You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ अनिल बोंडे : या 6 वादग्रस्त वक्तव्यांमुळे आले होते चर्चेत
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. अमरावती दंगलीनंतर वादग्रस्त विधानांमुळे डॉ बोंडे चांगलेच चर्चेत आले होते.
अपक्ष आमदार ते कृषी मंत्री असा अनिल बोंडेंचा प्रवास आहे. वरूड- मोर्शी मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. मात्र या मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरुण आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव केला होता.
अमरावतीत दोन समुदायांमधील उसळलेल्या दंगलीनंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी दंगली भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते. त्यांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त विधानांवर नजर टाकूयात.
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
राणा दांपत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.
त्यानंतर शिवसेना कार्यकर्ते राणा यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यावर बोंडेनी मुख्यमंत्री "उद्धव ठाकरे यांच्या लंकेला महाबली हनुमंताच्या शेपटीने आग लागली," असं वक्तव्य केलं होतं.
2. नाना पटोले यांचा पंजा छाटण्याची धमकी
भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी 'मोदी गावगुंड'चं वक्तव्य केलं होत. त्यावर नानांचा पंजा तोडून टाकण्याचं वक्तव्य डॉ. बोंडे यांनी केलं होतं.
"मोदींना मारण्याची भाषा करणारे नाना शाहिस्तेखान आहेत. वेळ आली तर त्यांच्या हाताची बोटच नाही तर हाताचा पंजा तोडून टाकू. वरून पोरं निघाली आहे, आपला पंजा सांभाळून ठेवा," अशी धमकी डॉ. बोंडेनी दिली होती.
त्यानंतर त्यांच्यावर हिंसाचार भडवण्याचा आरोप झाला होता.
त्यावर बोलताना ते म्हणाले होते की, "मी हात छाटतो म्हटलं तर हिंसा भडकवली म्हणतात. मुख्यमंत्री उद्धवजी तर दात पाडून दाखवतो म्हणतात. मुख्यमंत्रीच हिंसेवर उतरले. काका पचते का तुम्हाला? आणि पटणार काय शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला?" असंही ते म्हणाले होते.
3. महविकास आघाडी सरकार हिंदूविरोधी
नोव्हेंबर 2021 मध्ये अमरावती शहरात दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीवर महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी असल्याची टीका डॉ. बोंडे यांनी केली होती.
"भाजपच्या मोर्चाला पांगवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न केले तेच मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चासाठी केले असते तर अमरावतीमध्ये काही घडलंच नसतं. मुस्लिमांच्या मोर्चाची सरकारने संपूर्णतः पाठराखण केली," असं त्यांनी म्हटलं होतं.
4. विदर्भ दौरा करतांना पवारांनी काळजी बाळगावी
18 नोव्हेंबर 2021 मध्ये शरद पवार यांचा नियोजित विदर्भ दौरा होता. दरम्यान पवारांच्या विदर्भ दौऱ्याला डॉ. बोंडे यांनी विरोध केला होता.
"पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत माहिती नाही. त्यांनी अमरावतीमध्ये येऊच नये. त्यांना संतप्त नागरिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विदर्भात फिरतानासुद्धा त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी," असा इशारा बोंडे यांनी दिला होता.
"शरद पवार कधी खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणतात. हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खातं नाही," असंही डॉ. अनिल बोंडे म्हणाले होते.
5. महात्मा गांधींची महविकास आघाडीकडून दररोज हत्या
"नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या एक वेळा केली होती, परंतु ही महाविकास आघाडी त्यांची दररोज हत्या करीत आहे," असं म्हणत भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
तेव्हा वरुडमध्ये नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं होतं.6. शरद पवारांचे वाईट दिवस
परिवहन कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यानंतर पवार जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचं काय, असं बोंडे म्हणाले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.
ते म्हणाले होते की "शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे की, या राज्यात जेव्हा माझीच सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करण्यात यावी."
बोंडे हे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करताना दिसून येतात. कोणी हनुमान चालीसा म्हणत असेल तर उद्धव ठाकरेंना आक्षेप का, असं म्हणत बोंडेनी राणा दाम्पत्याची पाठराखण केली होती.
केतकी चितळे प्रकरणावर अनिल बोंडे यांनी दोघांवरही टीका केली.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते, "केतकी चितळे ही चुकली आहे. वयोवृद्ध माणसाला असं बोलू नये. पण शरद पवारही तर चुकले. केतकी चितळेला शरद पवारांचं राजकारण कळत नाही. शरद पवारांना हिंदू धर्मात उभी फूट पाडायची आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध सर्व समाजाला पेटवायचं. कुटिल कारस्थान शरद पवार करत आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)