उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करू - आशिष शेलार, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Ashish Shelar
आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.
1.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करू - आशिष शेलार
उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
आशिष शेलार म्हणाले, "मुंबई महापालिकेत गेल्या तीन दशकांपासून फक्त कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेने केलं. सांडपाणी निविदा प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्यातील घोळ यापासून नेत्यांना पळ काढता येणार नाही. सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय.
"त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही."
काल (12 ऑगस्ट) भाजपची कार्यकारिणी आज जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यानंतर शेलार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. "आता आमचं ठरलंय, मुंबई महापालिकेत बदल अटळ आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार," असं वक्तव्य शेलार यांनी यावेळी केलं आहे.
2.प्रति शिवसेना बांधली तरी देव मूळ शिवसेना भवनातच- जयंत पाटील
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचवेळी शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी शिंदे गटाकडून दादरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनीच दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Jayant Patil
या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय.
'प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे', अशा शब्दात पाटील यांनी शिंदेंना टोला लगावला आहे. टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.
3.पंतप्रधान पदाची आकांक्षा नाही, विरोधकांची मोट बांधणार- नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाची कोणतीही आकांक्षा नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र 2024 च्या निवडणुकांसाठी विरोधकांची मोट बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार ते म्हणाले, "मी हात जोडून सांगतो की पंतप्रधान होण्याची माझी अजिबात इच्छा नाही. कोणी मला हा प्रश्न विचारला तर मी त्याला फक्त हात जोडून प्रणाम करेन. जनतेसाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे. विरोधकांनी एकत्र काम करावं आणि पुढची वाटचाल करावी हीच माझी इच्छा आहे," असं ते पुढे म्हणाले.
4.मनुस्मृतीमुळे भारतीय महिलांना मानाचं स्थान- महिला न्यायाधीश
भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान असतात कारण भारतीय संस्कृती आणि मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचं स्थान दिलं आहे, असं विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशाने केलं आहे. यावेळी त्यांनी मनुस्मृतीतले काही दाखलेही दिले आहेत. यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी हे विधान केलं आहे. सिंग म्हणाल्या की, "मला खरंच वाटतं की भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचं स्थान दिलं आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे की जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याला काहीही अर्थ राहणार नाही.
"त्यामुळे मला वाटतं की महिलांचा आदर कसा करावा हे आपल्या पूर्वजांना आणि वैदिक ग्रंथांना माहित आहे."
5.उमेश कोल्हे प्रकरणात NIA कडून दहाव्या आरोपीला अटक
अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी दहाव्या आरोपीला अटक केली आहे. लोकमतने दिलेल्या बातमीनुसार शेख शकील शेख छोटू असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. 2 जुलै पासून NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. ही घटना घडल्यानंतर कोतवाली पोलिसांनी सात लोकांना अटक केली होती. त्यात या प्रकरणाचा सूत्रधार शेख इरफान यांच्यासह इतरांचा समावेश होता.नंतर या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























