अमरावती : 'ती' तरुणी स्वतःहून पळून गेल्याचं तपासात निष्पन्न, लव्ह जिहादचा होता आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा

फोटो स्रोत, Nitesh raut

फोटो कॅप्शन, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमरावती येथे घरातून बेपत्ता असलेल्या तरुणीच्या संदर्भात कथित लव्ह जिहादचा आरोप विविध संघटनांकडून करण्यात येत होता. पण या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून बेपत्ता तरुणी स्वतःहून घरून निघून गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

संबंधित मुलगी कौटुंबिक कारणामुळे घरातून निघून गेली होती. त्यासाठी तिने 3 हजार रुपये बँकेतून काढले होते.

शिवाय, तिचा आंतरधर्मीय विवाहसुद्धा झालेला नाही, अशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली आहे.

संबंधित तरुणीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता.

ही मुलगी पुणे ते सातारा रेल्वेने एकटी प्रवास करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

पोलीस आज (8 सप्टेंबर) सायंकाळपर्यंत संबंधित तरुणीला अमरावती येथे आणतील. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित इतर अनेक गोष्टीही पुढे येतील, असं पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

संबंधित प्रकरणात बुधवारी (7 सप्टेंबर) अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. रुक्मिणीनगरमध्ये राहणारी एक तरूणी बेपत्ता असल्याची ती तक्रार होती.

ही तरुणी 6 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. तिला बळजबरीने पळवून नेण्यात आले आहे, अशा स्वरुपाची तक्रार या प्रकरणात तिच्या आईने दाखल केली होती.

पोलिसांनी तक्रार नोंदवून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, या प्रकरणात राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांचा प्रवेश झाला.

हे प्रकरण 'लव्ह जिहाद'चं असल्याचा दावा स्थानिक भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जाऊ लागला.

संबंधित मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करावं, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात येत होती.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह

फोटो स्रोत, Nitesh raut

फोटो कॅप्शन, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह

यामुळे या प्रकरणाकडे माध्यमांचंही लक्ष वेधलं गेलं.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी त्यावेळी म्हटलं होतं, "बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे. तरुणीच्या आईवडिलांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचं पथक जिल्ह्यात युवतीचा शोध घेत आहेत. तिचा शोध लागल्यानंतर आणि तिच्या स्टेटमेंटनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या प्रकरणातील तपास सुरू आहे."

अमरावतीत कथित 'लव्ह जिहाद'वरून राजकारण?

या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्तांवर अनेक गंभीर आरोप या मुद्द्यावरून केले होते.

त्या मुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत असताना पोलिसांनी माझ्या फोनचं रेकॉर्डिंग सुरू केलं होतं, असं त्या म्हणाल्या.

"लव्ह जिहादचा मुद्दा प्रत्येक ठिकाणी आहे. अमरावतीत हे प्रकरण जास्त प्रमाणात सुरू असून पाच-सहा मुलांचा एक ग्रुप मुलींना पळवून नेण्याचं काम ते करतात. आमच्या मुली सुरक्षित आहेत की नाही, याचं उत्तर आम्हाला हवं आहे, असा आरोप राणा यांनी केला.

एक मुलगा दोन वर्षांपासून त्या मुलीच्या मागे लागलेला होता, त्याला पोलिसांनी अटकही केली आहे, त्याची चौकशी करा, सगळं एका तासात बाहेर येईल, असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.

अमरावती परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचा वाद सातत्याने निर्माण होताना दिसत आहे. कथित लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी चांगलेच रान उठवलं.

राजापेठ पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईसोबत खासदार नवनीत राणा

फोटो स्रोत, Nitesh raut

फोटो कॅप्शन, राजापेठ पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईसोबत खासदार नवनीत राणा

नुकतेच भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही असंच एक प्रकरण बाहेर काढल्याचा दावा केला होता.

मेळघाटातल्या धारणी तालुक्यात समोर आलेल्या प्रकरणाचा संबंध खासदार बोंडे यांनी कथित लव्ह जिहादशी जोडलं होतं.

संबंधित मुलगी सापडल्याचं पोलिसांनी सांगितल्यानंतर खासदार अनिल बोंडे यांनी एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केला.

संबंधित प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा त्यांचा दावा कायम असून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा दावा त्यांनी या व्हीडिओमध्ये केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यानंतर आता 7 सप्टेंबर रोजी बेपत्ता तरूणीच्या तक्रारीबाबत कळताच भाजपने पुन्हा आरोप सुरू केले होते.

मुलीचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या सुपूर्द करावं, अशी मागणी करताना भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले, "कालपासून मुलगी बेपत्ता आहे. विशिष्ट जातीच्या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेलं आहे. त्यातला संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पण, तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देतो आहे."

"हे प्रकरण विशिष्ट आहे. आतापर्यंत अशाच प्रकारची पाच प्रकरणे झाली आहेत. अशा प्रकरणामुळे आमच्या मुलींना धोका निर्माण झाला आहे. संबंधित मुलीचा शोध पुढील काही तासांत लागला नाही, तर तीव्र आंदोल करू, असा इशाराही कुलकर्णी यांनी दिला होता.

राजापेठ पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करताना एका तरूणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. पण, बेपत्ता मुलीचा शोध घेणं सुरू असल्याने तिच्या जबाबानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असं त्यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

अखेर, पोलिसांच्या प्राथमिक तपास मुलीने स्वतःहून घर सोडल्याचं निष्पन्न झालं आहे, असं मुलीचा शोध घेतल्यानंतर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी म्हटलं आहे.

मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

या प्रकरणावर मत व्यक्त करताना लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांनी हे मतांच्या ध्रुवीकरणासाठीचे प्रयत्न असल्याचा दावा केला.

बीबीसी मराठीशी बोलताना अटाळकर म्हणाले, "या प्रकरणावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पण अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी मतांच राजकारण करण्याचा प्रभावीपणे अजेंडावर आलं आहे. खासकरून भाजप याकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतं."

ते पुढे म्हणतात, "भाजपला असे मुद्दे 2024 पर्यंत पुरवायचे आहेत. महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आल्यावर हे प्रभावीपणे राबवलं जात आहे. त्यांना मतांचं ध्रुवीकरण करायचं असल्याचं स्पष्टपणे निदर्शनास येतं. मुळात अशी प्रकरणे काही नवीन नाहीत. पण ती आताच नेमकी का पुढे येत आहे. यावरून ते स्पष्ट होतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)