विजय देवेरकोंडाला पाहिल्यानंतर गर्दी झाली अनावर आणि मग...#5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. विजय देवेरकोंडाला पाहिल्यानंतर गर्दी झाली अनावर आणि मग...

तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडाच्या 'लायगर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळतीये.

अभिनेत्री अनन्या पांडेसह विजय देवरकोंडा रविवारी (31 जुलै) 'लायगर'च्या प्रमोशनसाठी नवी मुंबईतील एका मॉलमध्ये गेले होते. संपूर्ण मॉल खचाखच भरला होता.

विजय देवरकोंडा स्टेजवर पोहोचताच लोकांनी प्रचंड जल्लोष, गोंधळ सुरू केला. विजयने चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहनही केलं. मात्र, गर्दी अनावर झाली होती. शेवटी सुरक्षारक्षकांनी विजय आणि अनन्या यांना कार्यक्रमातून बाहेर नेलं.

दरम्यान, या कार्यक्रमाच्यावेळेस एक तरुणी बेशुद्धही पडली. तिची प्रकृती गुदमरल्यामुळे बिघडली असल्याचं सांगण्यात आलं.

विजय देवेरकोंडाने नंतर मुंबईतील आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक नोटही लिहिली. त्यानं म्हटलं, "तुम्ही मला भारावून टाकलंय. तुम्ही सगळे सुरक्षित असला आणि आपापल्या घरी पोहोचले असाल अशी आशा आहे. मला तुमच्यासोबत जास्त वेळ घालवता आला असता तर बरं वाटलं असतं. झोपायला जात असतानाही मी तुमचा विचार करत आहे. गुड नाईट मुंबई."

इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

2. संजय राऊतांनी निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करावं, मीही तेच केलंय- भावना गवळी

ईडी प्रकरणात मला कोर्टानं क्लिनचीट दिली आहे. ईडीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे. कुठल्याही गोष्टीला क्लीनचीट देण्यासाठी कोर्ट आहे. ईडीची कारवाई विशिष्ट पद्धतीनं होत असते. संजय राऊत निर्दोष असतील कोर्टात सिध्द करावं, मीही तेच केलं, असं वक्तव्यं खासदार भावना गवळी यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत.

याबद्दल बोलताना भावना गवळी यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठं मनं केलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. हजारोच्या संख्येनं समर्थक सत्कार करणार आहेत.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. शेवटी सत्याचा विजय होईल, अहंकार पराभूत होईल- राहुल गांधींचं संजय राऊतांना समर्थन

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं कारवाई करत अटक केली आहे. विशेष पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केल्यानंतर 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर यावरुन टीका करणारं ट्वीट केलं आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला त्रास सहन करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांचं धैर्य तोडणं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हुकूमशाहनं हे लक्षात घ्यावं शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार पराभूत होईल.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

4. 'खरी शिवसेना कोणती हे ठरविण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी'

खरी शिवसेना कोणती या वादावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी, असं प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. शिंदे सरकारची वैधता, खरी शिवसेना कोणाची या मुद्दय़ावर निवडणूक आयोगापुढील वाद तसंच आमदार अपात्रता या मुद्दय़ांवर शिवसेना नेत्यांनी सादर केलेल्या याचिका फेटाळून लावाव्यात, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयास केली आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केवळ 15 आमदार असून आपल्यामागे 40 आमदार आहेत. ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या 15 आमदारांचा गट 40 आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरविण्याची मागणी करू शकत नाही. शिवसेनेतील आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत लोकशाही पद्धतीने आणि बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयास केली आहे.

5. मध्य प्रदेशमध्ये रुग्णालयाला लागली भीषण आग, आठ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली.

मृतांमध्ये बहुतांश रूग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात अचानक आग लागली. रुग्णालयातून बाहेर येण्याचा एकच मार्ग असल्याने बहुतांश लोक आत अडकले. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केलं. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी कापली असता तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)