You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला हॉकी वर्ल्ड कप 2022: शेवटच्या मिनिटापर्यंत अटीतटीची लढत, पण इतिहास रचण्याची संधी अशी हुकली...
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारताला महत्त्वपूर्ण अशा लढतीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. या लढतीत विजय मिळाला असता तर भारतीय संघाला महिला हॉकी वर्ल्ड कपमध्ये ब गटामधून थेट उपांत्यपूर्व सामन्यात पोहोचण्याची संधी होती.
या पराभवामुळे भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. आता क्रॉस ओव्हर सामन्यांमध्ये खेळून आठ संघापैकी पहिल्या चार संघांमध्ये जागा पटकावल्यास भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकतो.
भारतीय संघाला या सामन्यात बरोबरी करण्यासाठी संधी मिळाली होती. पण शेवटच्या मिनिटाला मिळालेल्या दोन पेनल्टी कॉनर्रच्या वेळेस भारतीय ड्रेग फ्लिकर गुरजीत कौरला गोल करता आले नाही. त्यामुळे भारतीय संघाला 3-4 अशा फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं.
भारतीय संघानं हा सामना ड्रॉ जरी केला असता तरी संघाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं नसतं.
या विजयामुळे न्यूझीलंड त्यांच्या गटात सर्वाधिक 7 नंबर मिळवून उपांत्यपूर्व फेरीत पोहचलं आहे. या ग्रूपमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिलेले भारत आणि इंग्लंडचे संघ आता क्रॉस ओव्हर सामन्यांमध्ये खेळतील.
भारताच्या पराभवामागे न्यूझीलंडची गोलकीपर रोर्बट्स ब्रूकची दमदार खेळी हे एक कारण आहे.
तिने आपल्या उत्कृष्ठ खेळामुळे जवळपास चार ते पाच गोल थांबवले. पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौर असो की दीप ग्रेस एक्का, दोघांच्या ड्रेग फ्लिकवर त्यांना भेदणं अवघड काम होतं.
भारतानं पेनल्टी कॉर्नरमध्ये बदल करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा समोर असलेल्या वंदना, नेहा अथवा सलेमा चेंडूवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत.
भारताचा कमकुवत डिफेन्स
भारताच्या पराभवात संघाचं कमकुवत डिफेन्स धोरण हेसुद्धा कारणीभूत ठरलं.
न्यूझीलंडच्या खेळाडूंना रोखण्यासाठी ज्या प्रकारची चपळता गरजेची होती, ती दाखवण्यात गुरजीत कौर आणि दीप ग्रेस एक्का दोघीही अयशस्वी ठरल्या.
न्यूझीलंड संघानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या खेळासाठी ओळखला जातो. याप्रकारच्या खेळामुळे भारताच्या मधल्या फळीतील खेळाडूंची रिकव्हरी कमकुमत दिसून आली.
वंदना कटारियानं सुरुवातीलाच गोल करून बढत मिळवून दिली होती. पण, त्यानंतर भारतीय संघाकडून हवा तसा ताळमेळ दाखवता आला नाही.
सर्कलमध्ये पोहचल्यानंतर तर ताळमेळ अधिकच बिघडताना दिसला. भारतीय संघाच्या फिनिशिंगनं तर खूपच निराश केला. वंदना, शर्मिला, नेहा या सगळ्यांनी गोल करण्याच्या संधी गमावल्या.
सरळ शॉटमधून गोल मिळवणं अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी दुसरा पर्याय शोधणं गरजेचं होतं. पण त्यात त्या अपयशी ठरल्या. यामुळे मग वारंवार आलेल्या संधींचं त्यांना सोनं करता आलं नाही.
भारतानं चीनसोबतच्या सामन्यात ज्या चुका केल्या होत्या, त्या या सामन्यादरम्यान टाळल्या तरीही 3-4 या फरकानं संघाला पराभवाला सामोरं जावं लांगलं. पण बरोबरी करण्यात संघ अयशस्वी ठरला.
इतिहास रचण्याची संधी हुकली...
या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाला इतिहास रचला असता. याचं कारण म्हणजे याआधी न्यूझीलंडसोबत झालेल्या सगळ्याच्या सगळ्या 13 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय संघानं एफआयएच लीगमध्ये खेळाचं जे प्रदर्शन केलं त्यामुळे आणि गेल्या दोन वर्षांत कोव्हिडमुळे न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय सामने कमी खेळल्यामुळे न्यूझीलंडला आपण पराभूत करू, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, हे शक्य झालं नाही.
सामन्याचा तिसरा क्वार्टर अत्यंत वेगानं खेळला गेला. भारतीय संघ बरोबरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच न्यूझीलंडनं उत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पेनल्टी कॉर्नर प्राप्त केला. डेव्हिस फ्रान्सिसनं त्याचं रुपांतर गोलमध्ये करत 3-1 अशी बढत प्राप्त केली.
पण, भारतानं क्वार्टर संपुष्टात येण्याआधीच लालरेमसेमीच्या गोलमुळे 2-3 असा फरक कायम राखला. भारतानं पहिल्या दोन्ही क्वार्टमरमध्ये अत्यंत आक्रमकपणे सुरुवात केली.
वंदना कटारिया, नेहा, शर्मिला आणि सोनिका सगळ्यांनीच चांगला ताळमेत दाखवत हल्ला केला. पण, फिनिशिंगच्या वेळेस मात्र संघाला अडचणींचा सामना करावा लागला.
कमीतकमी दोनदा सर्कलमध्ये भारतीय फॉरवर्ड पासवर नियंत्रण मिळवून गोल करण्यात संघ अपयशी ठरला.
भारताला मिळाली बढत
न्यूझीलंडनं वेळोवेळी हल्ला करत दोन्ही क्वार्टर्सच्या शेवटी गोल करत हाफ टाईमपर्यंत 2-1 अशी बढत मिळवली.
भारतीय डिफेन्समधील कमतरतेचा फायदा घेत गोल जोप टेसानं न्यूझीलंडसाठी दुसरा गोल केला.
भारतीय डिफेन्समध्ये गुरजीत कौर आणि दीप ग्रेस एक्का मैदानावर इतर खेळाडूंसोबत मजबूर भिंत उभी करू शकल्या नाहीत. अनेकदा तर न्यूझीलंडनं फ्लॅक बदलल्यानंतर भारतीय डिफेन्समध्ये खिंड दिसून आली आणि न्यूझीलंडकडून त्याचा फायदा घेण्यात आला.
भारतानं खेळाची सुरुवात आक्रमकपणे केली आणि संघाला तिसऱ्या मिनिटाला यशही मिळालं. वंदना कटारियानं गोल करत भारतीय संघाला गोल करत बढत मिळवून दिली. पण हीच बढत संपूर्ण क्वार्टरदरम्यान कायम ठेवण्यास ती अयशस्वी राहिली.
या क्वार्टरचा तीन मिनिटांचा खेळ शिल्लक राहिला असताना न्यूझीलंडनं पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला. यावेळी मेरी ओलिवियानं ड्रेग फ्लिकमधून गोल करत एक-एकची बराबरी साध्य केली.
या सामन्यापूर्वी भारत ब गटात दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. न्यूझीलंड दोन सामने खेळून चार गुणांसह पहिल्या स्थानावर, तर तीन सामन्यांच्या माध्यमातून चार गुणांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर होतं. थेट उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता.
गेल्या पाच वर्षांपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकही सामना खेळला गेला नाही. भारतीय संघाने मे 2017 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली. मात्र या दौऱ्यात भारतीय संघाला विजयापासून दूर राहावे लागले.
एखाद्या संघाविरुद्ध दीर्घकाळ न खेळल्यामुळे त्याच्याविरुद्ध रणनीती आखणे थोडे अवघड जाते.
पण भारतीय संघाची प्रशिक्षक जेनेक शॉपमन या संघाचे विश्लेषणात्मक प्रशिक्षक देखील राहिली आहे. ती समोरच्या संघाचे व्हिडीओ पाहून आकलन करण्यात माहीर आहे.
अशाप्रकारे त्यांनी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी तयार केले, पण संघाला ही तयारी मैदानावर दाखवता आली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)