उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्व संपवायचंय - रामदास कदम #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्व संपवायचंय - रामदास कदम

"उद्धव ठाकरे यांना मराठा नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना ते संपवायचं आहे," असं वक्तव्य ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलं आहे.

"उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याऐवजी शरद पवारांच्या विचारावर चालत आहेत. उद्धव ठाकरेंना मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे का? असा संशय मला येत आहे," असं कदम म्हणाले.

"मी असो, राणे असोत किंवा एकनाथ शिंदे, आमचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्या तोंडाला 3 वर्ष कुलूप लावण्यात आलं. बोलू दिलं नाही, भाषण करू दिलं नाही," असंही त्यांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि योगेश कदम यांना संपवण्यासाठी सहा मिटींग झाल्या. या मिटींगला आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, विनायक राऊत उपस्थित होते. अशापद्धतीने तुम्ही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आम्हाला नाही तर शिवसेनेलाच संपवत आहात." ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेतील नव्या नियुक्त्या जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाकडून शिवसेनेतील नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संबंधित नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत.

यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कायम राहणार आहेत. तर कामगार नेते किरण पावसकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचीही शिवसेना सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. याशिवाय शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, आमदार उदय सामंत, किरण पावसकर आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे.

याचबरोबर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकीकडे, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे पक्ष चिन्ह कुणाला मिळणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या बाजूने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचं काम युद्धपातळीवर करताना दिसत आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. अहमदनगरला अहिल्यादेवी नगर नाव देण्याची मागणी

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर आता अहमदनगर शहराचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करावे, अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून पडळकर यांनी ही मागणी केली. अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मरण राहील,असे मत या पत्राद्वारे पडळकर यांनी व्यक्त केले आहे.

"अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्तान आहे, परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर, अहिल्यादेवी हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वतंत्र इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे," असं पडळकर यावेळी म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

4. दोन कोटी रोजगारांचं काय झालं? राहुल गांधी यांचा मोदी सरकारला सवाल

दोन कोटी रोजगार देणार होतात त्याचं काय झालं? डॉलरच्या तुलनेत रुपया 80 पार कसा गेला? देशातील तरुणांना केवळ चार वर्षासाठी लष्करात भरती होण्यासाठी का जबरदस्ती केली जात आहे? असे सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले आहेत.

एकामागून एक ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, "संसदेत गोंधळ सुरू असतानाच मोदींनी या मुद्द्यांकडे लक्ष वेधायचं होतं. तसेच या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणायची होती. मात्र, मोदी सरकारची हुकूमशाही दिसून आली. त्यांनी 57 खासदारांना पकडायला सांगितलं आणि 23 खासदारांना निलंबित करण्यात आलं. जे प्रश्न मला संसदेत विचारू दिले नाही ते आता मी देशाच्या राजाला विचारत आहे."

"गेल्या दोन वर्षात लष्करात एकही भरती केली नाही. आता अग्निपथ योजना का आणली गेली आहे. तरुणांना चार वर्षाच्या कंत्राटावर अग्निवीर बनण्यासाठी का मजबूर केलं जात आहे," असंही गांधी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. सुषमा अंधारे यांचा आज शिवसेना प्रवेश

एकीकडे आमदार-खासदारांच्या बंडामुळे डॅमेज कंट्रोल भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुण्यात एका महिला नेत्याचं शिवसेनेत इनकमिंग झाल्याची माहिती समोर येत आहे.

सुषमा अंधारे असं या महिला नेत्याचं नाव असून त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदारही आहेत, हे विशेष.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधारे या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे. अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झालं. ही बातमी ई-सकाळने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)