विधान परिषद निवडणूक : मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय घडामोडींना वेग

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या रणनीतीमुळे महाविकास आघाडीनेही यावेळी कंबर कसल्याचं दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही गोटात जोरदार हालचाली रविवारी रात्री उशिरापर्यंत दिसून आल्या.

आपल्या उमेदवारांना कसं निवडून आणायचं यासंदर्भात राजकीय खलबतं दोन्ही पक्षांकडून सुरू होती. रात्रीपर्यंत या राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

काँग्रेस नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट

मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेत निवडणुकीबाबत चर्चा केली.

याशिवाय, अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे हेसुद्धा अजित पवार यांना भेटायला आले. ते राष्ट्रवादीच्या जवळचे मानले जातात.

राज्यसभेनंतर संजय राऊत यांनी ज्या अपक्षांनी मतदान केलं नाही त्यात शिंदे यांचं नाव घेतलं होतं.

"संजय राऊत यांनी असं बोलायला नको होतं. त्यांच्यावर मी काय बोलाणार. मी राष्टवादीसोबत आहे," असं शिंदे यांनी म्हटलं.

निवडणुकीची चिंता नाही - उद्धव ठाकरे

मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही, हारजीत होत असते. उद्या जिंकणारच आहोत. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित आहे. फुटलं कोण त्यात अंदाज लावला आहे. त्याचा हळूहळू उलगडा होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, "मी रावते आणि देसाई यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण त्यांच्यात धूसपूस नाही. हा खरा शिवसैनिक. निवडणूक म्हटलं की आमदारांची बडदास्त ठेवावी लागते.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडणार नाही हे दाखवणारी. सत्तेपुढे शहाणपण आणि माज चालणार नाही."

"आता शिवसेनेत गद्दार मनाचा कोणीच नाही. आत हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत. गर्व से कहो हम हिंदु है अशी घोषणा होती. पण हिंदु हा शब्द कोणी उच्चारत नव्हतं," असं ते पुढे म्हणाले.

'एकमेकांची मतं फोडण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू' - देवेंद्र फडणवीस

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, "कुठल्याही परिस्थितीत भाजपची मत कमी करण्यासाठी रवी राणा यांना नोटीस बजावण्यात आलीये. पण असं करता येणार नाही. तिन्ही पक्ष एकमेकांची मतं फोडण्यासाठी अपक्ष आमदारांना फोन करत आहेत. त्यांच्या समन्वय नाही. आघाडीतील असंतोष आम्हाला जिंकून देईल."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, "भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु असून विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे.

"आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून वेळ आली की ही माहिती समोर आणू."

पुन्हा एकदा रंगणार सामना?

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी रंगलेला सामना राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता दिसत आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस

राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही महाविकास आघाडीतर्फे आमदारांना एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. मतदान कसं करायचं, याच्या तंतोतंत सूचना दिल्या होत्या.

तरीही ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अधिक खबरदारी घेतली जात आहे.

एकही आमदार फुटू नये, यासाठी सरकारकडून काळजी घेतली जात आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना दोन दिवस आधीपासूनच हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावण्यात आलं आहे.

शिवसेना आमदार पवई येथील रेनेसॉ हॉटेलमध्ये

राज्यसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जास्तीची खबरदारी घेण्यात येत आहे.

शिवसेनेचे आमदार तसेच सेना समर्थित अपक्ष आमदारांना काल दुपारपासून पवई येथील रेनेसॉ हॉटेलमध्ये दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

विधानपरिषद, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, राज्यसभा निवडणुकांवेळी आमदारांना हॉटेल्स तसंच रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं.

या हॉटेल परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल रेन्सॉ परिसराला आता जणू छावणीचंच रुप आलं आहे.

भाजपचे आमदारही आजपासून हॉटेलात

सत्ताधारी पक्षासोबत भाजपच्या आमदारांनाही आजपासून हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे आमदार ट्रायडंटमध्ये

राष्ट्रवादीच्या आमदारांनाही आजपासून मुंबईत दाखल होण्यास सांगितलं गेलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, ट्रायडंट हॉटेल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून तसे निरोप आमदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीचे सर्व आमदार आज मुंबईत दाखल होणार असून त्यांना दोन दिवसांसाठी ट्रायडंट हॉटेल येथे ठेवण्यात येणार आहे.

काँग्रेसची हॉटेलसाठी शोधाशोध

एकीकडे सर्व पक्षांची रणनीती आखली जात असताना काँग्रेसकडून मात्र हॉटेलसाठी शोधाशोध सुरू आहे. दक्षिण मुंबईतीलच एखादे हॉटेल आमदारांच्या दोन दिवसांच्या पाहुणचारासाठी निश्चित करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)