You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉटरी : 50 लाखांच्या कर्जापायी घर विकायला काढलं, तितक्यात 1 कोटींची लॉटरी लागल्याचं कळलं..
- Author, चेरीलन मोलन आणि मेरीयल सेबॅस्टियन,
- Role, बीबीसी न्यूज.
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
डोक्यावर असलेलं 50 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी मोहम्मद बावा यांनी आपलं घर विकायला काढलं होतं. तसंच राहण्यासाठी त्यांनी एक भाड्याने घरही शोधलं होतं. पण तितक्यात त्यांच्या मित्राने त्यांना 1 कोटींची लॉटरी लागल्याचं कळवलं आणि मोहम्मद यांचं आयुष्यच बदलून गेलं.
मोहम्मद बावाच्या मित्राने जेव्हा त्यांना काही अनपेक्षित पण आनंददायक बातमी देण्यासाठी फोन केला, तेव्हा तो क्षण त्यांना प्रचंड आनंद देणारा होता.
मित्राने त्यांना सांगितले की त्यांनी लॉटरीमध्ये 1 कोटी रुपये जिंकले आहेत. जवळपास एक वर्षांपासून ते जिंकण्याचा प्रयत्न करत होते.
ही घटना 25 जुलैची आहे. चार दिवसांनंतर बावा केरळमधील कासरगोड या त्यांच्या गावात सेलिब्रेटी झाले आहेत.
भारतातील बहुतेक राज्यांमध्ये लॉटरी बेकायदेशीर आहे. परंतु केरळसह काही ठिकाणी कठोर देखरेखीखासली आणि नियम पाळले तर परवानगी आहे.
बावा यांच्याकडे लॉटरी जिंकण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ नव्हती. त्यांच्यावर अनेक वर्षं मोठ्या रकमेचं कर्ज होतं. सावकारांना पैसे परत करण्यासाठी ते संघर्ष करत होते. यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक आणि भावनिक ताण होता.
अखेरचा पर्याय म्हणून कुटुंबाने कर्ज फेडण्यासाठी घर विकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मित्राचा कॉल येण्याच्या काही तास आधी बावा यांनी त्यांचे घर विकण्यासाठी खरेदीदाराशी जवळपास करार पूर्ण केला होता.
25 जुलै रोजी त्यांना त्याच्या घराच्या विक्रीची खात्री करण्यासाठी आणि आगाऊ रक्कम स्वीकारण्यासाठी 5.30 वाजता त्यांना संभाव्य खरेदीदाराला भेटायचे होतं.
पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळीच योजना आखली होती. गणेश या त्यांच्या मित्राने फोन केला होता तो क्षण त्यांना अजूनही आठवतो.
त्याच दिवशी दुपारी 3.20 वाजता त्याला गणेशकडून त्या दिवसाच्या लॉटरीच्या निकालाबद्दल व्हॉट्सअपवर मेसेज आला. त्यानंतर लगेचच त्याचा फोनही आला.
"मला खूप दिलासा मिळाला. ज्यांच्याकडे मदत मागावी अशी लोकच उरली नव्हती," बावा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. "आम्ही आनंदात आहोत, आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत."
कर कापल्यानंतर बावा यांना 63 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. त्याला हे पैसे नेमके कधी मिळतील माहिती नाही. परंतु सावकारांनी त्याचे दरवाजे ठोठावणे बंद केल्यामुळे त्यांना आता काळजी नाही.
ते सांगतात की "मी लॉटरी जिंकल्यानंतर कर्जदार शांत झाले आहेत. तुमच्याकडे पैसे नसताना लोक पैशासाठी सतत तगादा लावतात , पण जेव्हा त्यांना कळलं की माझ्याकडे त्यांना परत करण्यासाठी पैसे आहेत, तेव्हापासून ते शांत झाले आहेत."
बावा हे एकेकाळी कर्जमुक्त मध्यमवर्गीय कुटुंब होते. ते बांधकाम क्षेत्रात कंत्राटदार म्हणून काम करत होते पण गेल्या काही वर्षांपासून त्यांना कमी काम मिळू लागले होते. 2020 च्या सुरुवातीला भारत आणि जगामध्ये कोव्हिड-19ची साथ आल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली.
ते काम शोधण्यासाठी धडपडत होते. कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला, अशात त्याचे कर्ज वाढतच गेले. त्यांना पाच मुलं आहेत, त्यापैकी दोघांचं नुकतंच लग्न झालं आहे. बावा यांनी मुलांच्या लग्नासाठी पैसे खर्च केले आणि त्यांची आर्थिक समस्या आणखी बिकट झाली.
आपल्या मुलाला कतारला चांगली नोकरी मिळेल या आशेवर त्याने मुलाचा कतारला जाण्याचा खर्च केला. त्यासाठी त्यांनी कुटुंबाकडून कर्ज म्हणून पैसे घेतले.
त्यांना आशा होती की आपलं अधिक काम मिळेल आणि आपण कर्ज फेडू शकू. मात्र जुलैमध्ये या कर्जाची किंमत 50 लाख इतकी झाली.
"लग्नाच्या खर्चामुळे सुमारे 10 ते 15 लाख रुपये कर्ज आणखी वाढलं." ते सांगतात.
"मला सर्वांना परतफेड करावी लागली पण उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता."
वाढत जाणारे कर्ज हे कुटुंबासाठी सततच्या चिंतेचं कारण झालं. उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत किंवा कर्ज फेडण्याचा मार्ग न मिळाल्याने कुटुंबाने घर विकण्याचा कठोर निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वीच ते या घरात रहायला आले होते. हे घर म्हणजे त्यांचं स्वप्न होतं. आता हेच स्वप्नातलं घर त्यांना विकण्याची वेळ आली होती. बावांनी त्यांचं घर विकण्यापूर्वी भाड्याचं घर शोधलं.
पण एका वर्षापासून ते लॉटरीच्या तिकिटाच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावत होते पण त्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही. लॉटरी हा घायकुतीला येऊन घेतलेला निर्णय होता असं त्यांचं म्हणणं आहे. लॉटरी जिंकण्याची शक्यता लाखात एक असल्याने एखादा चमत्कार व्हावा असं त्यांना मनोमन वाटत होतं. त्यांनी एक वर्षं वाट पाहिली मात्र शेवटी त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला.
लॉटरीची तिकिटं विकण्याचं छोटं दुकान चालवणाऱ्या गणेश या मित्राकडून ते तिकिटं विकत घेत असत. रोज त्याच्याकडून तिकिटं विकत घ्यायची आणि लॉटरी लागली नाही, हे गणेशकडून ऐकायचं. वर्षभर त्यांचा हाच दिनक्रम सुरू होता.
जेव्हा गणेश यांना त्यांचा मित्र जिंकल्याचे कळताच त्याने लगेच फोन केला.
"तुम्ही वाचलात," तो बावांशी फोनवर बोलताना म्हणाला.
बावा यांना गणेशचे हे नेमके शब्द आठवतात. ते खरंच वाचले होते.
जेव्हा फोन आला त्या क्षणी जो आनंद झाला त्याचं वर्णन करण्यासाठी त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे शब्द नव्हते.
बक्षिसाची रक्कम मोठी वाटू शकते, पण बावा यांनी त्यांचं कर्ज फेडल्यानंतर त्यात फारसे काही पैसे शिल्लक राहणार नाही. तरी त्यांना उरलेली रक्कम चांगल्या कामासाठी वापरायची आहे.
त्यांना त्यांचे मित्र गणेशला घर खरेदीसाठी मदत करायची आहे. "गणेशला स्वतःचे घर नसल्यामुळे तोही संघर्ष करत आहे." बावा म्हणाले.
तसेच त्याला काही रक्कम गरिबांना दान करायची आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)