बिहारमध्ये मराठी कुटुंब आगीत भाजलं, मुख्यमंत्री शिंदेंनी उपलब्ध करून दिलं चार्टर फ्लाईट #5मोठ्याबातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहार, वैद्यकीय मदत

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे बिहारमधील मराठी कुटुंबाला मदतीचा हात

बिहार मधील पाटणा येथे, महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता.खटाव जि. सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्या प्रमाणात जखमी झाले.

त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या विशेष दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि एअर अॅम्ब्युलन्स मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनवर कुटुंबाला आणण्यासाठी 2 विशेष विमानं बिहारमध्ये दाखल झाली. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना सकाळी 11 वाजताच पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितत्काळ, शासकीय एअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून 2 एअर अॅम्ब्युलन्स बुक केल्या. पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत.

2. मध्यप्रदेशातील सिंगरौली शहरात 'आप'चा महापौर

दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशात विजयाची बोहणी केली आहे. 'आप'चा उमेदवार महापौर निवडणुकीत विजयी झाला आहे.

मध्यप्रदेशमधील सिंगरौली महानगर पालिकेवर 'आप'च्या राणी अग्रवाल यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला आहे. सिंगरौली महानगरपालिका याआधी भाजपच्या हातात होती पण आता 'आप'ने विजय मिळवत मध्यप्रदेशमध्ये आपला पहिला उमेदवार निवडून आणला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

राणी अग्रवाल यांनी पहिली निवडणूक 2014 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून लढवली होती आणि जिंकली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्या आपकडून निवडणूक लढल्या पण अत्यंत कमी मताने त्यांचा पराभव झाला होता. 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

3. आयसीएसई दहावी परीक्षेत हरगुन कौर मथारू देशात प्रथम

पुण्यातील सेंट मेरीज हायस्कूलमधील हरगुन मथारू ही देशात पहिली आली आहे. राज्याचा निकाल शंभर टक्के तर देशाचा निकाल 99.97 टक्के लागला आहे. आयसीएसईचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. या परीक्षेत हरगुन हिच्यासह कानपूर येथील अनिका गुप्ता, कनिष्का मित्तल आणि बाळारामपूर येथील पुष्कर त्रिपाठी हेदेखील देशात प्रथम आले आहेत.

या सर्वाना पाचशेपैकी 499 गुण मिळाले आहेत. देशातील 109 विद्यार्थी पहिल्या तीन स्थानांवर म्हणजे 497 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत.

हरगुन कौर
फोटो कॅप्शन, हरगुन कौर

दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणारा या परीक्षेचा निकाल यंदा जवळपास एक महिना लांबला. यंदा मंडळाने सत्र पद्धत लागू करून परीक्षा घेतली होती. दोन्ही सत्रांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला राज्यातील 26 हजार 83 विद्यार्थी बसले होते. त्यातील अवघा एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. देशातील 2लाख 31 हजार 63 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 2 लाख 31 हजार 63 म्हणजे 99.97 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

4. पी. व्ही. सिंधूने जिंकली सिंगापूर ओपन

भारताच्या दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने रविवारी चीनच्या वांग झी यी हिला पराभूत करत सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. सिंधूने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या वांगला 21-9, 11-21, 21-15 असे नमवत हंगामातील तिसरे अजिंक्यपद मिळवले.

यापूर्वी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आता सिंगापूर स्पर्धेतील विजेतेपदामुळे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी सिंधूचा आत्मविश्वास वाढला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

पी.व्ही.सिंधू

फोटो स्रोत, SAI Media

फोटो कॅप्शन, पी.व्ही.सिंधू

गेल्या काही स्पर्धामध्ये मला उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर हा अडथळा पार करण्यात यश मिळाल्याचे मला समाधान आहे. माझ्यासाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. आता आगामी स्पर्धामध्ये हीच लय कायम राखत दमदार कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल असं सिंधूने विजयानंतर बोलताना सांगितलं.

5. टीम इंडियाचा इंग्लंडवर विजय; मालिकाही जिंकली

ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या दिमाखदार खेळाच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडवर 5 विकेट्सनी विजय मिळवला. भारतीय संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी इंग्लंडला 259 धावांमध्ये रोखलं. हार्दिक पंड्याने 4 तर युझवेंद्र चहलने 3 विकेट्स पटकावल्या. इंग्लंडतर्फे जोस बटलरने सर्वाधिक 60 धावा केल्या.

ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, क्रिकेट

फोटो स्रोत, Stu Forster

फोटो कॅप्शन, ऋषभ पंतने वनडेतलं पहिलं शतक झळकावलं.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची अवस्था 72/4 अशी झाली होती मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत जोडीने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. 55 चेंडूत 71 धावांची खेळी करून हार्दिक बाद झाला.

त्यानंतर ऋषभने सामन्याची सूत्रं हाती घेत वनडेतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. पंतने नाबाद 125 धावा केल्या. 16 चौकार आणि 2 षटकारांसह पंतने ही खेळी साकारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी सरशी साधली. पंतला मॅन ऑफ द मॅच तर हार्दिकला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)