शिवसेना वि. शिवसेना सामना काही तासांत रंगणार, बंडखोर आमदार मुंबईत दाखल

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गेल्या 11 दिवसांपासून सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या आमदारांना गोव्याहून मुंबईत घेऊन आले आहेत.

आता हे आमदार मुंबईतल्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहचले आहेत. तिथं भाजप नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी या आमदारांचं स्वागत केलं आहे.

दरम्यान, उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात उद्या सुरू होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा होणार आहे.

बंडखोर आमदारांच्या प्रवासादरम्यान कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी मुंबईत पोलिसांचा विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उद्या-परवा विधानसभेचं विशेष अधिवेशन

महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आल्यांनतर राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन येत्या 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आलं आहे.

या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी 3 जुलैला होणार असल्याचं विधान मंडळ सचिवालयानं कळवलं आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.

महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार

विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक आज मुंबईत झाली. त्यात राजापूर मतदार संघातले शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडे होते. पण सध्याच्या सत्तासंघर्षात ते शिवसेनेला देण्यात आले आहे.

भाजपकडून राहुल नार्वेकर उमेदवार

भाजपकडून राहुल नार्वेकर यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत.

नार्वेकर हे देखील एक काळी शिवसेनेत होते. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.

शिवसेनेकडून व्हिप जारी

सुनील प्रभू यांनी 3 लाईन व्हिप जारी केला आहे. शिवसेनेच्या 55 आमदारांना व्हीप लागू असेल. राजन साळवी यांना मतदान करण्याचे व्हिप जारी केलं आहे. जे करणार नाहीत त्यांच्याविरोधात पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

3 लाईन व्हिप गंभीर मानला जातो. हा व्हिप जारी केल्यास थेट अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.

महाविकास आघाडीकडून राज्यपालांवर टीका

महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालाकडून विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर त्याही वेळी टीका करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, "आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)