जेव्हा कुतुबमिनारात 45 मुलं चेंगरून मरण पावली...

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

दिल्लीच्या आसमंतात ताठ मानेने उभा असणारा 240 फूट उंचीचा कुतुबमिनार. हा मिनार म्हणजे राजधानी दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित आणि आश्चर्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या स्मारकांपैकी एक असं स्मारक.

या स्मारकाच्या आसपासच्या परिसरात असणारी मंदिर जी अनेक शतकांपूर्वी उद्धवस्त करण्यात आली होती ती आता नव्याने बांधायची की नाही यासंबंधी न्यायालय निर्णय घेणार आहे.

जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला हा कुतुबमिनार अफगाण मिनारांपासून प्रेरित असलेल्या विजयाची निशाणी आहे.

दिल्लीतील हिंदू शासकांना पराभूत केल्यानंतर दिल्लीचा पहिला सुलतान, कुतुबुद्दीन ऐबक याने 1192 मध्ये हा कुतुबमिनार उभारला. लाल वालुकामय दगडातील हे स्मारक भारताच्या मुस्लिम राजवटीत बांधण्यात आलेली एक प्राचीन वास्तू आहे. मुस्लिम राजवटीतील तीन राज्यकर्त्यांनी यावर मजले चढवून या मिनाराचं नुतनीकरण केलं. हा मिनार पाच मजली असून याला 379 पायऱ्या आहेत.

इतिहासकार विल्यम डॅलरीम्पल यांनी एकेठिकाणी नमूद केलंय की,

"अरवली टेकड्यांवरील पठारावर (दिल्लीत) विस्तारलेल्या दुर्बिणीच्या लेन्ससारखा उभार असणारा कुतुबमिनार टॉवर" म्हणजे "अभिमान आणि विजयी आगमनाचं" प्रतीक असल्यासारखा वाटतो.

या मिनाराच्या तटबंदीच्या आसपासच्या परिसराला ही एक इतिहास आहे. या मिनाराच्या आसपासच्या परिसरात 27 हिंदू आणि जैन मंदिरं होती. ही मंदिर उद्ध्वस्त करून त्याच्या भग्नावशेषांवर दिल्लीची पहिली मशीद बांधण्यात आली.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे वरिष्ठ अधिकारी जी.ए. पेज यांच्या स्मारकावरील 1926 च्या नोंदीनुसार, मशिदीला सामावून घेण्यासाठी यापैकी एका मंदिराच्या चौथऱ्याचा भाग राखून ठेऊन मशिदीचा विस्तार करण्यात आला.

या कुतुबमिनार परिसरात मिनार सोडून इतर ही स्मारकं आहेत. इथे 1600 वर्षे जुना 20 फूट उंचीचा लोखंडी स्तंभ आहे. हा स्तंभ ऊन वारा पाऊस झेलत कित्येक शतकं उभा आहे. तिथंच पाच कमानी सुलतानाची कबर आहे. इथल्या इमारती या हिंदू आणि मुस्लिम आकृतिबंधांतील आहेत. पेज आपल्या नोंदीत म्हणतात की, "प्राचीन आणि लक्षवेधी" अशा दोन्ही दृष्टीकोनातून बघायला गेलं तर या परिसरात दिल्लीतील सर्वात उल्लेखनीय ऐतिहासिक अवशेषांचा समावेश आहे.

हा मिनार उभा केल्यानंतर जवळपास 800 वर्षांहून अधिकचा कालखंड लोटलाय. पण आता इथल्या 27 मंदिरांचा जीर्णोद्धार केलाच पाहिजे अशा याचिका न्यायालयात दाखल होतं आहेत.

नोव्हेंबरमध्ये मंदिराच्या पुनर्निर्माणासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती. पण दिवाणी न्यायालयाने ही याचिका फेटाळत म्हटलं की, भारतावर आजवर अनेक राजवंशांनी राज्य केलंय. आणि भूतकाळात घडलेल्या चुकांमुळे आपण "आपली वर्तमान आणि भविष्यातील शांतता बिघडवू शकतं नाही."

याचिकाकर्त्याने दिवाणी न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. "मशिदीच्या खूप आधी तिथं एक मंदिर अस्तित्वात होतं. मग आता त्याचा जीर्णोद्धार का होऊ शकत नाही?" असं हरी शंकर जैन विचारतात. त्यांना वाटतं की आजही त्या परिसरात हिंदू देवता आहेत.

परिसरात असणारी स्मारकं कायद्याने संरक्षित असण्यावर पुरातत्वशास्त्रज्ञ ठाम आहेत. ते म्हणतात की, या कायद्यांन्वये अशा वास्तूंवर हक्क सांगता येत नाही. पण वाराणसी आणि मथुरा या शहरांमधील हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करून त्याच्या अवशेषांवर बांधलेल्या मशिदींवरून ही असेच वाद निर्माण होत आहेत.

12 व्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लिम राज्यकर्त्यांनी, तर किमान 7 व्या शतकापासून हिंदू राज्यकर्त्यांनी आपल्या शत्रूंनी ज्या मंदिरांना संरक्षण दिलंय ती मंदिरे लुटली. त्यांची पुनर्रचना केली किंवा ती उद्धवस्त केल्याचं अनेक इतिहासकार सांगतात. "त्या काळात मंदिरांना राजकीय महत्व होतं. तत्कालीन शासक मोठ्यातलं मोठं धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करून आपला राजकीय अधिकार आणि राजकीय सामर्थ्यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे सर्वचं मंदिरे नष्ट झाली असं म्हणता येणार नाही." असं इतिहासकार असलेल्या राणा सफवी सांगतात.

कुतुबमिनार उभारण्यामागे नेमकं काय कारण होतं ? या प्रश्नावर सफवी सांगतात की, एक कारण म्हणजे मुएझिन आपल्या विश्वासू लोकांना नमाज पडण्यासाठी बोलावेल अशा मशिदीचा हा मिनार असावा. पुढे त्या सांगतात त्याप्रमाणे, शत्रूच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी किंवा लष्करी टेहळणी करण्यासाठी या मिनाराचा बुरूज म्हणून वापर करणे हेसुद्धा एक संभाव्य कारण असू शकतं. पण सर्वात महत्वाचं काय असेल तर तो एक विजयस्तंभ होता. जो गझनीच्या मिनाराच्या प्रभावातून बांधण्यात आला होता.

कुतुबमिनारावर आजवर दोनदा वीज कोसळली आहे. दुसऱ्यांदा जेव्हा वीज कोसळली तेव्हा यात चौथ्या मजल्याचं नुकसान झालं. म्हणून तेव्हाच्या मुस्लीम राजवटीतील एका सुलतानाने मूळ वाळूचा दगड बदलून तिथं संगमरवरी बांधकाम केलं. यात त्याने दोन मजले बांधले. आणि त्यावर एक कपोला चढवला. या कपोलाची उंची 12 फुटाने वाढली. पण नंतर आलेल्या भूकंपात हा कपोला पडून गेला.

(भूकंपाच्या धक्क्यातून हा मिनार आतापर्यंत दोनदा वाचला आहे.)

आज, कुतुबमिनार ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून दिल्लीचं लॅन्डमार्क आहे. या स्मारकाशी दिल्लीच्या कित्येक वर्षांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत.

सफवी सांगतात, त्यांनी 1977 मध्ये कुतुबमिनारला पहिली भेट दिली. "मी पहिल्या मजल्यावर गेले, आजूबाजूचा सुंदर परिसर पाहिला. आम्ही कुतुबमिनाराच्या पायऱ्या चढत असताना माझ्या मोठ्या बहिणीने 1960 च्या दशकातील तिच्या मिनाराच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या."

कुतुबमिनार म्हणजे सहलीसाठी असलेलं प्रसिद्ध ठिकाण. पण 1981 मध्ये एक दुर्घटना घडली. मिनाराच्या अरुंद पायऱ्यांवरील चेंगराचेंगरीत 45 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्यानंतर पर्यटकांसाठी मिनार बंद करण्यात आला.

हे स्मारक उच्चभ्रू परिसरात स्थित आहे. त्या परिसरात मोठमोठे रेस्टॉरंट, अपस्केल बुटीक आहेत. जर तुम्ही या परिसरातील रेस्टॉरंट आणि बारच्या इन्स्टाग्रामवरच्या जाहिराती पहिल्या तर त्यात तुम्हाला

मिनारचा "किलर व्ह्यू" असलेले रूफटॉप बार, लाउंज आणि रेस्टॉरंट्स" उल्लेख आढळतील. एका रेस्टॉरंट्च्या इंस्टा हँडलने मिनाराच्या व्ह्यूला "क्रेझीसेक्सी" म्हटल्याचं दिसेल.

म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश, आज रस्त्यापासून ते अगदी कोर्टरूमपर्यंत मिनारावरून जो काही वाद सुरू आहे, त्या गोंधळापासून हे ठिकाण अनभिज्ञ आहे. त्यांचा आणि या वादाचा दूर पर्यंत संबंध नाही. उजव्या विचारसरणीच्या हिंदू गटांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्मारकाच्या बाहेर निदर्शने आणि प्रार्थना केली होती. त्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

याचिकाकर्ते जैन यांनी मागच्या आठवड्यात न्यायालयात जो युक्तिवादात झाला त्यात म्हटलं आहे की, "उद्धवस्त केल्यामुळे मंदिराचं चारित्र्य, पावित्र्य, दैवत नष्ट होत नाही." त्यांना कुतुबमिनार परिसरात पूजा करण्याचा संवैधानिक अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावर न्यायाधीश विचारात गढून गेले आणि शेवटी म्हणाले : "गेली 800 वर्षे देवता पूजेशिवाय जिवंत आहेत ना मग त्यांना तसंच जगू द्या."

काही आठवड्यातचं या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)