मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, 14 जणांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

पावसाळा सुरू होताच इमारत कोसळण्य़ाची घटना मुंबईतील कुर्ला येथे घडली आहे. कुर्ल्यातील नाईकनगर परिसरात सोमवारी (27 जून) रात्री ही इमारत कोसळली.

या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत.

या दुर्घटनेची चौकशी केली जाईल, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

'मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत केली जाईल आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील,' असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केलं.

या दुर्घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असंही सुभाष देसाई यांनी म्हटलं.

नाईक नगर परिसरातील 4 इमारती एकमेकांना अगदी चिकटून उभ्या आहेत. त्या धोकादायक असल्याची नोटीस पालिकेने यापूर्वीच बजावलेली होती मात्र रहिवाशांनी ती सोडली नव्हती. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

2. सोनिया गांधींच्या स्वीय सहायकावर बलात्काराचा आरोप

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सहायक पी. पी. माधवन यांच्यावर बलात्काराचा आरोप कर्यात आला असून त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

नोकरी आणि विवाहाचे आमिष दाखवून माधवन यांनी आपली फसवणूक केल्याचं या पीडित महिलेचं म्हणणं आहे.

तिच्या पतीचं 2020 साली निधन झाले असून ते काँग्रेसचे फलक लावण्याचं काम करत असत. ही बातमी न्यूजरुम पोस्टने प्रसिद्ध केली आहे.

3. अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ईडीला परवानगी

डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भातील चौकशीसाठी उद्योजक अविनाश भोसले यांचा ताबा मिळावा यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मागणी केली होती. गेल्या महिन्यात याच गुन्ह्यासाठी भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.

आता ईडीने त्यांच्याविरोधात वॉरंटसाठी मागणी करुन त्यांची चौकशी करण्याची परववानगी मागितली.

त्याचप्रमाणे कोर्टाने फरिद सामा नावाच्या व्यक्तिविरोधातही अजामिनपात्र वॉरंट प्रसिद्ध केले. सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात सीबीआयनेही पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केली आहे.

4. नव्या सरकारचे फटाके लवकरच फोडू- श्रीकांत शिंदे

सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना दिलासा मिळाल्यावर ठाण्यात जल्लोष करण्यात आला. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, 'हा सत्याचा विजय असून शिवसेना संपवण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने लगावलेली चपराक आहे'.

तत्पुर्वी श्रीकांत शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शनही घेतले होते.

आता लवकरच नव्या सरकारचे फटाके फोडू आणि तुम्हालाही बोलावू असे सूचक विधान त्यांनी काल केले. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

5. पाणी प्यायला नवरा उतरल्यावर महिला, मुलांसह गाडी पळवली

पाणी प्यायला नवरा उतरल्यावर एका व्यक्तीने गाडीमध्ये असणाऱ्या महिला आणि मुलांसह अपहरण करण्याची घटना साताऱ्यातील पुसेगाव येथे घडली आहे.

मात्र महिलेने प्रसंगावधान दाखवून स्वतःची व मुलांची सुटका करुन घेतली. या आऱोपीला अटक करण्याता पोलिसांना यश आले आहे.

एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. या बातमीनुसार, कील असलेल्या जयश्री गोरे आणि त्याचे पती महेश गोरे आपल्या चार महिन्याचा लहान मुलगा, 8 वर्षाची मुलगी, भाची आणि भाऊजी यांच्यासह कामानिमित्त शिखर शिंगणापूर इथे गेले होते. रात्री 11.55 वाजण्याच्या सुमारास ते पुसेगाव इथं आल्यानंतर तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जयश्री याचे पती महेश आणि भाऊजी हे दोघेही खाली उतरले.

कारमध्ये जयश्री गोरे या ड्रायव्हर सीटलगत बसल्या होत्या आणि त्यांच्या मांडीवर त्यांचं लहान बाळ होतं. तर मागे मुलगी आणि भाची बसली होती. यावेळी अचानक कारमध्ये एक तरुण शिरला आणि त्याने गाडीतील महिला, मुलांसह जोरात गाडी पळवायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जयश्री गोरे गोंधळल्या. पण त्यांनी प्रसंगावधान दाखवत तान्ह्या बाळासह आरोपीशी झुंज दिली.

जयश्री गोरे यांनी लाथाबुक्क्यांनी आरोपीला विरोध केला. जयश्री गोरे यांचं आक्रमक पवित्रा पाहून आरोपीही घाबरला. त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका लाकडाच्या ढिगाऱ्यावर आदळली. आरोपीने तिथेच गाडी सोडून पलायन केलं. हा सगळा थरार 10 मिनिटे सुरू होता. चालत्या गाडीत झालेल्या झटापटीत 4 महिन्यांच्या बाळासह जयश्री गोरेही किरकोळ जखमी झाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)