You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी पुन्हा येईन' वेबसिरीजचा ट्रेलर प्रकाशित, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर करणार भाष्य
महाराष्ट्रातलं सरकार स्थिरस्थावर होत असताना प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी पुन्हा येईन या वेबसिरीजचा ट्रेलर प्रकाशित झाला आहे.
ट्रेलर सुरू होताच, ओक्के मध्ये हाये सगळं असं वाक्य ऐकू येतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांतलं नाट्यच पुन्हा पडद्यावर पहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं सरकार स्थिरस्थावर होत असताना प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी पुन्हा येईन या वेबसिरीजचा ट्रेलर प्रकाशित झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट भाष्य करणाऱ्या या वेब सीरिजमुळे अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
'मी पुन्हा येईन' हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार चांगलेच गाजले होते. राज्यातलं राजकारण गेल्या महिनाभरात ढवळून निघालं आहे. या सगळ्या नाट्यमय घडामोडी वेबसीरिजच्या रूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अरविंद जगताप यांनी या मालिकेचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे.
या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वेब सीरिजमध्ये काय आहे?
'असं प्लानिंग कर ना, सगळे रिसॉर्टवरनं सगळेच डायरेक्ट राज्यपाल भवनातच यायला पाहिजे,' असा डायलॉग या टीजरमध्ये ऐकायला मिळतो. दुसऱ्या एकेठिकाणी 'आमच्या संपर्कात 40 आमदार आहेत,' असं ऐकायला मिळतं. यावरून महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावर थेट भाष्य केल्याचं लक्षात येत आहे.
टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय.
सत्तासंघर्ष, कटकारस्थानं, आमदारांना फोडणं, रिसॉर्ट पॉलिटिक्स हा सगळा सत्तेचा सारिपाट वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
काय झालं होतं नेमकं?
2019 निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी निवडणुकीत विजय मिळवला मात्र मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात बेबनाव झाला.
यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घ्यावी असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवला. महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
यानंतर झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देवेंद्र यांनी 'मी पुन्हा येईन' अशी कविता सादर केली होती. या वक्तव्यावरून देवेंद्र यांची राजकीय वर्तुळात खिल्ली उडवण्यात आली, त्यांना ट्रोलही करण्यात आलं.
अडीच वर्ष महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष कायम राहिला. अखेर विधान परिषद निवडणुकानंतर शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाहेर पडले. शिंदे यांच्याबरोबरचा गट सुरुवातीला सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे रवाना झाला. भाजपने या गटाला पाठिंबा देत सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला.
भाजपने विरोधी पक्षांना धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावे असा प्रस्ताव ठेवला. त्यांनी तो मान्य केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आग्रहास्तव देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सुचवलं. काही तासात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)