SSC Result: दहावीत मोजून मापून मिळाले 35 %, निकालानंतर म्हणाला... #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, @mi_Rahul_Salvi
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 मोठ्या बातम्यांचा घेतलेला हा आढावा.
1. सर्व विषयात 35 गुण, टक्केवारीही 35
काल 17 जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. त्यातच पुण्यातील एका विद्यार्थ्याने सर्व विषयात 35 गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
"दहावीत 35 टक्के मिळवायला लक लागतं. पण पोलीस बनून पुढे देशसेवा करण्याचे माझे स्वप्न आहे. मला 50 ते 60 टक्क्यांची अपेक्षा होती. पण तेवढे मिळले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे," असं शुभमनं म्हटलं आहे.
"माझे मित्र 50 टक्क्यांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेक्षा खाली असल्याचे थोडे दुःख वाटते. पण दहावीत 35 टक्के मिळवायला लक लागते." अशी प्रतिक्रिया शुभमने दिली आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिलीय.
दरम्यान, शुभमची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताच, तेथील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन शुभमचे अभिनंदन केले आहे.
2. हिंमत असेल तर समोरासमोर या, उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान
सातारा दौऱ्यावर असताना सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधीमुळे रखडला, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
त्यावर खासदार उदयनराजे यांनी हिम्मत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, पहिली चौकशी माझी होऊ द्या, असे खुले आव्हान दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील; त्याचे मला काहीही घेणे देणं नाही." अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे. असे वृत्त 'महाराष्ट्र टाईम्स'ने दिले आहे.
3. पाण्यापासूनही विमान आणि रेल्वे चालवणार, गडकरी यांचा फॉर्म्युला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी आपल्या अनोख्या कल्पना मांडत असतात. अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडला.

फोटो स्रोत, FACEBOOK/NITIN GADKARI
येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याचे ते म्हणाले.
"मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो", असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. असे वृत्त 'न्यूज 18 लोकमत' या वृत्तवाहिनीने दिले आहे.
4. तोपर्यंत सोयाबीनची पेरणी होऊ नये याची दक्षता घ्या - दादा भुसे
राज्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असून, त्याच्या पेरणीची घाई गडबड होण्याची शक्यता असल्याने पोषक पर्जन्यमान व वातावरण असल्याखेरीज सोयाबीनची पेरणी होऊ नये याची दक्षता कृषी विभाग व शेतकऱ्यांनीही घ्यावी, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

फोटो स्रोत, FACEBOOK/DADAJI BHUSE
महाराष्ट्रात अजूनही मोसमी पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस लांबणे किंवा अपुरा कोसळणे अशा शक्यता गृहीत धरून पेरणीचे नियोजन व्हावे.
सलग तीन दिवसात किमान 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याखेरीज पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. साताऱ्यात कृषी आढावा बैठकीत खरीप हंगाम नियोजनाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना ते बोलत होते. असे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले आहे.
5. हवामान बदलामुळे 5 दशलक्ष लोक विस्थापित
2021 या वर्षात हवामान बदल आणि आपत्तींमुळे भारतातील सुमारे 5 दशलक्ष लोक अंतर्गतरित्या विस्थापित झाले होते, असे संयुक्त राष्ट्राने एका अहवालात म्हटले आहे.

फोटो स्रोत, AFP
गेल्या वर्षी हिंसाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन, अन्न असुरक्षितता, हवामान बदल, युक्रेनमधील युद्ध आणि आफ्रिका ते अफगाणिस्तानमधील इतर आपत्कालीन परिस्थितींमुळे जागतिक स्तरावर 10 कोटी लोकांना आपली घरे सोडून पळून जावे लागले.
संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सी (UNHCR) च्या वार्षिक ग्लोबल ट्रेंड्स अहवालात ठळकपणे स्पष्ट केले आहे. असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























