You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेमी युगुलाने विष प्राशन केलं वेगवेगळ्या जागी, पण मृत्यू आला एकाच ठिकाणी
- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी, सांगलीहून
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहायच्या आणाभाका घेतल्या पण त्या व्यक्तीसोबत राहता आलं नाही. तेव्हा त्या व्यक्तीसोबत आयुष्य संपवण्याचा निर्णय एका युगुलाने घेतला.
मनाविरोधात लग्न झाल्यानंतर सांगलीतील जत येथे नवविवाहतांनी विष पिऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणावर तिचे प्रेम होते त्या तरुणाने देखील विष पिऊन आत्महत्या केली. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी विष पिऊन आत्महत्या केली.
नियती अशी की दोघांना उपचारासाठी एकाच रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा एकाच ठिकाणी मृत्यू आला.
लग्न होऊन अवघे पाच दिवस झाले होते, रिवाजाप्रमाणे ती माहेरी आली. मात्र ज्या दिवशी सासरी जायचे होते, त्या दिवशी तिने व तिच्या प्रियकराने एकमेकांना व्हिडीओ कॉल करून आत्महत्या केली.
प्रेमाच्या विरहातून या प्रेमयुगलांनी आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एकुंडी येथे हा आत्महत्येचा प्रकार घडला आहे.
नवविवाहित अश्विनी जगन्नाथ माळी, वय 21 आणि लक्ष्मण संभाजी शिंदे, वय 22, असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलांची नावे आहेत.
जत तालुक्याला हादरुन सोडणारी घटना सोमवारी घडली आहे. एकुंडी येथील एका प्रेमयुगलाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका नवविवाहित तरुणीसह तिच्या प्रियकराने विष प्राशन करून आपले आयुष्य संपवले आहे. अश्विनी माळी या नवविवाहित तरुणीसह लक्ष्मण शिंदे या दोघा प्रेमींनी सोमवारी सकाळी विष पिऊन जीवनयात्रा संपवली आहे.
जत ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदा अश्विनी माळी हिला अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शवविच्छेदन सुरू असताना गावातील लक्ष्मण शिंदे याला त्याच्या नातेवाईकांनी अत्यवस्थ स्थितीत दाखल केलं, पण त्याचाही उपचाराआधी मृत्यू झाला. त्यानंतर या दोघांनी प्रेमप्रकरणातून मृत्यू केल्याचा प्रकार समोर आला.
अश्विनी आणि लक्ष्मण या दोघांचे गेल्या 2-3 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र आंतरजातीय असल्याने दोघांच्या कुटुंबीयांना ही गोष्ट मान्य नव्हती, दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण ते प्रयत्न देखील अयशस्वी ठरले.
अश्विनी हिचा 1 जून रोजी घरच्यांनी मिरज तालुक्यातील सलगर येथील एका तरुणाशी विवाह करून दिला होता.
लग्नानंतर रविवारी ती रिवाजाप्रमाणे माहेरी एकुंडी या आपल्या गावी आली होती आणि सोमवारी ती पुन्हा सासरी जाणार होती. दुपारनंतर अश्विनीचे पती तिला घेण्यासाठी येणार होते.
मात्र सकाळी अश्विनी हिने विष प्राशन केलं. काही वेळानंतर अत्यावस्थ झाल्यानंतर घरच्या लोकांना अश्विनीने विष पिल्याची बाब लक्षात आली.
त्यानंतर घरच्यांनी तातडीने तिला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले,पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. ही घटना घडलेली असताना, त्याच वेळी गावातील लक्ष्मण शिंदे यानेही आपल्या घरात विष प्राशन केलं होतं, त्याच्याही घरच्यांना ही बाब लक्षात आल्यावर तातडीने लक्ष्मणला उपचारासाठी जत रुग्णालयात दाखल केले.
पण त्यापूर्वीचं त्याचाही मृत्यू झाला. दोघांनाही आत्महत्यापूर्वी एकमेकांना व्हिडीओ कॉल केला आणि त्याच वेळी दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुरू झाली.
या दोन्ही आत्महत्येची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबतीत तपास अधिकारी विजय वीर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, पोलीस ठाण्यात मयत म्हणून सध्या नोंद झाली आहे.
घटनास्थळीचा प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला आहे. तसंच अश्विनी हिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. ही नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे नातेवाईकांच्या जबाबानंतर समोर येईल, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे वीर यांनी सांगितले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)