नरेंद्र मोदी : 'भारताच्या विकासासाठी रेवडी संस्कृती घातक', #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या 5 मोठ्या बातम्यांचा घेतलेला आढावा.

1.देशाच्या विकासाठी रेवडी संस्कृती घातक- मोदी

आपल्या देशात 'रेवडी' वाटून मते मागण्याची संस्कृती रुजत असून ती देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मते मिळवण्यासाठी मतदारांना खूश करणाऱ्या मोफत सेवासुविधा देण्याच्या राजकारणावर टीका केली.

नागरिकांनी विशेषत: तरुणांनी रेवडी संस्कृतीपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उत्तर प्रदेशातल्या जालौन जिल्ह्यातील ओराई तालुक्यात सुमारे 14 हजार 850 कोटी खर्चून बांधलेल्या 296 किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनानंतर एका जाहीर सभेत मोदी यांनी, मतांसाठी जनतेला मोफत सेवा, वस्तू वाटप करणाऱ्या राजकीय पक्षांना टीकेचे लक्ष्य केले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

'रेवडी संस्कृती'चे लोक नवे द्रुतगती महामार्ग, नवे विमानतळ किंवा संरक्षण 'कॉरिडॉर' कधीच बांधणार नाहीत. मात्र, 'रेवडी' वाटून लोकांना विकत घेतील. आपण सर्वानी अशा विचारसरणीला पराभूत करून राजकारणातून 'रेवडी संस्कृती'ला हटवायचे आहे, असे मोदी म्हणाले.

2.एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक

आधीच तुटपुंजा पगार व मर्यादित निवृत्त लाभ मिळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शेकडो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. एसटी महामंडळातील शिपाई ते अधिकारी पदापर्यंतच्या दीडशे ते दोनशे जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची कमाई लुटण्यात आली आहे. याप्रकरणी गुंतवणूक कंपनीच्या दोन भागीदारांना भाईंदरमध्ये अटक करण्यात आली असून, लुटीचा आकडा 50 कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्त आहे. 30 ते 35 वर्षांपेक्षा अधिक काळ एसटीमध्ये नोकरी केल्यानंतर हे निवृत्त झाले.

3.तुम्हाला कायदा-संविधान कळतं का? शेलारांचा राऊतांना सवाल

"महाविकास आघाडीत 7 जणांच्या मंत्रिमंडळाने 32 दिवस निर्णय घेतले आणि आता म्हणे संविधानाचे अनुच्छेद 164 (1A) सांगत12 सदस्यांचे मंत्रिमंडळ हवे! अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का?" असा सवाल भाजप ते आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

संविधानातील हे कलम मंत्रिमंडळाचा आकार किती असावा, याच्याशी संबंधित आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा 15% अधिक मंत्री नको,पण असे करताना किमान 12 असा त्याचा अर्थ आहे. उदा. गोवा अशा लहान राज्यांसाठी ही तरतूद. तेथे नियमाने केवळ 6 मंत्री होऊ शकतात. पण या नियमाने 12 आहेत. विस्ताराच्या कालावधीचा या संविधानाच्या कलमात कुठेही उल्लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपला, असं शेलार पुढे म्हणाले आहेत.

4.RTE प्रवेश तिसऱ्या टप्प्याची मुदत संपली

राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीई प्रवेशाच्या पंचवीस टक्के राखीव जागांवर तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया संपली आहे; पण प्रवेश प्रक्रियेनंतरही राज्यात तब्बल 23,464 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त जागांची संख्या मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईसह राज्यातील खासगी शाळांमध्ये रिक्त जागांची आणि एकूणच होत असलेल्या प्रवेशांच्या अडचणीचा आढावा सोमवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून घेतला जाणार आहे. त्यानंतरच रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश कोणत्या पद्धतीने करायचे, याचा निर्णय घेतला जाईल. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मागील दोन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची ही प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या प्रवेश फेरीनंतर खूप मोठ्या प्रमाणात आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्यानंतर तीन प्रवेश फेऱ्या आयोजित करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न केला.

5.खासदार शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकावणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खासदार शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती.

न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, खासदार शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

दरम्यान, राहुल शेवाळे यांच्यावर संबंधित महिलेने तीन महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)