You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयपूरमधले मुस्लीम म्हणतात, 'गुन्हेगारांना शिक्षा द्या, इतरांना त्रास कशाला?' - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, उदयपूरहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
दोन विशाल दरवाजांच्या आसपास राजस्थान पोलिसांचे जवळपास 20 जवान खडा पहारा देत आहेत. एका अरुंद रस्त्यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून इथे प्रशासनाच्या कडक नियमांमुळे पाखरूही फडफडू शकत नाहीये.
उदयपूरच्या या भागाला हाथीपोल म्हणतात आणि हा भाग मुस्लीमबहुल आहे. इथल्या एका गल्लीत कन्हैया लाल या शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीची दोन मुस्लीम व्यक्तींनी हत्या केली होती.
या भागात संचारबंदी लागू आहे आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कन्हैया लालची हत्या करणाऱ्या दोन मुस्लीम युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत.
उदयपूरसकट सगळ्या राज्यात इंटरनेट सेवा बंद आहेत आणि रस्ते ओस पडलेत. घरात बंद असलेले लोक अजूनही या घटनेच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
हत्या करण्याऱ्या मुस्लीम युवकांनी व्हीडिओ बनवून सांगितलं होतं की, कन्हैया लालने भाजपच्या माजी प्रवक्ता नूपुर शर्मांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा सूड म्हणून ही हत्या केलेली आहे.
उदयपूरचे मुस्लीम
या भागातल्या मुस्लीम समुदायातली बेचैनी वाढलेली आहे.
शहराच्या जुन्या भागात राहाणाऱ्या रियाज हुसैन यांनी कन्हैया लाल यांच्या हत्येनंतर जमलेला जमाव आणि त्या जमावाचा राग पाहिला होता.
त्यांनी म्हटलं, "जिथे तुम्ही आता उभे आहात, माझ्या घराच्या बाहेर तिथे परवा रात्री मोठा प्रमाणावर तोडफोड झाली, माझ्या गाड्या फोडल्या, शेजाऱ्यांच्या तीन गाड्या जाळल्या. देशाच्या गंगा-जमनी तहजीबला बट्टा लागला आहे हा."
2011 च्या जनगणनेनुसार उदयपूरमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 10 टक्के मुस्लीम लोक आहेत.
या घटनेनंतर बीबीसी जिथे-जिथे गेलं, तिथे लोक मोकळेपणाने बोलत नाहीत आणि कॅमेऱ्यावर येऊ इच्छित नाहीत.
घराच्या दारखिडक्या बंद करून घेतात आणि कॅमेऱ्यावर आपल्या नावासकट आपला चेहरा जाणार नाही याची काळजी घेतात.
शहरातल्या कहरवाडी भागात आम्ही घराबाहेर ओट्यावर बसलेल्या मोहम्मह फिरोज मन्सूर यांना भेटलो.
त्यांनी म्हटलं, "सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी याचा काहीच संबंध नाहीये. काही माथेफिरू लोकांनी हे कृत्य केलं आणि त्याचा परिणाम प्रत्येक सामान्य माणसाला भोगावा लागतोय. आमचाही नाईलाज आहे, आम्ही हे घर, हा भाग सोडून दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. पण लोकांच्या मनात खूप भीती आहे."
गेल्या एका वर्षांत किती बदललं राजस्थान?
राजस्थातल्या धार्मिक हिंसेचा इतिहास फार जूना नाहीये. पण गेल्या एका वर्षांत करौली, जौधपूर, अल्वर आणि आता उदयपूरमधल्या घटनांमुळे लोकांच्या मनातली चिंता वाढवली आहे. साहजिकच अल्पसंख्यांक समुदायाच्या मनातही याबद्दल भीती आहे.
उदयपूरच्या जुन्या भागात राहणाऱ्या एका आईच्या मनात आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल काळजी आहे. या धार्मिक तणावामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल याची चिंता आहे.
गुलाब बानो त्याबद्दल मोकळेपणाने कॅमेऱ्यावर बोलल्या. "आम्ही इथेच लहानाचे मोठे झालो पण कधी असं वातावरण पाहिलं नाही. आम्ही संसारी माणसं आहोत. वातावरणात भीती वाढली आहे. आमची मुलं भीतीच्या छायेखाली जगतात. शाळा बंद आहेत. आताच तर कोरोनातून सावरलो होतो, आता परत शाळा बंद आहेत. काय शिकणार आमची मुलं या काळात?"
सूड घेतला जाईल याची भीती
कन्हैया लाल यांची नृशंस हत्या झाल्याप्रकरणी लोक अजूनही चिडलेले आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आहे. तपास सुरू आहे, पण या हत्येचा बदला घेण्याची भावना जोर पकडताना दिसतेय. कर्फ्यू असतानाही कन्हैया लाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंचा जमाव जमला होता.
यानंतर उदयपूरमध्ये हत्येचा विरोध करण्यासाठी एक रॅली आयोजित केली होती ज्यात 8 हजार लोक सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि सोशल मीडियावर मेसेजही व्हायरल झाले.
उदयपूर हिंदू जागरण मंचाच्या युवा शाखाचे प्रमुख शक्ति सिंह यांनी म्हटलं की, "हिंदू समाज घाबरणारा नाही, कोणीही गैरसमजात राहू नये. सेक्युलर असल्याची शिक्षा भारत आता भोगणार नाही. उदयपूरच्या हिंदू समाजाने नेहमीच दुसऱ्या धर्मांना सहकार्य केलं आहे पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही दिवसाढवळ्या येऊन आम्हाला माराल."
धार्मिक दंगली कधीच एका जागेपुरत्या मर्यादित राहात नाहीत त्यामुळे यात सर्वसामान्य माणूसच भरडला जातो. ज्या भागात कन्हैया लाल यांची हत्या झाली, तिथेच लहानाचे मोठे झालेले जेष्ठ नागरिकही आता घाबरलेले आहेत.
57 वर्षांच्या रशीदा बेगम भाजीचा गाडा लावतात. त्या म्हणतात, "उपाशी बसलोय, अजून काय करणार? कुठे जाणार. आणि गेलो तर पोलिसांच्या लाठ्या खाणार का? पहिल्यांच असं घबराटीचं वातावरण पाहिलं आहे. ज्यांनी केलं त्यांना शिक्षा मिळतेय, एका हाताने टाळी वाजत नाही. दुसऱ्यांना का शिक्षा देताय?
गेल्या काही वर्षात वाढल्या धार्मिक दंगली
अनेक लोक या प्रकरणाला हेट-स्पीच आणि सोशल मीडियावर भावना भडकवणारी वक्तव्य करणं याच्याशी जोडत आहेत. उदयपूरमध्ये असा तणाव आधी कधीच पाहिला गेला नव्हता.
राजस्थान सरकारसाठी काम केलेले निवृत्त इंजिनियर हाजी मोहम्मद बख्श म्हणतात की, "आम्हाला आजही या गोष्टीचा अभिमान आहे की उदयपूर जगभरात नावाजलेलं गेलेलं एक शांत शहर आहे."
ते म्हणतात, "इथे सगळेच प्रेमाने राहातात. आज नाही तर महाराणा प्रतापांच्या काळापासून. तेव्हा हकीम खान सूरी त्यांचे सेनापती होते. पण केल्या काही काळापासून इथलं सौहार्दपूर्ण वातावरण राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी बिघडवत आहेत. प्रत्येक समाजात अशांत लोक असतातच."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)