शिवसेना : धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली - शालिनी ठाकरे #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. शिवसेनेचं धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली - शालिनी ठाकरे
'रेल्वे इंजिन भाड्याने द्या' म्हणून उपदेश देणाऱ्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शालिनी ठाकरे यांनी काल (21 जुलै) ट्विट करून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. शालिनी यांना यापूर्वीही अनेकवेळा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर कठोर शब्दांत टीका करताना पाहण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दुफळी माजल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षावर वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेचं आयोजन केले आहे. या निमित्ताने ते विविध ठिकाणी जाऊन नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.
दरम्यान, याच निष्ठा यात्रेचा संदर्भ देत शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली, असा घणाघात केला. ही बातमी साम टीव्हीने दिली.
2. अविवाहित महिलांना 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येईल - सुप्रीम कोर्ट
अविवाहित महिलांना 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. गुरुवारी (21 जुलै) एका सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.
महिलेच्या जीवाला धोका नसेल तर 24 आठवड्यानंतर गर्भपात केला जाऊ शकतो, असं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) वैद्यकीय मंडळाने म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर न्यायमुर्ती चंद्रचुड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

फोटो स्रोत, Alamy
या प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने वैद्यकीय गर्भपात नियमांतील तरतुदींबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला अवैध ठरवलं.
गर्भपाताबाबत ज्या सुविधा विवाहित महिलांना दिल्या जातात, त्या अविवाहित महिलांनी दिल्या जाव्यात, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसंच न्यायालयाने विधवा आणि घटस्फोट झालेल्या महिलांनाही 20 ते 24 आठवड्यांनंतर गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. राजस्थानात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर
देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राजस्थानात महिलांविरुद्ध 5310 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर उत्तर प्रदेशात ही संख्या 2769 इतकी होती. तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून इथे 2339 गुन्हे नोंद झाले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात 2061 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
इतर गुन्हयांमध्ये महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या बाबतीत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे. वर्ष 2020 मध्ये उत्तर प्रदेशात 49 हजार 385 गुन्हे दाखल झाले. या क्रमात पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर असून तेथे 36 हजार 439 गुन्हे नोंद आहेत. तिसऱ्या स्थानावर राजस्थान आहे.
अशा गुन्ह्यांमधील आरोपींमध्ये कुटुंबातील सदस्य, पती, जवळचे नातेवाईक, शेजारी, नोकर, मित्र, प्रियकर आणि ओळखीच्या व्यक्तींचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. अनोळखी व्यक्तीने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण अत्यल्प असून सर्वाधिक आरोपी हे संबंधांतील आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयातून शिक्षेचे प्रमाण कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या मोठ्या नेत्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली. वरळी येथील प्लॉट खरेदी दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. या कारवाईत ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील घरावर निर्बंध लावण्यात आले. हा फ्लॅट पटेल कुटुंबीय वापरू शकतील, पण त्याची विक्री करू शकणार नाहीत. ही बातमी ई-सकाळने दिली.
5. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन
पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2016 मधील एका प्रकरणात त्यांच्याविरोधात मोफाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते जामीनासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये अखेर त्यांना जामीन मिळाला.
डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, आणि फ्लॅटबा ताबा दिला गेला नव्हता. या सर्व घटनेत कुलकर्णींना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी 2018 पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 450च्या पुढे आहे.त्याविषयी सुनावणी सुरू असल्याने कुलकर्णी दांपत्य तुरुंगाबाहेर येणार किंवा नाही, हा प्रश्न आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























