You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गुड न्यूज' कधी मिळणार, केव्हा पाळणा हलणार असे प्रश्न विचारण्याआधी.....
जून महिना हा Infertility Awareness Month म्हणजेच वंध्यत्वाविषयीची जागृती करण्यासाठीचा महिना आहे.
जगभरातील लाखो जोडपी दरवर्षी वंध्यत्व आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक-मानसिक ताणाला सामोरी जातात. महिला आणि पुरूष अशा दोघांमधील वंध्यत्व, त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी, समाजात असणारे समज -गैरसमज याविषयीची जनजागृती करणं यासाठी सध्या विविध प्रकारे प्रयत्न केले जातात.
संहिता हिस्वनकर या आयटी क्षेत्रात काम करतात. मराठी ई-पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या ई-साहित्य प्रतिष्ठानशीदेखील त्या संलग्न आहेत. वंध्यत्वाशी संलग्न विविध अनुभवातून आलेले विचार त्यांनी या ब्लॉगमधून मांडलेत.
फेसबुकच्या मित्रयादीत जर तुमच्याकडे साधारण पंचवीस-तीस वर्ष वयोगटातील लोक असतील तर तुम्ही हे नक्कीच पाहिलं असेल. साधारण दोन वर्षांपूर्वीपर्यंत फेसबुकवर प्री-वेडिंग चे फोटो आणि लग्नाच्या पोस्ट्सचा पूर आलेला होता. तसाच सध्या प्रेग्नन्सी फोटो आणि बाळाचे आगमनवाल्या पोस्ट्सचा पाऊस पडतो आहे.
काक्या-आत्या-आज्या-मावशांसोबत आता अगदी अंकल लोक्स सुद्धा "काय... काही खबर आहे की नाही?" विचारायला लागले आहेत. 'डोक्यात जातात हे प्रश्न पण आता करणार काय?' असा विचार करत जुनी झालेली नवविवाहीत जोडपी तयारीला लागली आहेत. काही पास झाली तर काहींकडे शेवटचे पर्याय उरलेत.
या सगळ्या घबाडघाईमध्ये काही आवाज दबून राहीले आहेत. त्यांना मोकळं करण्यासाठी हा शब्दप्रपंच.
आमच्या infertility म्हणजेच वंध्यत्वाचं निदान होऊन आता तीन वर्षं होऊन गेली आहेत. "गूड न्यूज कधी?" हे विचारणारी जनता प्रजोत्पादनासंबंधी आरोग्याच्या (Reproductive health) च्या बाबतीत अजूनही किती अनभिज्ञ आहे हे आम्ही त्यांना आमच्या निदानाविषयी सांगायला लागल्यावर आमच्या लक्षात आलं.
अजूनही कित्येक लोकांना बेसिक शरीररचना माहित नाही. अंडाशय (overies), गर्भाशय (uterus), अंड नलिका(fallopian tubes), ग्रीवा (cervix) हे शब्द ऐकून लोक जितके नर्व्हस होतात तितके ते आई-बहिणीवरच्या शिव्यांनीसुद्धा होत नाहीत. यांच्यामते नवरा बायकोने लग्न करून जे बेडरूममध्ये घुसावं ते प्रेग्नंट होऊनच बाहेर यावं आणि थेट तीच बातमी सगळ्यांना सांगावी. इतर कुठल्याही प्रकारची चर्चाच मुळात अपेक्षित नसते.
सगळ्यांत महत्वाचं म्हणजे मुलं होऊ द्यायची की नाही, हा एक अतिशय वैयक्तिक मुद्दा आहे. त्यात नवरा-बायकोशिवाय इतर कुणीही न विचारता मत व्यक्त करू नये आणि प्रश्नही विचारू नयेत.
तरी पण आपल्या लक्षात जर हे येत नसेल आणि हा प्रश्न विचारायचाच असेल तर या विषयांवर चर्चा करताना आधी किमान स्वतःला बेसिक माहिती तरी असावी. ती नसेल तर ती करून घ्यावी.
समोरच्याबद्दल आणि त्याच्या परिस्थिती वा निर्णयप्रक्रियेबद्दल आदर असावा. आणि मग एकदा या विषयाला हात घातला तर त्यातून जे काही बाहेर येईल ते अगदी नाजूक पद्धतीने हाताळणी करण्याची तयारी ठेवावी.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार जगभरात 4.8 कोटी जोडपी आणि 18 कोटी व्यक्ती या समस्येने बाधित आहेत.
याबद्दल फार बोललं जात नसलं तरीही आजच्या जगात हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ज्या जोडप्याला तुम्ही प्रश्न विचारत आहात ते यातून जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुणीही या विषयावर बोलताना योग्य तो आदर आणि तारतम्य बाळगून बोलणं गरजेचं आहे.
पण तरीही हा विषय निघाला की साधारणपणे तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात
1. ओह...अच्छा! म्हणून हा विषय अतिशय गुळमुळीत पद्धतीने टाळला जातो.
2. तुम्ही अमुकतमुक करा / फलाण्या डॉक्टरच्या हाताला फारच गुण आहे, त्याच्याकडे जा वगैरे उपाययोजना करण्याचे सल्ले दिले जातात.
3. 'तुम्ही टेन्शन घेऊ नका', 'योगा/ प्राणायाम करा', 'पॉझिटिव्ह रहा - तुमच्या नकारात्मक असण्याने सक्सेसचे चान्सेस कमी होतात,' इत्यादि सल्ले दिले जातात.
"म्हणजे IVF सायकल्स सुरू आहेत म्हटल्यावर काहीजण सरळ अभिनंदन करून मोकळे होतात...या सायकलचा रिझल्ट काय होता, हे विचारायची तसदीही घेत नाहीत. आणि मग ही प्रक्रिया यशस्वी झाली नाही, हे सांगितल्यावर 'देवावर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा' असं सांगितलं जातं.
संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना मनाचा हिय्या करून सकारात्मकता ठेवलेली असते. त्यानंतरही आलेलं अपयश पचवत असतानाच तोंडावर मारले जाणारे 'सकारात्मक रहा'चे सल्ले अपमानजनक असतात. पण ज्या प्रश्नाची सगळ्यांत जास्त गरज असते, तो कुणीही विचारत नाही. तो म्हणजे - "Are you okay? तुम्ही दोघं ठीक आहात का?"
वंध्यत्वाशी झगडणारे लोक अनेक पातळ्यांवर असू शकतात. काही असे असतील जे बरेच दिवस प्रयत्न करताहेत पण गर्भ राहू शकत नाहीयेत. काहींनी डॉक्टरांशी चर्चा केलेली असेल तर काहींनी नसेल. काहींना नेमका प्रॉब्लेम काय आहे ते कळलं असेल तर काहींना कळलं नसेल.
काहींना PCOD / hormonal imbalance / fibroids अशा इतर काही समस्या असतील त्यामुळे सुरुवात करण्याच्या आधीच त्यांना कल्पना असेल की आपल्याला यात त्रास होणार आहे.
कुणाचं निदान होऊन काही दिवसच झाले असतील तर कुणी वर्षानुवर्ष झगडत असेल...
या विवंचनेत असणारे लोक इतके विविध प्रकारचे असतात आणि त्यांचे प्रॉब्लेम एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात की तुमचा एक सल्ला त्यांना लागू पडण्याचे चान्सेस फारच कमी असतात. बऱ्याचदा त्यातून दिशाभूल आणि मनस्ताप होऊ शकतात.
वंध्यत्व ही शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय अवघड आणि थकवून सोडणारी गोष्ट आहे. त्यावर होणारे इलाज अगदी वर्षानुवर्षं चालतात. प्रत्येक महिन्याला त्यात अनेक प्रकारची औषधं, कित्येक चाचण्या, बऱ्याच प्रकारे देखरेख, रोज केली जाणारी सोनोग्राफी इत्यादी बऱ्याच गोष्टी असतात.
हे सगळं अतिशय खर्चिक असतं आणि इतकं सगळं करून त्यात यश येईल की नाही याची खात्री नसते.
दर महिन्याला 'या महिन्यात यश येईल का...' ही आस लावणं आणि टेस्ट निगेटिव्ह आल्यावर तो अपेक्षाभंग पचवणं हेही त्यात येतं.
त्याचा येणारा मानसिक ताण हा एका वेगळ्याच पातळीवरचा असतो. वर्षानुवर्षं यावर काम करत असताना इतर आयुष्य थांबलेलं नसतं. नोकरी, घर आणि करियरचे ताण त्याच्यात्याच्या ठिकाणी सुरूच असतात.
समाजाच्या नजरा असे प्रश्न सतत विचारत असतात ज्यांची उत्तरं आपण देऊ शकत नाही. हे सगळं सांभाळत प्रयत्न करत राहणं, ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे जर कुणी प्रयत्न थांबवायचं जरी ठरवलं, तरी त्यात चुकीचं काहीच नाही.
ही प्रक्रिया एका योग्य टप्प्यावर येऊन थांबवण्यात, परिस्थितीचा स्वीकार करून आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्राधान्य देण्यात काहीही कमीपणा नाही. हा त्या त्या जोडप्याचा अधिकार आहे.
तर मग या सगळ्या जंजाळात एक सामान्य व्यक्ती म्हणून आपली भूमिका काय असावी? एक जबाबदार मित्र/मैत्रीण/नातेवाईक/हितचिंतक म्हणून तुम्ही नेमकं काय करावं?
1. सजग रहा : माणसाच्या प्रजनन संस्थेबद्दल किमान बेसिक माहिती करून घ्या. बाई आणि पुरुषांचे प्रजोत्पादक अवयव आणि त्यांची कामं एवढं जरी तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला या समस्येच्या गुंतागुंतीची कल्पना येईल. जर इतर कुणी तुमच्याशी बोलू इच्छित असेल तर ते संभाषण करणं तुम्हाला सोपं जाईल.
2. संवेदनशील रहा : नव्या पिढीशी बोलताना 'गूड न्यूज कधी?' हा प्रश्न विचारण्याच्याऐवजी किंवा त्यांना सल्ले देण्याऐवजी त्यांच्या निर्णय स्वातंत्र्याचा आदर करत त्यांच्याशी संवाद साधा. तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांच्या इच्छा समजून घ्या आणि त्यांचा मान ठेवा. तुम्हाला सल्ला देण्याची कितीही इच्छा असली तरी ते सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत की नाही, याची आधी खात्री करून मगच बोला.
3. संतुलित रहा: जर तुमच्या माहितीत कुणी infertlity मधून जात असेल तर त्यांना आणि त्यांच्या समस्येला टाळू नका. तुमच्याशी बोलणं त्यांना कम्फर्टेबल आहे का, हे विचारा. नसतील तर त्याचाही आदर करा. आणि असतील तर त्यांना त्यांच्या नेमक्या परिस्थिती बद्दल शेअर करू द्या. त्यांचं ऐकून घ्या.
त्यांच्या इलाज करण्याच्या पद्धतीवर किंवा त्यांनी निवडलेल्या डॉक्टरबद्दल शंका व्यक्त करण्याआधी त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स बघा. शक्यतो तुमचे सल्ले त्यांनी स्वतः विचारल्या शिवाय देऊ नका. यात अगदी "मूल होत नसेल तर दत्तक घ्या" वाले सल्ले सुद्धा देताना विचार करा. त्यांचं ऐकून घ्यायचा प्रयत्न करा.
प्रत्येक जोडप्याची किंवा व्यक्तीची ती मानसिक तयारी असेल असं नाही. शक्य असेल तर आयुष्याच्या इतर भागात मदत करा. म्हणजे जर एखादी मोठी अपॉइंटमेंट असेल तर त्यादिवशी जेवणाचा डबा पाठवणे किंवा जर यामुळे मानसिक त्रास होत असेल तर फक्त मन रिझवण्याकरता गप्पा मारायला भेटणं इत्यादी.
वंध्यत्वाची समस्या त्यातून जाणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा प्रचंड एकटं पाडते. आपल्या आजूबाजूला कित्येक लोक या समस्येतून जात आहेत. त्यात काही लोक यशस्वी होतील आणि काही होणार नाहीत. यात त्यांची किंवा इतर कुणाचीही काही चूक नाही. त्यांना एकटे पडू न देणं आपल्या हाती आहे.
तुम्ही दिलेली थोडीशी सहानुभूती आणि सपोर्ट त्यांना खूप मदत करू शकते... या परिस्थितीचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. समाजाच्या दबावाखाली येऊन उगाच एकामागोमाग एक उपाय करत शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत राहण्याऐवजी जे होईल ते होईल हा विचार हताश मनाने नाही तर शांत मनाने अंगिकारला पाहिजे. त्यातून आपण एक समाज म्हणून प्रगल्भ होऊन बाहेर पडू.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)