You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका, 'आधी झोपा काढल्या अन आता...' #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. कामाच्या वेळी झोपा काढल्या अन आता..- बावनकुळे
"मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे काम करण्याची चांगली संधी होती. त्या दरम्यान मात्र, त्यांनी 18-18 तास झोपा काढल्या आणि आता हातातून सर्वकाही निघून गेल्यावर राज्यभर दौरे करायचे काय कामाचे," अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्याअनुषंगाने आज आदित्य ठाकरे हे नागपुरात दाखल झाले. पक्ष संघटनेच्या कामाबरोबरच ते येथील तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावरूनही आदित्य ठाकरेंवर टीका झाली.
2. रोहित पवार ईडीच्या फेऱ्यात
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यावरच आता रोहित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले आहेत की, ''मी दिवसभर सृजन भजन स्पर्धेच्या नियोजन होतो. मीडियाच्या माध्यमातून चौकशीचा मुद्दा कळला.'' ते म्हणाले, मी आधीही केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं आहे. आताही करणार.'' 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
ईडी चौकशीबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले आहेत की, ''जे सांगण्यात आलं आहे, ते कुणी सांगितलं? ती बातमी कोणी दिली? काय ती बातमी आहे? याबाबत काय कागद आहेत, हे मी पाहिलेलं नाही. हे मला बघावं लागेल आणि बघितल्यानंतर नक्कीच मी याबाबत बोलेल.''
ते म्हणाले की, ''जर मला बोलवलं, तर मी आधीही सहकार्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकवेळा केंद्रीय यंत्रणांनी मला, माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. सत्तेत येण्याच्या पाच वर्ष आधीही देखील सीआयडी आणि इतर संस्थांनी माझी आणि माझ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. त्यावेळी जसं सहकार्य केलं, तसेच मी यावेळी ही करेन.''
3. मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे- संभाजीराजे
"फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे," असं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
"पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही," असे मत संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडले आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (27 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले. या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नसल्याचा आरोप काही मराठा नेत्यांनी केला. तर छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली.
"माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवले नाही. माझा राजवाडा, घरदार सोडून वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी कित्येक महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो," असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.
4. शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय मुंबईत नव्हे तर ठाण्यात
शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यात राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाण्यात टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यलय हेच शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईतील पहिले विभागप्रमुख म्हणून यशवंत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ही नियुक्त जाहीर करताना शिंदे गटाने जे पत्र प्रसिद्ध केलंय त्यात त्यांचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे टेंभी नाका येथील आनंद आश्रम असा पत्ता लिहिण्यात आलाय.
'आनंद आश्रम' म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे निवासस्थान आणि कार्यालय. आनंद दिघे यांचा निवासस्थान आणि कार्यालय हेच आता शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून दाखवण्यास येत आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना उभारणार असल्याची माहिती समोर आली होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांसोबत संपर्क राहण्यासाठी प्रत्येक प्रभागात शिंदे गट कार्यालया उभं करणार असल्याची माहिती समोर आली होती.
5. खैरेंचा अगोदर सत्कार, शिरसाट चिडले; मंच सोडून निघाले
राज्यात सध्या मुळ शिवसेना आणि शिंदे शिवसेना गट यांच्या वाद सुरू आहे. या वादाचे पडसाद पोलीस आयुक्तालयांकडून गणेश उत्सवानिमित्त आयोजित समन्वय बैठकीत पडले.
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले. हे प्रोटोकॉल नुसार चुकीचे असल्याचे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते.
दरम्यान बाजूलाच बसलेल्या एम.आय.एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील त्यांचा हात धरून रोखले व त्या नंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालायच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेल्या नेत्यांच्या रुसवे फुगव्याची मात्र जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित या बैठकीत सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. खैरेंचे नाव ऐकताच आमदार संजय शिरसाट संतापले खुर्चीवरून उठून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रोटोकॉल नुसार माझा सत्कार खैरे यांच्या अगोदर करायला हवा असे म्हणत ते मंच सोडून जात होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांचा हात धरत खाली बसविले. पोलीस आयुक्तालयाने प्रोटोकॉल पाळला नसल्याबाबत उघड नाराजी व्यक्त करताच, खासदार जलील यांनी त्यांचा हात धरला. त्यांची समजूत काढून शांत केले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)