You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भावानं बहिणीच्या लग्नात तिला वडिलांचा फायबरचा पुतळा गिफ्ट दिला कारण...
हैदराबादमधले अव्हुला फानी कुमार यांनी आपल्या बहिणीला तिच्या लग्नात एक खास गिफ्ट दिलं, ते गिफ्ट होतं त्यांच्या वडिलांचा पुतळा.
लग्नमंडपात या फायबरच्या पुतळ्यासमक्षच त्यांनी बहिणीचं कन्यादान करत आईची इच्छा पूर्ण केली.
फानी अमेरिकेच्या टेनेसीमध्ये काम करतात. एप्रिल 2021 मध्ये, हैदराबादमध्ये राहणारे त्यांचे वडील सुब्रमण्यम यांच्यासह कुटुंबातल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाली.
फानी भारतात पोहोचेपर्यंत त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आठवडाभरातच त्यांनी कुटुंबातील आणखी 2 सदस्य गमावले.
अव्हुला फानी कुमार सांगतात, "माझ्या आई आणि बहिणीसाठी मी हा खास पुतळा तयार करून घेतला. बाबांच्या मृत्यूनंतर आईला त्यांची उणीव भासत होती. जेव्हा मी तिच्यासाठी काहीतरी करण्याचा विचार केला तेव्हा हा मला सर्वोत्तम पर्याय वाटला.
"माझी बहीण मला म्हणाली होती - 'बाबा तुझ्या लग्नात नाचले. माझ्या लग्नातही त्यांनी मस्त डान्स करावा, अशी माझी इच्छा होती. पण आता मी ते मिस करतेय तिच्या या शब्दांनी मी भावूक झालो आणि मी ठरवलं की फक्त बोलण्यापेक्षा मी असंच काहीतरी केलं तर बरं पडेल."
फानी यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यांची बहीण वैष्णवी अमेरिकेत होती. तिचं सांत्वन करतच फानी यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार केले. वडील गेल्यानंतर वैष्णवीला एकटेपणा जाणवत होता.
मात्र भाऊ आपल्या लग्नात वडिलांना अशाप्रकारे घेऊन येईल आणि त्यांच्यासमोर तिचं कन्यादान होईल, असा विचारही तिने कधी केला नव्हता.
वैष्णवी कुमार सांगतात, "सुरुवातीला मला धक्काच बसला. मी त्या पुतळ्याकडे बघायला तयारच नव्हते. मी दुसरीकडेच बघत होते आणि 'मला तिकडे बघायचंच नाहीये' असं म्हणू लागले. माझा नवरा मला म्हणाला 'त्यांना बघ...'. तोच मला वडिलांच्या पुतळ्याजवळ घेऊन गेला आणि त्यानं मला पुतळ्याला स्पर्श करायला लावला. तो म्हणाला 'बघ बाबा तुझ्या लग्नाला आले आहेत.' मात्र पुतळ्याला हात लावायची मला भीतीच वाटत होती.
"तो त्याच्याजवळही जाऊ शकत नव्हते. पण ज्या क्षणी मी त्याला स्पर्श केला, तेव्हा तो पुतळा मला खरा वाटू लागला. हाताचं वजन आणि सर्वकाही एकदम परफेक्ट वाटत होतं. मी त्यांना मिठी मारली आणि किस केलं, कारण मला जे गमावल्यासारखं वाटत होतं ते मला परत मिळालं होतं. त्यामुळे मी प्रचंड खूश होते."
फानी यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी ठरवलं की वडिलांचा असा पुतळा बनवावा. सुरुवातीला त्यांनी एक छोटासा पुतळा बनवला. त्यानंतर त्यांनी स्वतः वडिलांचं चित्र रेखाटलं. शेवटी त्यांनी एक पूर्णाकृती पुतळा लग्नात आणत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
फानी यांनी बंगळुरूमधून मेणाचा नाही तर सिलिकॉन फायबरचा हा पुतळा तयार करून घेतला. त्यासाठी आवश्यक तो कच्चा माल त्यांनी परदेशातून आयात केला. या पुतळ्यासाठी त्यांनी 8 लाखांहून अधिक रुपये खर्च केले.
अव्हुला फानी कुमार सांगतात, "आपण देवांच्या मूर्ती बनवतोच. आपण दगडाची पूजा करतो आणि त्यात देव शोधतो. बरोबर? मग मी माझ्या वडिलांना तसं का पाहू नये? मी विचार करत होतो की ज्या बाबांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, ते आता या जगात नाहीत, हे आम्ही का स्वीकारू शकत नाहीय? अखेर मी हे सत्य मान्य केलं आणि घरच्यांनाही ती वस्तुस्थिती स्वीकारायला शिकवलं. मग पुढे काय करायचं, याचा विचार करू लागलो."
जयश्री यांनाही हे स्वीकारणं जड जात होतं की त्यांचा आयुष्यभराचा साथीदार, ज्यांच्यासोबत त्यांनी 33 वर्षं BSNL मध्ये काम केलं, त्याचं अचानक निधन झालंय. मात्र या पुतळ्यामुळे आता तिला थोडा दिलासा मिळाला आहे.
फानी यांच्या आई जयश्री सांगतात, "ते अजूनही जिवंत आहेत आणि आपल्यातच कुठेतरी आहेत, ही भावना माझ्या मनात आहे. फक्त त्यांच्यात आता जीव नाहीये. याच भावनेनं मी खंबीर आहे. आता मी हळूहळू स्वत:ला सावरतेय. सुरुवातीला ते आमच्यात नाहीत, याचं मला वाईट वाटत होतं. पण आता मी बराच वेळ त्यांच्या पुतळ्यासोबतच घालवते. खरंतर आता कुठेही बाहेर जायचं असेल तर आम्ही आधी त्यांच्या पुतळ्याला तयार करतो."
फानी यांच्या वडिलांनी वापरलेले कपडे, अंगठी, चेन, शूज या पुतळ्याला अगदी व्यवस्थित बसतात. या सर्व आभूषणांनी सजवून ते आता या पुतळ्याला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जातात. फानी यांना रोबोटिक्सच्या मदतीनं प्रत्यक्ष चालणारा, बोलणारा रोबोटसारखाच पुतळा तयार करायचा होता. त्यांनी त्यांचे वडील हयात असताना बोललेले काही संवाद गोळा केले होते.
पण वेळ कमी असल्यानं बहिणीच्या लग्नापर्यंत ते शक्य झालं नाही. पण भविष्यात वडिलांचा रोबोट बनवता, यावा यासाठी ते सर्व व्यवस्था करतायत. आणि नंतर ते आपल्या वडिलांच्या रोबोटला अमेरिकेत सगळीकडे फिरायला घेऊन जाणारेत, जिथे त्यांच्या वडिलांची जाण्याची इच्छा होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)