला साईन करण्यात आलं.

त्यानंतर शिल्पा नवलकर आणि प्रोड्युसर यांचं नेमकं काय बोलणं झालं होतं, हे मला खरंच माहीत नाही," असं विराजस यांनी सांगितलं.

"सेल्फी आणि फक्त महिलांसाठी या दोन्ही स्क्रिप्ट पूर्णपणे वेगळ्या आहेत. दोन्ही कथांच्या क्रेंद्रस्थानी महिला आहेत, हेच साधर्म्य आहे. स्क्रिप्ट न वाचता हा गैरसमज झाल्यामुळे वाईट वाटतं," असं विराजस यांनी म्हटलं.

पारितोष पेंटर यांचं काय म्हणणं?

पारितोष पेंटर यांनी 'मुंबई टाइम्स'शी बोलताना त्यांची भूमिका मांडली होती.

त्यांनी म्हटलं की, "महिलांवर आधारित सिनेमा करण्यासाठी शिल्पा यांच्याकडे सेल्फी नाटकावर सिनेमा करण्यासाठी विचारणा केली होती. त्यांच्याशी बोलल्यानंतर मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी 'ऑन बोर्ड' आले."

"दरम्यान, विराजसनं त्याच्या एका कथेवर 'फक्त महिलांसाठी' हा सिनेमा लिहिला. सेल्फी नाटकाचा आणि या सिनेमाचा काहीही संबंध नाही," असंही पारितोष पेंटर यांनी म्हटलं.

नव्या कथेवर आम्ही सिनेमा करतोय; हे शिल्पा यांना सांगायचं माझ्याकडून राहून गेले. त्यासाठी मी क्षमस्व आहे, असंही पारितोष यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)