You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सायरस मिस्त्रींना रतन टाटांनी 'या' कारणामुळे टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून हटवलं होतं...
शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात निधन झालं आहे. पालघरमधील कासा पोलीस ठाण्यानं सायरस मिस्त्रींच्या निधनाची माहिती दिली.
सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमधून गुजरातमधील अहमदाबादमधून मुंबईकडे येत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार दुभाजकाला धडकल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली.
कारमध्ये एकूणच चारजण होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
टाटा कुटुंबीयांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते केवळ दुसरे गृहस्थ होते. मात्र, टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात अडकली. मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं.
रतन टाटा 2012 मध्ये निवृत्त झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांना टाटा ग्रुपचं चेअरमन बनवण्यात आलं होतं. कंपनी कायद्याचं उल्लंघन करून मला हटवण्यात आलं, असा दावा मिस्त्री यांनी केला होता. त्याचसोबत त्यांनी टाटा सन्सच्या व्यवस्थापनाविरोधात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.
मिस्त्री यांनी चार वर्ष टाटा समूहाचं अध्यक्षपद सांभाळलं होतं.
टाटा ग्रुप विरुद्ध सायरस मिस्त्री प्रकरणात सुप्रीम कोर्टाने टाटा ग्रुपच्या बाजूने निर्णय दिला होता. भारताचे सरन्यायाधीश अरविंद बोबडे यांनी सुनावणीवेळी म्हटलं, याप्रकरणी सर्व कायदे टाटा यांच्या बाजूनेच आहेत.
शेअर्स प्रकरणी कायदेशीर मार्ग निवडायचा का, याचा निर्णय टाटा सन्सने घ्यावा असं कोर्टाने आपल्या निर्णयात सांगितलं होतं.
सायरस मिस्त्री यांना का हटवण्यात आलं?
सायरस मिस्त्री रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली आधीपासूनच काम करत होते. मात्र, त्यांनी परस्पर निर्णय घ्यायला सुरुवात केले होते. पण सायरस हे मृदूभाषी आणि समंजस असल्याचं त्यांचे मित्र सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार एमके वेणू सांगतात, "2002 ते 2008 या कालावधीत भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेने भरारी घेतली तेव्हा रतन टाटा यांनी जागतिक कंपन्या ताफ्यात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. या काळात रतन यांनी कोरस, टेटली आणि अनेक हॉटेल्स ताब्यात घेतले.
"यापैकी अनेक अधिग्रहण योग्य नव्हते. मिस्त्री टाटा समूहाचे अध्यक्ष झाल्यानंतर वारसा हक्काने त्यांना जे मिळालं त्यापैकी तोट्यात असणाऱ्या कंपन्या त्यांनी विकायला सुरुवात केली. काही प्रमाणात असं करणं म्हणजे रतन टाटा यांनी घेतलेले निर्णय बदलण्यासारखं होतं. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून मतभेद असावेत. ज्यामुळेच मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं".
तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
18 डिसेंबर 2019 रोजी टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी चुकीची असल्याचा निर्वाळा एका न्यायालयाने दिला होता. 110 अब्ज डॉलर मूल्य असलेल्या टाटा समूहासाठी हा एक मोठा झटका मानला गेला होता.
नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलच्या (NCLAT) दोन न्यायधीशांनी आज हेही म्हटलं की, कंपनीचे चेअरमन इमेरिटस (मानद अध्यक्ष) रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांच्याविरुद्ध केलेली कारवाई बेकायदेशीर होती. 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून हटवून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी नेमणूक चुकीची होती, असंही NCLATने आपल्या निर्णयात म्हटलं होतं.
मिस्त्री हे टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते. रतन टाटा यांनी 2012 मध्ये निवृत्तीनंतर टाटा ग्रुपची सूत्रं सायरस मिस्त्री यांच्या हाती सोपवली.
मिस्त्री परिवार आणि त्यांच्या दोन गुंतवणूक कंपन्या - सायरस इन्व्हेंस्टमेंट्स आणि स्टर्लिंग इन्व्हेंस्टमेंट्स प्रा. लि. - यांची टाटा सन्समध्ये सर्वांत जास्त, म्हणजे 18.4 टक्के भागीदारी आहे.
मात्र ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं होतं. काही वेळाने त्यांची कंपनीच्या संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2017 मध्ये टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS)चे व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन यांची टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याविरुद्ध त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये तक्रार दाखल केली. हे कंपनीच्या कायद्यांचं उल्लंघन आहे असं सांगत सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या व्यवस्थापनात गैरव्यवहाराचा आरोपही केला होता.
सायरस मिस्त्री : आयर्लंडमध्ये जन्म, लंडनमध्ये शिक्षण
सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी यांचे सर्वात लहान पुत्र. त्यांचं कुटुंब आयर्लंडमध्ये सर्वाधिक श्रीमंत भारतीय कुटुंबांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
सायरस यांचा जन्मही आयर्लंडमध्येच झाला होता. पुढे लंडन बिझनेस स्कूल येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
सायरस यांनी शापूरजी पालोनजी अँड कंपनीत 1991 पासून काम सुरू केलं. त्यानंतर 1994 साली त्यांना शापूरजी पालनजी समूहाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं.
सायरस यांच्या नेतृत्वात शापूरजी पालनजी अँड कंपनीने तुफान नफा कमावला. त्यांचा व्यवसाय दोन कोटी पाऊंडवरून सुमारे दीड अब्ज पाऊंडपर्यंत पोहोचला.
कंपनीने जहाजबांधणी, तेल-गॅस आणि रेल्वे क्षेत्रात काम केलं. यादरम्यान कंपनीचा बांधकाम व्यवसाय दहा देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पसरला.
सायरस यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने भारतात अनेक विक्रम प्रस्थापित केले. यामध्ये सर्वात उंच रहिवासी इमारत, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठ्या बंदराचं बांधकाम या कामांचा समावेश आहे.
टाटा सन्सच्या संचालक मंडळात सायरस मिस्त्री यांचा समावेश 2006 साली करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार एम. के. वेणू यांच्या माहितीनुसार टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर्स सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाकडेच आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)