You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गायींच्या तस्करीत सामील 5 लोकांना मारलं', भाजप नेत्याचं धक्कादायक विधान
आम्ही गायीच्या तस्करीमध्ये सामील असणाऱ्यांना 5 जणांना मारले आहे असं धक्कादायक विधान भाजप नेते आणि माजी आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी केलं आहे.
गोविंदगड येथील चिरंजी लाल नावाच्या व्यक्तीला चोर असल्याचे समजून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चिरंजी लाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ज्ञानदेव आहुजा गोविंदगड येथे गेले होते. पोलिसांच्या मते ट्रॅक्टर चोरीसंदर्भात ओळख चुकीतून हा प्रकार घडला आहे.
यावेळी आम्ही पाच जणांची हत्या केली आहे, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर व्हायरल झाला. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, असं दोतासरा यांनी म्हटलं होतं.
दरम्यान भाजपने अहुजा यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला बाजूला केलं आहे. भाजप राजस्थानचे मुख्य प्रवक्ता रामलाल शर्मा यांनी सांगितलं की "भाजपचा लोकशाही आणि घटनेवर विश्वास आहे. कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. कोणी अपराध केला असेल तर त्याला घटनेनुसार शिक्षा मिळेल. ज्ञानदेव यांनी जे म्हटलं आहे ते त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे. ते कोणत्या संदर्भात बोलत होते हे तेच सांगू शकतात."
"पंडितजी आम्ही आतापर्यंत पाज जणांना मारलं आहे. मग ते लालवंडी (रकबर मॉब लिंचिंग) असो किंवा बेहरोर (पेहलू खान मॉब लिंचिंग)असो. या भागात पहिल्यांदाचा त्यांनी कोणाचीतरी हत्या केली आहे," असे आहुजा म्हणताना दिसत आहेत. तसेच "गायींची कत्तल करण्यामागे जे असतील त्यांना मारण्यासाठी मी माझ्या माणसांना पूर्ण मोकळीक दिलेली आहे. आम्ही तुम्हाला जामिनावर सोडवू," असेदेखील आहुजा म्हणाले आहेत.
ज्ञानदेव आहुजा यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलवर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वानी गौतम यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. "स्थानिक पोलिसाच्या तक्रारीनुसार आहुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 153 ए अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असताना अतिरिक्त कलमे जोडली जातील," असे तेजस्वानी गौतम म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)