चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका, 'आरक्षण मिळत नसेल तर, घरी जा आणि स्वयंपाक करा'

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. आरक्षण मिळत नसेल तर, घरी जा आणि स्वयंपाक करा - चंद्रकांत पाटील

"ओबीसी आरक्षण मिळत नसेल तर राजकारणात कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा," अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

"ओबीसी आरक्षण संदर्भात मध्य प्रदेशने दोन दिवसांत असं काय केलं माहीत नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितलं नाही," असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं.

"तुम्ही खासदार आहात, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची ते कळत नाही? आता तुमची घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

यानंतर सुप्रिय सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी या भांडणात उडी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट लिहिलीय.

त्यात ते म्हणतात, "महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सुप्रियांबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं की हे स्त्रीद्वेषी आहेत. जिथं शक्य होईल तिथं महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातल्या इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे. चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय." ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

या प्रकरणात नंतर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरणही दिलं. "कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, सुप्रियाताईंबद्दल मला आदर आहे. सदानंदजी तुमच्या पत्नीचा किंवा अन्य कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

2. जातीनिहाय जनगणनेने अस्वस्थता निर्माण झाली तरी चालेल - शरद पवार

"जातीनिहाय जनगणनेने अस्वस्थता निर्माण होईल, असं कुणला वाटलं तरी चालेल. पण ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही," अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे.

जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्यांना हा एक इशारा मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आयोजित राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात ते बोलत होते.

"काही लोक प्रश्न उपस्थित करतात की ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? त्यासाठी काय करायचं, एवढी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंकाही व्यक्त करतात. मला आनंद आहे की या परिषदेत सर्वांनी केंद्र सरकारने ओबीसींची जातीय जनगणना करावी असा ठराव मान्य केला. एकदा करून टाकुयात, एकदा कळू द्या देशाला की नक्की ओबीसींची संख्या काय आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करावी," असं पवार म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. हनुमान चालिसावरून जीवे मारण्याची धमकी, नवनीत राणांची दिल्ली पोलिसांत तक्रार

अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

हनुमान चालीसाचे जर कुठेही वाचन केलं तर तिथं येऊन जीवे मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तींकडून देण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी या संदर्भात दिल्लीतील पोलीस चौकीत तक्रार दिली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्याने राणा दाम्पत्याला कोठडीत जावे लागले.

दोन दिवसात तब्बल 11 वेळा अज्ञात व्यक्तीकडून फोन येत असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मी या पत्रामुळे घाबरले आहे.

मी मानसिकदृष्ट्या खचले असून घाबरले आहे. या पत्रामुळे माझ्या घरात देखील भीतीचे वातावरण आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की, या धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी. जेणेकरून भविष्यात तो ही चूक पुन्हा करणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.

4. खंजिराची भाषा करताना सांभाळून बोला - संजय राऊत

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने पाठिंबा देण्यास नकार दिला. यावरून मराठा संघटना शिवसेनेवर नाराज झाल्या आहेत.

"शिवसेनेने संभाजीराजेंच्या पाठीत खुपसला, अशी टीका मराठा संघटना करत आहेत. याच संघटनांच्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

'खंजिराची भाषा नको, बोलताना जरा सांभाळून बोला. आम्ही आमच्या वाटणीची जागा छत्रपतींना देऊ केली होती, आणखी काय करायला हवं होतं?' असा सवाल राऊत यांनी मराठा संघटनांना केला आहे.

"आम्ही स्वत: शिवसेनेची एक जागा जी जागा जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, त्या जागेवर उमेदवार म्हणून छत्रपतींना संधी द्यायला तयार होतो. छत्रपतींनी ती संधी घ्यायला हवी होती.

"संभाजीराजेंनी याआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांनाही राजकीय पक्षांची मजबुरी काय असते ते माहिती आहे. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला अशी भाषा कुणी करु नये," असं संजय राऊत म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

5. महिला लढाऊ विमानचालक कॅप्टन अभिलाषा बराक यांचा लष्कराकडून सन्मान

भारताने तीन वर्षांपूर्वी संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या तीन वर्षांनंतर कॅप्टन अभिलाषा बराक बुधवारी लष्कराच्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनल्या. त्यांचा लष्कराकडून सन्मान करण्यात आला आहे.

बराक यांना सप्टेंबर 2018 मध्ये आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्समध्ये नियुक्त करण्यात आलं होतं.

नाशिक येथील प्रशिक्षण शाळेत एका समारंभाच्या वेळी विमान वाहतूक महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते 36 वैमानिकांसह त्यांना 'विंग्स' या चिन्हाने सन्मानित करण्यात आलं आहे, असं लष्कराने सांगितलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)