You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Marathi : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी..
1. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे 5 अर्थ
होणार होणार म्हणताना स्थापनेनंतर 41 दिवसांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. तो एवढा का लांबवला याच्या अनेक शक्यता उघडपणे चर्चिल्या जात असतांना शिंदे आणि फडणवीस दोघेही सांगत होते की लवकरच विस्तार होईल. पण मुहूर्त आजचा मिळाला.
दोन्ही बाजूकडच्या नऊ-नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. वाटणी निम्मी झाली. विधानसभेत आमदारांची संख्या निम्मी नाही. भाजपाकडे शिंदेंपेक्षा दुपटीने आमदार आहेत. पण तरीही मुख्यमंत्रिपदासोबत अर्धी खातीही शिंदेंकडे आली आहे. याचा अर्थ असाही होतो की संख्याबळ कमी असतांना शिंदेंनी जोरानं वाटाघाटी केल्या. नव्या सरकारमधलं शक्तिसंतुलन कसं आहे याचा अंदाज या विस्तारावरुन यावा.
पण केवळ हे एकच या विस्ताराचं वैशिष्ट्य नाही. अनेक गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत. काही अडचणीचे प्रश्न आहेत. काहींवरुन सरकारच्या भवितव्यावरही शंका घेतल्या जाऊ शकतात. शिंदे सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आपल्याला काय सांगतो आणि काय विचारतो?
2. नोकऱ्या कशा वाढतील? नोकरीच्या शोधातील तरुणांनी काय करायला हवं?
एप्रिल 2014 ते मार्च 2022 या 8 वर्षांत केंद्र सरकारमधील विविध विभागांमध्ये निघालेल्या भरतीत स्थायी नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 22 कोटी उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती केंद्र सरकारने नुकतीच दिली आहे.
या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी एकूण 7.22 लाख उमेदवारांना अखेरीस संबंधित नोकरी मिळवण्यात यश आलं.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी केवळ 0.32 टक्के उमेदवारांनाच नोकरी मिळू शकली.
भारतात बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं हे केवळ एक उदाहरण आहे. अशा स्थितीत भारतातील नोकरीच्या शोधातील तरुणांनी काय करायला हवं?
3. लांग्या हेनिपाव्हायरस काय आहे? चिचुंद्रीशी त्याचा काय संबंध आहे?
चीनच्या वुहान प्रांतातल्या कोरोना व्हायरसने मागच्या दोन वर्षांत जगभरात थैमान घातले होते. आता यात नव्या लांग्या हेनिपाव्हायरसची भर पडली आहे. या नव्या व्हायरसच्या संसर्गामुळे अवघं जग पुन्हा चिंताग्रस्त झालंय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका चमूने हा हेनिपाव्हायरस कुटुंबातील नवा विषाणू शोधलाय. शास्त्रज्ञांच्या मते, 2018 ते 2021 दरम्यान चीनमध्ये लांग्या हेनिपाव्हायरसचे (LayV) किमान 35 रूग्ण आढळले होते.
4 ऑगस्ट रोजी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालात लांग्या हेनिपाव्हायरस संसर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण हा व्हायरस नेमका काय आहे?
4. डार्लिंग्स : बायकोला रोज रात्री मारहाण आणि मग सकाळी सॉरी म्हणायचं; चित्रपटाची चर्चा का होतेय?
घरगुती हिंसाचारावर प्रकाश टाकणारा डार्लिंग्स नावाचा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
आलिया भट्ट, शेफाली शाह आणि विजय वर्मा यात प्रमुख भूमिकेत आहेत. एका तरुण मुस्लिम जोडप्याची प्रेमप्रकरण, हिंसाचार आणि बदल्याची ही गोष्ट आहे.
हम्झा (विजय वर्मा) आणि बद्रूनिस्साच्या (आलिया भट्ट) लग्नाला तीन वर्षं होतात. पण या ना त्या कारणानं हम्झा बद्रूनिस्साला मारहाण करत असतो. रात्रीच्या मारहाणीनंतर सकाळी तो तिची माफीही मागतो. "मी तुला मारतो,कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे," असं स्पष्टीकरण तो या मारहाणीमागे देत असतो.
5. सेरेना विल्यम्स युएस ओपननंतर निवृत्ती घेणार? जाणून घ्या तिचा थक्क करणारा प्रवास
टेनिस जगतावर अधिराज्य करणारी सेरेना विल्यम्स आपण निवृत्त होणार आहोत असे सुचवले आहे.
युएस ओपन नंतर या खेळापासून दूर जाण्याचा मी निर्णय घेत आहे. मला निवृत्ती हा शब्द आवडत नाही, पण इतर महत्त्वपूर्ण गोष्टींना वेळ देण्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असे तिने व्होग या नियतकालिकासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.
सेरेना विल्यम्सचे वय 40 वर्षं आहे आणि तिने आतापर्यंत 23 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे पण ती म्हणते आणखी काही आठवडे व्यावसायिक टेनिस खेळाचा क्षण न् क्षण मी जगणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)