You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
HSC RESULT: बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल तर मुंबईचा निकाल सर्वात कमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच HSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. 94.22 टक्के राज्याचा निकाल लागला आहे.
दरवर्षीप्रमाणे कोकण पहिल्या स्थानावर आहे. कोकणाचा निकाल 97.21 टक्के असून मुंबईचा सर्वात कमी 90.91 टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी 1 नंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
https://www.mahahsscboard.in/ आणि www.hscresult.mkcl.org या दोन वेबसाईटवर विद्यार्थी दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहू शकतात.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहता येतील.
कोणत्या विभागाचा किती निकाल?
कोकण - 97.21 टक्के
पुणे - 93.61 टक्के
नागपूर - 96.52 टक्के
औरंगाबाद - 94.97 टक्के
मुंबई - 90.91 टक्के
कोल्हापूर - 95.07 टक्के
अमरावती - 96.34 टक्के
नाशिक - 95.03 टक्के
लातूर - 95.25 टक्के
एकूण निकाल - 94.22 टक्के
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीचा निकाल 90.66 टक्के होता. त्या तुलनेत यावर्षी निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.
शाखेनुसार निकाल
विज्ञान - 98.30 टक्के
कला - 90.51 टक्के
वाणिज्य - 91.71 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम - 92.40 टक्के
मुलींनी बाजी मारली
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत सुरू होत्या. यंदा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी 8 लाख 17 हजार 188 मुलं आणि 6 लाख 68 हजार 3 मुली आहेत.
14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.21 टक्के इतका लागला आहे.
कोरोना आरोग्य संकटात दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच बारावी HSC बोर्डाची परीक्षा ऑलाईन पद्धतीने घेण्यात आली.
कोरोना काळात दोन वर्ष परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. शाळाही बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही आव्हानं वाढली होती, अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा देण्याचं टेंशन विद्यार्थी आणि पालकांना होतं.
या सर्व विद्यार्थ्यांसाठी बारावीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या निकालाच्या आधारेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
शिवाय, वैद्यकीय, इंजिनिअरींग, आर्कीटेक्चर, नर्सींग, अशा विविध क्षेत्रात प्रवेशासाठीही सीईटीसोबतच बारावी परीक्षेलाही महत्त्व असतं.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल." अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)