You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गणेशोत्सव 2022 : शॉर्ट कपडे घालून दर्शनाला गेलेल्या गायिकेला मंडळानं दिली शाल, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. शॉर्ट कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेला मंडळानं दिली शाल
सध्या सगळीकडे गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकार मुंबई येथील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी जातात. मुंबई येथील प्रसिद्ध अशा गणपतीपैकी अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी गायिका लीझा मिश्रा गेली होती.
मात्र लीझा मिश्रा तोकडे कपडे घालून आली होती. त्यामुळे तिला अंधेरीच्या राजाच्या मंडळाकडून शाल देण्यात आली. त्यानंतरच लिझाला गणपती बाप्पाचे दर्शन घेता आले आहे.
अंधेरी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी पूर्ण शरीर झाकतील अशीच कपडे परिधान करावीत, असा नियमच मंडळाने केला असल्याचा सांगितलं जात आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
2. बेरोजगारीचा दर यावर्षीच्या उच्चांकावर
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये 8.3 % असून ते एका वर्षातील उच्चांकावर पोहचला आहे.
जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 6.8 % होता आणि रोजगार 397 दशलक्ष होता, असं CMIE नं म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
"शहरी बेरोजगारीचा दर सामान्यतः ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त म्हणजे जवळपास (8 %) असतो. ग्रामीण भागात हा दर 7 % असतो. ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचा दर 9.6 टक्क्यांपर्यंत वाढला आणि ग्रामीण बेरोजगारीचा दरही 7.7 टक्क्यांपर्यंत वाढला, " असं CMIEचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी पीटीआयला सांगितलं.
व्यास पुढे म्हणाले की, अनियमित पावसामुळे पेरणीच्या कामांवर परिणाम झाला आणि हे ग्रामीण भारतातील बेरोजगारी वाढण्याचे एक कारण आहे.
3. पुण्यात उडत्या बसेसची योजना
पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली, तर पुण्यातल्या वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"आम्ही 165 रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात 150 लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक गेली, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते.
"इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत 60 लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो", असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं.
4. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात घमासान सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तोडीस तोड देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. यासाठीस शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे.
विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित रहावे याकरिता शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.
5. नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण
जळगावमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी क्लासमधील शिक्षिकेने नऊ वर्षाच्या बालकाला कपडे काढून बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे. आपल्याला नेहमी मारहाण होत असल्याची तक्रार बालकाने पालकांकडे केली होती.
मुलाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी पालकांनी अचानक क्लासमध्ये प्रवेश केल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
शिक्षिकेने बालकाला कपडे काढून बुक्क्यांनी मारहाण केल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. मुलाच्या पालकांनी सदर प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत संबंधित प्रकार उघड केला. शिक्षकेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)