एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट मध्यरात्री आमने-सामने, शिवसेना भवन परिसरात नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील दादरच्या शिवसेना भवन परिसरात आयोजित एका गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट मिरवणुकीदरम्यान आमने-सामने आले. यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील दोन गट आमने-सामने येण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. पण कालच्या या प्रकरणात थेट गोळीबारापर्यंत विषय गेल्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊ.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या दादर पश्चिम परिसरात शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय आहे. हा परिसर शिवसेनेचेच आमदार असलेल्या सदा सरवणकर यांच्या माहीम मतदारसंघात येतो.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सदा सरवणकर हे त्यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना भवन ज्या मतदारसंघात आहे, तेथील शिवसेना आमदारच उद्धव ठाकरेंच्या विरोधी गटात गेल्यामुळे येथे गेल्या काही दिवसांपासून राजकीय तणाव कायम आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत सर्वत्र मिरवणुकांची लगबग सुरू होती. येथील प्रभादेवी परिसरात शिवसेना पक्षाच्या वतीने (ठाकरे गट) नेहमीप्रमाणे एक मंच उभारण्यात आला होता. येथून गणेशभक्तांना सरबत वाटप केलं जात होतं. याच मंचाच्या बाजूला शिंदे गटात गेलेले आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनीही मंच उभारला होता.
शुक्रवारी (9 सप्टेंबर) रात्री मिरवणुका सुरू असताना शिवसैनिक (ठाकरे गट) आणि सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. यामुळे तणाव वाढला होता. पण पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
यानंतर पुन्हा काल म्हणजेच शनिवारी (10 सप्टेंबर) रात्री उशिरा ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच सरवणकर यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. याच दरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. पण सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पोलिसांनी काय म्हटलं?
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. याविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रणय अशोक म्हणाले, "काल रात्री 12 ते 12.30 या वेळेत दोन गटात प्रभादेवी भागात फाईट झाली. या अनुषंगाने दादर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल केले आहेत."

"दोन्ही गुन्ह्यांमध्ये पाच ते दहा आरोपींवर दंगलीसंदर्भात केस दाखल केली आहे. आजच्या केसमध्ये आर्म्स अॅक्ट एफआयआर दाखल केली आहे. याची चौकशी सुरू आहे. आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांची ओळख पटताच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल," असंही प्रणय अशोक यांनी सांगितलं.
शिवसेना खासदार आरविंद सावंतांनी काय आरोप केले?
प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. तर येथील विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह इतर पाच शिवसैनिकांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.

या कारवाईविरोधात शिवसेनेचे बडे नेते रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
माध्यमांशी बोलताना खासदार सावंत म्हणाले, "सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून दोन ठिकाणी गोळीबार केला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसैनिक गेले असता पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत."
"शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. आमच्या अनिल परब यांनी कायद्याचा कीस काढून पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला," असंही सावंत यांनी म्हटलं.
अखेर शिवसेना नेत्यांच्या मागणीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले महेश सावंत यांच्यासह पाच नेत्यांना सोडण्यात आलं.
आमदार सदा सरवणकारांचं काय म्हणणं आहे?
मुंबई पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना सदा सरवणकर म्हणाले, "विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचं स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. गेली अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. एका बाजूला मनसेचा स्वागत कक्ष होता. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एका शिवसेनेचं होतं. मी फार उशिरा तिथे गेलो. पण तिथे सुरुवातीपासूनच हावभाव करणं वगैरे असं सुरू होतं. हे दुर्दैवी आहे."

"सणासुदीला एकमेकांना डिवचण्याचे प्रकार व्हायला नको होते. ज्यावेळी मी तिथे गेलो. मी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 11 वाजता पोलिसांनी आम्हाला विनंती केली की हे बंद करा. त्यानंतर मी आमच्यासोबत असलेल्या सगळ्यांना घेऊन निघून आलो", असं स्पष्टीकरण आमदार सरवणकर यांनी दिलं.
यानंतर काल रात्री घडलेल्या प्रकाराविषयी बोलताना ते म्हणाले, "गणपती विसर्जनाच्या दिवशी एकमेकांना डिवचण्याचा प्रकार झाला. त्यानंतर तो वाद तिथे संपायला हवा होता. मात्र 30 ते 40 लोकांनी आमचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या घरी जाऊन हल्ला केला. माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळी मी तिथे गेलो आणि त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो."
पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. हे आरोपही सरवणकर यांनी फेटाळून लावले.
ते म्हणाले, "मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करत असल्याने मला बदनाम करण्यासाठी रणनीती आखली जातेय. हा प्रकार त्याचाच हा एक भाग आहे. मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे. मी भांडणं करून मोठा झालेलो नाही. मला थांबवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. परवाना असलेलं पिस्तुल माझ्याकडे आहे, पण माझ्याबरोबर स्टेनगन असलेली पोलीस फौज असताना मला त्याची काय गरज आहे."
उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक
दरम्यान, पोलिसांनी सोडल्यानंतर महेश सावंत यांच्यासह इतर शिवसैनिक मातोश्री येथे दाखल झाले.

फोटो स्रोत, Shivsena
त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत तसंच इतर शिवसैनिकांचं विशेष कौतुक केलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























