You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आमटे यांना कॅन्सरवरील उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज देण्यात आलंय. प्रकृतीमध्ये सुधार असल्याने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
डॉ. प्रकाश आमटेंना डिस्चार्ज मिळताच कुटुंबीय व लोक बिरादरी प्रकल्पाचे स्वयंसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शुक्रवारी रात्री ते नागपूरला पोहचणार असून काही दिवस ते येथेच विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पालाकडे जाणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कर्करोग असल्याचे निदान झाल्यापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
गेल्या 45 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतारही झाले होते. पण या दीड महिन्याच्या काळात पाच किमोथेरेपी देऊन उपचार सुरु होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
2.भारतीय फुटबॉल संघटनेवरची बंदी फिफाने उठवली
अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी 11 दिवसांनी उठवण्याचा निर्णय 'फिफा'ने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कुमारी (17 वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
'एआयएफएफ'च्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे 'फिफा'ने 15 ऑगस्ट रोजी बंदी घातली होती. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समिती हटवण्याच्या आदेश दिल्यानंतर 'फिफा'ने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. 'एआयएफएफ'च्या होणाऱ्या निवडणुकीवर 'फिफा' व 'एएफसी' यांची नजर राहील. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मदत केली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात फुटबॉल विश्वचषक भारतात होणार आहे. बंदी उठल्यामुळे विश्वचषकाच्या आयोजनाचा मार्ग सुकर झाला आहे.
3.माजी मंत्री अनिल देशमुख यांना चक्कर, रुग्णालयात उपचार
अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात छातीत दुखणे तसेच चक्कर आल्यामुळे शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. देशमुख यांची स्थिती स्थीर असून त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आल्या. देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्यावर्षी 21 एप्रिलला भ्रष्टाचाराप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या आधारे गेल्यावर्षी 11 मे रोजी ईडीने याप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये चार कोटी 70 लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी 2021 या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता. याप्रकरणी देशमुख यांना ईडीने गेल्यावर्षी 1 नोव्हेंबरला अटक केली होती. सध्या ते न्यायबंधी म्हणून आर्थररोड तुरुंगात आहेत.
4. माझा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्यांना अटक का नाही? - टी. सिंह
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपाचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांनी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. तुरुंगात जाण्याची भीती बाळगत नाही, असे या व्हिडीओत सिंह यांनी म्हटले आहे. मुंडकं छाटायला मी काही प्राणी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील धमक्यांवर त्यांनी दिली आहे. माझा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी का अटक केली नाही? असा सवालही सिंह यांनी केला आहे.
23 ऑगस्टला सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या सिंह यांना आज पुन्हा अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना उद्देशून "ना हम गोली से डरते है, ना फाँसी से, नाही जेल जाने से" असे सिंह यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. "माझ्या देशाला किंवा धर्माला कोणी वाईट म्हणत असेल तर त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. हिंदू आता मागे हटणार नाही", असं कॅप्शन सिंह यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओला दिलं आहे.
5.काँग्रेसवर कोणाची वैयक्तिक मालकी नाही- पृथ्वीराज चव्हाण
"सोनिया गांधी होत्या तेव्हा विजय मिळत गेला. आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हवं होतं. निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते मान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत, असा सवाल करत काँग्रेस पक्षाला वाचवायचा असेल निवडणूक घ्यायला हवी", अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
"डिसेंबर महिन्यात सोनिया गांधींसोबत आम्ही 5 तास चर्चा केली. त्यात चिंतन शिबीर, निवडणुका घेण्याचं मान्य केले. मात्र, त्यालाही बराच वेळ झाला. त्यानंतर केरळ, आसाम, यूपी, पंजाबच्या निवडणुकीत पराभव झाला. पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय कुणी घेतला"? असा सवालही त्यांनी केला.
राहुल गांधी अध्यक्ष असतील तर काय हरकत नाही. मात्र, ते निवडणुकीतून समोर आले पाहिजे. जी-23 लोकांनी जे पत्र दिले ते गोपनीय पत्र लीक झाले. त्यानंतर राजकारण सुरू झाले. आमची बंडखोरी करण्याचा विषय नव्हता. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)