समीर वानखेडेंची चेन्नईत बदली #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.समीर वानखेडेंची चेन्नईत बदली
आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत.
समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणी चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या चुकीच्या तपासाबद्दल त्यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर एनसीबी मुख्यालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. या तपासाची जबाबादारी एनसीबीचे उपसंचालक जनरल संजय सिंह यांना सोपवण्यात आली.
आर्यनसह सहा जणांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करता येईल, असं ठोस आणि पुरेसे पुरावे या प्रकरणात मिळालेले नाहीत. एसआयटीच्या अहवालाची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
2. काँग्रेस सुधारणार नाही, आपल्यालाही बुडवेल-प्रशांत किशोर
"काँग्रेस स्वत: सुधारणार नाही आणि आपल्याला बुडवेल, असं म्हटलं. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती सर्वांना माहिती आहे", असं राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
"2011 पासून 2021पर्यंत मध्ये मी 11 निवडणुकांसबधी काम केली. त्यापैकी एका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, असं प्रशांत किशोर म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हापासून त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी माझं रेकॉर्ड देखील खराब केलं, असं प्रशांत किशोर म्हणाले. मात्र, पराभवातून खूप शिकता आलं", प्रशांत किशोर म्हणाले. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. बिहारच्या हाजीपूरमध्ये काँग्रेसमुळं माझं रेकॉर्ड खराब झाल्याचं म्हटलं. आता पुढील काळात काँग्रेससोबत काम करणार नसल्याचा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
3.नितीश कुमारांनी दिली महाराष्ट्राच्या सुपुत्राला उमेदवारी
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या काही वर्षांपासून जदयूवर एकहाती वर्चस्व ठेवलंय. जदयूतील अनेक नेत्यांचं महत्त्व त्यांनी कमी केलंय. नितीशकुमार यांनी आज देखील एक धक्कादायक निर्णय घेतला. राज्यसभेच्या दोन जागांसाठी नितीशकुमार यांनी अनिल हेगडे आणि खीरु महतो यांना उमेदवारी दिली. केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग यांना उमेदवारी न देता जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या आणि जदयूच्या दिल्लीतील कार्यालयात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्राच्या अनिल हेगडे यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली. तर, दुसरी उमेदवारी झारखंडमधील जेडीयू नेते खीरु महतो यांनी दिली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशभरात ५७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आरसीपी सिंग हे आयएस होते. नितीशकुमार यांनी त्यांना दोन वेळा राज्यसभेवर संधी दिली होती. आरसीपी सिंग यांना तिसरी टर्म न देता नितीशकुमार यांनी मोठी खेळी केली आहे. जदयूतर्फे अनिल हेगडे आणि खीरु महतो यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं आरसीपीसिंग यांच्यापुढं भाजपच्या मदतीचा पर्याय शिल्लक राहतो. भाजपनं मदत केल्यास आरसीपी सिंग यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.
4.एसटीची इलेक्ट्रिक बस शिवाई 1 जूनपासून
वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे.
'लालपरी' अर्थात एसटी 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे येथे बुधवारी (1 जून रोजी) होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 'टीव्ही9 मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
1 जून 1948 रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे
5.आरएसएसचा भगवा झेंडा राष्ट्रीय ध्वज असेल- भाजप नेते
कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आपल्या खळबळजनक विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकेदिवशी आरएसएसचा भगवा झेंडा राष्ट्रीय ध्वज असेल, यात काही शंका नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. के. एस. ईश्वरप्पा यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये देखील असंच विधान केलं होतं. त्यानंतर काल त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाची पुनरावृत्ती केली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"हजारो वर्षांपासून भगव्या झेंड्याचा आदर केला जात आहे. भगवा झेंडा हा त्यागाचं प्रतीक आहे. आरएसएसचा भगवा झेंडा एक दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात काही शंका नाही. त्यागाची भावना जपण्यासाठी आरएसएस भगवा ध्वज समोर ठेवून पूजा करते. संविधानानुसार तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज आहे आणि तिरंग्याला जो मान द्यायला हवा, तो आम्ही देतो", असं ईश्वरप्पा म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























