नसीरुद्दिन शाह- मोदींनी पुढे येऊन समाजात पसरणारं विष रोखलं पाहिजे #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. मोदींनी पुढे येऊन समाजात पसरणारं विष रोखलं पाहिजे - नसीरुद्दिन शहा

समाजात पसरत असलेली नकारात्मकता थांबवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असं अभिनेते नसीरुद्दिन शहा यांनी म्हटलंय.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तसंच नुपूर शर्मा प्रकरणी भाजपनं केलेल्या कारवाईला फार उशीर झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांना एक आठवडा लागला.

नुपूर शर्मा 'फ्रिंज एलिमेंट' नाही तर भाजपची प्रवक्ता आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे, असंसुद्धा त्यांनी म्हटलंय.

नुपूर यांनी हिंदू देवतांचा अपमान झाल्याचा दावा करत त्यांचं वक्तव्य केलं होतं. त्यावर "तुम्ही मला एक वक्तव्य दाखवा ज्यात मुस्लिम हिंदू देवतांवर बोलले आहेत," असा सवाल या मुलाखतीत शाह यांनी विचारला आहे.

या संपूर्ण प्रकरणाला न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडिया जबाबदार असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला आहे.

"जर कुठल्या मुसलमानानं त्याच्या अधिकारांची गोष्ट केली तर त्याच्यावर निशाणा साधला जातो, पण आपण प्रत्येकाला भारतीय म्हणून का नाही पाहत," असासुद्धा सवाल नसीरुद्दिन शाह यांनी केला आहे.

2. ट्रायडंटमध्ये आशिष शेलारांचा अचानक प्रवेश, सेनेच्या गोटात खळबळ

शिवसेना आमदारांना ठेवलेल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये भाजप नेते आशिष शेलार बुधवारी (8 जून) अचानक पोहोचले. त्यामुळे तिथं असलेले शिवसेना आमदार आणि पदाधिकारी एकदम अलर्ट झाले.

हॉटेलच्या लॉबीमध्ये शेलार यांनी एका भाजप पदाधिकाऱ्यासोबत सुमारे तासभर चर्चा केली. मात्र आशिष शेलार यावेळी कुठल्याही शिवसेना आमदाराला भेटले नाहीत. पण आशिष शेलारांच्या अचानक प्रवेशामुळे सेनेच्या गोटात खळबळ मात्र पाहायला मिळाली.

झी२४ तासनं हे वृत्त दिलं आहे.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपचे 3, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यसभा निवडणूक प्रक्रिया कशी असते? मतदान कसं होतं? मतमोजणी कशी होती? याबाबत तुम्ही इथं अधिक वाचू शकता.

3. ...तर किरीट सोमय्यांचं थोबाड लाल करू - चंद्रकातं खैरे

औरंगाबामध्ये बुधवारी (8 जून) उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याआधी भाषण करताना चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

किरीट सोमय्यावर हे फालतू असून मी त्यांना शक्ती कपूर म्हणतो, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

"जसा उद्धव ठाकरे यांना भाजपावाल्यांनी धोका दिला, तसाच धोका मला औरंगाबादमध्ये भाजपाने दिला. भाजपावाल्यांनी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं काम केलं आहे. किरीट सोमय्या हे सातत्याने आपलं थोबाड वाकडं करून उद्धव ठाकेरेंवर टीका करत असतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील सोमय्या त्यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करतात. त्यामुळे औरंगाबाद मध्ये येऊन किरीट सोमय्यांनी अशा प्रकारे विधानं केली तर, त्यांचं थोबाड लाल करू," असं त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.

लोकसत्ताने यासंबंधित वृत्त दिलं आहे.

4. माझा मुलगा संत होता - सिद्धू मुसेवालाचे वडील

सिद्धु मुसेवालाचं अंतिम अरदास (शीख परंपरेनुसार दिवसकार्य) बुधवारी त्याच्या मानसामधल्या गावी पार पडलं. त्यावेळी लाखो लोकांची गर्दी झाल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केला आहे.

यावेळी उपस्थित लोकांना उद्देशून सिद्धु मुसेवालाचे वडिल बलकौर सिंग यांनी एक भाषण केलं. त्यावेळी बोलताना "माझा मुलगा संत होता, त्याने कुणाचही नुकसान नव्हतं केलं," असं बलकौर सिंग यांनी म्हटलंय.

लहानपणापासून आपल्या मुलानं कठीण परिस्थिती जीवन जगल्याचं त्यांन म्हटलंय. आपल्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गुडघे न टेकण्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली आहे. तसंच आपल्या मुलाचं नाव कुठल्याही विवादात जोडू नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

नवभारत टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित सौरभ महाकाळला पुणे पोलिसांकडून अटक - इथं अधिक वाचू शकता.

5. विमानात मास्क लावला नाही तर प्रवासबंदी

विमानातून प्रवास करताना मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश डीजीसीएकडून देण्यात आला आहे. डीजीसीए अर्थातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कोव्हिडसंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे.

विमानतळ परिसरात आणि विमान प्रवासात मास्क घालण्यास नकार देणार्‍या किंवा कोविड-19 प्रोटोकॉलचं उल्लंघन करणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार आता विनामास्क विमानतळ परिसरात प्रवेश करता येणार नाही.

तसंच जर कुणी प्रवासी वारंवार सांगूनही नियमांचं पालन करत नसेल तर संबंधित प्रवाशाला उड्डाण घेण्यापूर्वीच विमानातून खाली उतरण्यात येईल. तसंच त्याला 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्याची परवानगी जीडीसीएनं विमान कंपन्यांना दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)