आर्यन खान ड्रग तपासात समीर वानखेडेंनी केल्या या 7 चुका

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने क्लिनचीट दिली. सबळ पुराव्यांअभावी NCBने आर्यन खानच्या विरोधात कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं नाही.

तर, आपल्या इंटर्नल रिपोर्टमध्ये, "आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा तपास अधिकाऱ्यांचा हेतू होता असं दिसून येतंय," असं NCB ने म्हटलंय.

NCBचे उपमहासंचालक संजय सिंह दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या जबाबात चरस आर्यनसाठी नसल्याचं स्पष्ट झालं होतं. आर्यनने ड्रग्ज आणू नको असंही त्याला सांगितलं होतं. त्यामुळे पहिल्यापासूनच हे स्पष्ट होतं की ड्रग्ज आर्यनसाठी नव्हतं." संजय सिंह यांनीच समीर वानखेडेंवर आरोप झाल्यानंतर आर्यन खान प्रकरणाचा तपास केला होता.

दुसरीकडे, आर्यन खान प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने न केल्यामुळे केंद्राने समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश दिलेत. NCB ने त्यांच्या रिपोर्टमध्ये तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढलेत.

समीर वानखेडे यांच्याकडून तपासात काय चूका झाल्या?

आर्यन खानला समीर वानखेडेंच्या टीमने 2 ऑक्टोर 2021 ला मुंबईत अटक केली होती. कॉर्डिलिया क्रूजवर जात असतानाच टर्मिनलवरच आर्यनला ताब्यात येण्यात आलं.

या कारवाईनंतर समीर वानखेडे आणि एनसीबी अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप झाले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी NCBचे उपमहासंचालक संजय सिंह यांना देण्यात आली.

आर्यन खानला क्लिनचीट दिल्यानंतर पत्रकारांनी NCB चे महासंचालक एस. एन. प्रधान यांना समीर वानखेडे यांच्या तपासाबाबत प्रश्न विचारले. ते म्हणाले, "NCBच्या मुंबई युनिटकडून काही तपासात अनियमितता झाल्या होत्या. त्यामुळे तपास स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीमला देण्यात आला."

NCBने आपल्या इंटर्नल रिपोर्टमध्ये समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणी तपासात काय चुका राहिल्या याबाबत माहिती दिलीये.

  • आर्यन खानचा फोन अवैध पद्धतीने उघडण्यात आला. यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही.
  • जप्त करण्यात आलेले वॉट्सअॅप चॅट या प्रकरणाशी संबंधित नव्हते. तरी, साक्षीदार आणि आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. वॉट्सअॅप चॅटला प्राथमिक पुरावा म्हणून धरण्यात आलं.
  • यावरून असं दिसून येतंय की आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा तपास अधिकाऱ्यांचा हेतू होता.
  • आर्यन खानची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही.
  • अरबाज मर्चंटने जबाबात स्पष्ट सांगितलं की ड्रग्ज आर्यनसाठी नव्हतं. आर्यनने ड्रग्ज आणू नको, असंही अरबाजने जबाबात सांगितलं.
  • अरबाजने कोणत्याही जबाबात त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आर्यनसाठी होते, असं सांगितलं नव्हतं. आर्यन ड्रग्ज खरेदीमध्ये असल्याचं त्याने जबाबत म्हटलेलं नाही.
  • या प्रकरणाचा साक्षीदार प्रभाकर साईलने जबाब दिला की, किरण गोसावीने त्याला कोऱ्या कागदांवर सही करण्यात सांगितलं. त्याने ड्रग्ज जप्त करताना पाहिलं नाही.

आर्यन तपास प्रकरणी तपास अधिकाऱ्यांवर काही कारवाई होईल? या प्रश्नाचं उत्तर देताना NCB चे महासंचालक पुढे म्हणाले, "SIT च्या तपासात अनेक अनियमितता पुढे आल्या. त्यावरून योग्य कारवाई केली जाईल."

समीर वानखेडेंच्या तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी काय म्हणतात?

आर्यनकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हतं. मग त्याला अटक का करण्यात आली? असा सवाल उपस्थित झाला. पण, आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा सदस्य असल्याचा दावा NCBने कोर्टात केला. यासाठी वॉट्सअॅप चॅटचा आधार घेण्यात आला. ड्रग्ज रॅकेटची चौकशी करण्यासाठी आर्यन खानची एनसीबी कोठडी मागण्यात आली.

NCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आज तकशी बोलताना उपमहासंचालक संजय सिंह म्हणाले, "आर्यन खानचा फोन उघडताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. आर्यनच्या फोनमधून जप्त वॉट्सअॅप चॅटचा या प्रकरणाशी संबध नव्हता."

आर्यन खानला अटक करताना त्याच्यावर ड्रग्जचं सेवन आणि खरेदी-विक्रीचा आरोप करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आरोपात तथ्य नसल्याचं आढळून आलं.

पत्रकारांशी बोलताना उपमहासंचालक संजय सिंह यांनी पुढे सांगितलं, "ड्रग्जचं सेवन केलंय का हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय तपासणीची गरज असते. आर्यन खानची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही." त्यामुळे आर्यन खानविरोधात तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणात खंडणीचे आरोप झाले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी एनसीबीच्या व्हिजलेंस विभागाला देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी पुढे सांगतात, NCB अधिकाऱ्यांकडून राहिलेल्या चुकांची माहिती व्हिजलेंस विभागाला दिली जाईल.

तर एनसीबीचे महासंचालक म्हणाले, SIT ने रिपोर्टमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. यात काही गंभीर मुद्दे आहेत. याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल.

समीर वानखेडेंचं काय होणार?

आर्यन खान प्रकरणी तपासात अनियमितता असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारने समीर वानखेडे यांच्यावर योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्याकाही काळात त्यांच्यावर कारवाई होणार हे जवळपास निश्चित झालंय.

डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर समीर वानखेडेंची NCB मधून बदली करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने त्यांच्या पुर्ननियुक्तीला विरोध केला होता. समीर वानखेडे यांना पुन्हा महसूल सेवेत पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)