You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?
- Author, दीपाली जगताप,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
'ग्लोबल टिचर पुरस्कार' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. डिसलेंचा हा राजीनामा जिल्हा परिषदेनं नामंजूर केलाय.
डिसलेंचा राजीनामा नामंजूर केल्याच्या निर्णयाचं पत्रक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांनी काढलं आहे.
काही दिवसांपूर्वी रणजितसिंह डिसलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, "आजच डिसले यांनी आमची भेट घेतली आहे. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाबाबतीत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, यादृष्टीनं सर्व आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत."
दरम्यान, 'ग्लोबल टिचर पुरस्कार' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्याकडून गेल्या तीन वर्षांचं वेतन वसूल करा,' अशी शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली आहे.
रणजितसिंह डिसले जवळपास तीन वर्षं कामावर गैरहजर राहीले आणि तरीही त्यांना पगार मिळाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अहवालाआधीच डिसले यांनी राजीनामा दिला होता.
हे वादग्रस्त प्रकरण नेमकं काय आहे? चौकशी अहवालात काय म्हटलंय? डिसले यांनी राजीनामा का दिला? आणि शिक्षण क्षेत्रात याबाबत काय प्रतिक्रिया आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
प्रकरण काय आहे?
रणजितसिंह डिसले सोलापूर येथील परितेवाडी शाळेत शिक्षक आहेत. तसंच ग्रामीण भागातील शिक्षकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
रणजितसिंह डिसले यांना गेल्यावर्षी 'ग्लोबल टिचर पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यानंतर जागतिक बँकेच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीसाठी ही नेमणूक करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना आपल्या तंत्रज्ञानाने शिकवणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्याने शालेय शिक्षण मंत्रालयाकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत डिसले हा कार्यक्रम पार पडला.
पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. यासाठी त्यांना रजा हवी होती.
रजेसाठी आवश्यक कागदपत्र डिसले यांनी सादर केलेली नाहीत असा आरोप होता. परंतु कागदपत्र दिल्यावरच रजा मंजूर केली असं जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
परंतु दुसऱ्या बाजूला रणजितसिंह डिसले तब्बल 34 महिने शाळेत आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणी गैरहजर राहीले असं शिक्षण विभागाने समोर आणलं आणि या प्रकरणी चौकशी सुरू झाली.
हा चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नुकताच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, रणजितसिंह डिसले यांनी नुकताच राजीनामा दिला आहे.
चौकशी अहवालात काय म्हटलंय?
जिल्हा परिषदेकडे सादर केलेल्या त्यांच्या चौकशी अहवालात, रणजितसिंह डिसले 34 महिने गैरहजर होते तरीही त्यांनी या कालावधीचा पगार घेतल्याचा ठपका आहे.
गैरहजर असलेल्या कालावधीतील वेतन वसुली करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "रणजितसिंह डिसले 34 महिने गैरहजर होते याचे पुरावे आहेत. 34 महिने ते ना शाळेत गेले ना प्रतिनियुक्ती असलेल्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण दिलं. हे चौकशीत केवळ एकदा नव्हे तर दोन वेळा समोर आलं आहे."
"चौकशीसाठी पाच जण होते. त्यामुळे त्यानुसार आम्ही अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे,"
जवळपास 3 वर्ष शाळेवर शिक्षक नाही हे शिक्षण विभागाला कसं लक्षात आलं नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "कारण ते परस्पर आपलं वेतन काढत होते. मग आम्हाला कसं कळणार? पण यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, हे नाकारता येणार नाही. ते गैरहजर होते म्हणून शाळेत एकाच शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवावं लागलं."
ते पुढे म्हणाले, "34 महिने ते कुठे होते त्यांनाच माहिती. शिक्षक म्हणून त्यांनी शाळेत असायला हवं असं मला वाटतं."
पूर्व परवानगी न घेता ते तीन वर्षं गैरहजर होते. तरीही या कालावधीत त्यांना पूर्ण पगार मिळाला असंही या चौकशी अहवालात म्हटलं आहे. "तुम्ही गैरहजर असताना एवढ्या दिवसांचा पगार दिला जाऊ शकत नाही," असं किरण लोहार यांनी सांगितलं.
हा चौकशी अहवाल आता जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
दिलीप स्वामी यांनी सांगितलं, "अद्याप कारवाईसंदर्भात कोणतीही आदेश जारी केलेला नाही. मी चौकशी अहवाल अद्याप पाहिला नाही. चौकशी अहवालात शिफारशी असल्या तरी आम्ही नियमानुसार कारवाई करू."
रणजित डिसले यांचं काय म्हणणं आहे?
चौकशी समितीला 2 हजार पानांचे पुरावे दिले आहेत, असं रणजितसिंह डिसले यांनी म्हटलंय.
बीबीसी मराठीशी बोलताना रणजितसिंह डिसले म्हणाले, "चौकशीदरम्यान मी माझी बाजू मांडली आहे. मी संबंधित कागदपत्र सादर केली आहेत. त्यापुढे माझ्यापर्यंत अद्याप काही केलेलं नाही. 2000 पानांची कागदपत्र मी दिली आहेत."
"मी हजर होतो याचे पुरावे आहेत. त्या-त्या वेळी अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचे कागदपत्र दिले आहेत. कागदपत्रांचा निष्कर्ष चौकशी समितीचा भाग आहे. मी हजर असल्याचे पुरावे तुम्हाला अगदी फेसबुकवरही दिसतील. अनेक शाळांमध्ये व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप झाल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसेल."
लवकरच या प्रकरणी पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. "माझा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मी बाकी गोष्टी जाहीर करेन. नेमकं काय झालं हे मी पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. सध्या माझ्यावर काही बंधनं आहेत. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आता सांगता येणार नाहीत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजीनामा का दिला?
रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षक आणि प्रशिक्षकपदाचा राजीनामा सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे, असं त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे.
सीईओ दिलीप स्वामी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे, असं कारण त्यांनी सांगितलं आहे. स्कॉलरशीपसाठी त्यांची रजा आम्ही यापूर्वीच मंजूर केली होती. अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही. एक महिन्याच्या नोटीस पीरियडवर ते आहेत."
बीबीसी मराठीशी बोलताना रणजित डिसले म्हणाले, "मी 8 ऑगस्टला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जात आहे. त्यामुळे वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा दिला आहे. माझी शिष्यवृत्ती पूर्ण करेन आणि अमेरिकेत शिक्षण आणि पॉलिसी रिसर्च या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे."
शिक्षण क्षेत्रात काय प्रतिक्रिया आहेत?
या प्रकरणाची शिक्षकांमध्येही चर्चा आहे. सरकारी व्यवस्थेचे नियम मोठे की शिक्षकांचं काम मोठं? यासंदर्भात दोन मतप्रवाह शिक्षण क्षेत्रात दिसतात.
वादग्रस्त प्रकरण असल्याने काही सरकारी शिक्षकांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं की, "तुम्ही शिक्षक म्हणून प्रयोगशील किंवा चौकटीबाहेर जाऊन काम करत असला तरी म्हणून तुम्ही नियमांना डावलू शकत नाही."
एक शिक्षक सांगतात, "महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच इतर अनेक माध्यमातून शिक्षण देत असतात. अशा अनेक प्रयोगशील शाळा राज्यात आहेत. यात मोठ्या संख्येने शिक्षक आपआपल्यापरीने योगदान देत आहेत. पण मग याचा अर्थ तुम्ही शिक्षण विभागाचे नियम डावलायचे असा होत नाही."
"प्रयोगशील शिक्षकांचं काम कौतुकास्पद आहे. परंतु मी हे काम करतो म्हणून मला व्यवस्थेने दिलेली जबाबदारी नाकारायची हे नियमांना धरुन नाही आणि नैतीकही नाही. मला वेळापत्रक लागू होत नाही, दिलेलं काम करायचं नाही, नियमांना न जुमानता आपल्या म्हणण्यानुसारच करायचं हे सुद्धा योग्य नाही. नेमून दिलेलं काम आहे हे करत असताना तुम्ही बाकी प्रयोग, काम करू शकता," असंही काही शिक्षक सांगतात.
दुसऱ्या बाजूला सरकारी व्यवस्थेमुळे अशा होतकरू शिक्षकांचं खच्चीकरण होतं आणि ते राजीनामा देतात असंही मत व्यक्त केलं जात आहे.
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे हेरंब कुलकर्णी म्हणाले, "शिक्षण विभागात काही अधिकाऱ्यांमुळे ही प्रकरणं होतात. आपल्या अंतर्गत काम करणारे शिक्षक आपलं ऐकत कसं नाहीत या सूडबुद्धीने तांत्रिक नियमांत त्यांना अडकलं जातं. त्यांना नियमांची भीती दाखवली जाते. अशा व्यवस्थेमुळे वेगळं काम करणाऱ्यांचा उत्साह सुद्धा कमी होतो."
ते पुढे सांगतात, "नियम महत्त्वाचे आहेतच. पण एखादा शिक्षक काहीतरी नाविन्यपूर्ण करत असेल, त्याच्यामुळे जगभरात आपल्या शिक्षण व्यवस्थेचं कौतुक होत असेल तर याचाही आपण विचार करायला हवा. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न व्हायचे सोडून अशा तांत्रिक चुकांमध्ये त्यांना अडकवलं जातं हे योग्य नाही. यामुळे आपल्याच मुलांचं नुकसान होतं,"
दरम्यान, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं, "डिसले यांचे समर्थक काय म्हणतात यावर मला बोलायचं नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु कोणी नियमबाह्य काम करत असेल तर आम्ही आमचं काम करणार. पुरस्कार मिळाला म्हणजे कोणी पुरस्कारापेक्षा मोठं होत नाही. नियमांचं पालन करणंही गरजेचं आहे."
या संदर्भातला निर्णय आता मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत. चौकशी अहवालातील शिफारशी त्यांनी मान्य केल्यास डिसले यांच्याकडून वेतन वसूल करण्यात येऊ शकते. परंतु डिसले यांनी आपण गैरहजर नव्हतोच असा दावा केला आहे.
रणजितसिंह डिसले कोण आहेत?
रणजितसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक आहेत. हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचं शालेय शिक्षण बार्शीमधल्याच सुलाखे विद्यालयामध्ये झालं. ते 2009 पासून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत.
युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना गेल्या वर्षी देण्यात आला होता.
या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं. त्यात रणजितसिंह डिसले यांचंही नाव होतं.
या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर 10 शिक्षाकांमध्ये वाटप करण्याचं ठरवलं आहे.
डिसले यांच्यासोबतच इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि यूकेमधील शिक्षक हे या यादीतल्या टॉप 10 मध्ये होते. डिसले यांच्या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी जवळपास 40 लाख रुपये मिळणार आहेत.
"माझ्या मते अंतिम यादीतल्या सगळ्या शिक्षकांकडं एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त एक निमित्त आहे. दुसरं म्हणजे 10 शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरतील तेव्हा मोठा बदल घडेल," असं रणजितसिहं डिसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझिअममध्ये या पुरस्काराचं वितरण झालं. त्यावेळी हॉलीवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले यांच्या नावाची घोषणा केली.
"हा पुरस्कार माझ्या एका कामासाठी मिळालेला नाहीये. यात अनेक वर्षांची मेहनत आहे. ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण, अशांत देशातल्या मुलांसाठीचं काम, तसंच मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी केलेले प्रयत्न यात सामिल आहेत," असं डिसले यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)