राज ठाकरेंचं एका महिन्यात दुसऱ्यांदा ऑपरेशन, पायाला झालेली दुखापत नेमकी काय?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हिपच्या ऑपरेशनचं कारण सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला.

कमरेला हात लावत राज म्हणाले, "मी हिप बोनची शस्त्रक्रिया करणार आहे." पण, तब्येतीचं कारण देत अयोध्या दौरा स्थगित केल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान हिपची कोणती शस्त्रक्रिया राज ठाकरे करणार आहेत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

एप्रिलमध्ये मुंबईच्या लीलावती रुग्णालयात राज यांच्या पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर एका महिन्यातच राज ठाकरे दुसरं ऑपरेशन करणार आहेत.

राज ठाकरेंच्या पायाला नेमकी दुखापत काय झालीये? हिप बोन सर्जरी म्हणजे काय? याबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

'विटलो आणि म्हटलं एकदाचं ऑपरेशन करून घ्यावं'

1 जूनला राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पायाचं दुखणं सुरु आहे, त्यामुळे कमरेला थोडा त्रास होतो, असंही राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हणाले.

कार्यकर्ता मेळाव्याआधी राज दोन दिवस पुण्यात गेले होते. पण पायाच्या दुखण्यामुळे दौरा अर्धवट सोडून ते मुंबईला परतले. मुंबईत येऊन त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली होती. पण दुखणं जास्त वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

रविवारी मुंबईत बेरिअॅट्रीक सर्जन डॉ. संजय बोरुडेंच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी त्यांच्या दुखापतीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "गेल्या वर्ष दीडवर्षात मला पायामुळे आणि हातामुळे व्यायाम करता आलेला नाही. त्यामुळे जरा वजन वाढलंय."

पायाच्या दुखापतीबाबत पुढे बोलताना राज ठाकरे सांगतात, "खरंतर, मी बॅडमिंटन, क्रिकेट आणि टेनिस खेळणारा. पण, सद्यस्थितीत मला कोणताही व्यायाम करता येत नाहीये. खेळ खेळता येत नाहीये.

राज यांच्या पायाचं दुखणं अधिक बळावत गेल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्याचसोबतच अयोध्या दौऱ्याला न जाण्याची सूचनाही केली होती.

"या परिस्थितीला मी विटलो आणि म्हटलं एकदाचं ऑपरेशन करून घ्यावं. या शस्त्रक्रियेनंतर मी धावणार अशातला भाग नाही," राज पुढे म्हणाले. "शस्त्रक्रियेनंतर सर्व सुरळीत होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे."

एप्रिलमध्ये झालं होतं कमरेचं ऑपरेशन

गेल्या वर्षी (2021) मार्च महिन्यात राज ठाकरे टेनिस खेळताना पडले होते. त्यानंतर त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतरच त्यांना पायाचं आणि कमरेचं दुखणं सुरू झालं.

हे दुखणं वाढत गेल्यामुळे राज ठाकरे एप्रिल 2022 मध्ये मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. कंबरदुखीचा त्रास असल्याने त्यांचं छोटं ऑपरेशनही करण्यात आलं होतं.

हिप बोन दुखण्याची प्रमुख कारणं काय?

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, हिप बोन (Hip Bone) म्हणजे कमरेतील मुख्य हाड. हिप हा बॉल अॅड सॉकेट (Ball And Socket) प्रकारचा सांधा आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिपमुळे आपल्याला पाय पुढे, मागे, दोन्ही बाजूला आणि फिरवता येतो.

हिप चांगल्या स्थितीत असताना बॉल आणि सॉकेटवरील कार्टिलेजमुळे (Soft Tissue) पायाची हालचाल योग्य किंवा सहज होण्यास मदत होते.

तज्ज्ञ हिप दुखण्याची प्रमुख कारणं सांगतात,

1. संधिवात

हा हिप दुखण्याचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. संधिवातात हिप जॉइंटला सूज येते. स्नायूंना हाडांशी जोडणाऱ्या भागाची झीज झाल्यामुळे त्रास होतो. संधिवाताचा त्रास असलेल्यांना हालचाल करण्यात खूप अडथळा येतो. ऑस्टिओ आर्थरायटिस (Osteoarthritis) आणि रुमेटॉईड आर्थरायटिस (Rheumatoid Arthritis) संधीवाताचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. प्रदीप भोसले सांगतात, "आर्थरायटिसमध्ये दोन हाडांमधील जागा कमी होते. कार्टिलेजची झीज किंवा हाडांमधील द्रव पदार्थ कमी झाल्याने हाडं एकमेकांवर घासली जातात." यात लोकांना चालण्यास खूप त्रास होतो.

कार्डिलेजची धक्का सहन करण्याची क्षमता (Shock Absorbing) कमी झाल्यामुळे, सांधे सातत्याने एकमेकांवर घासल्यामुळे किंवा घर्षणामुळे कार्टिलेजला सूज येते किंवा त्यांची ताठरता वाढते.

2. हिपला झालेली दुखापत किंवा फ्रॅक्चर

वय वाढल्यामुळे हाडं कमकुवत होतात. एखाद्या वेळी पडल्यामुळे हाडांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

3. बुरसायटीस (Bursitis)

हाडं आणि स्नायूंमध्ये हा द्रव पदार्थ असतो. याला इजा झाल्यामुळे दुखणं खूप वाढतं.

4. स्नायूंवर पडणारा ताण किंवा दुखापत

सततच्या हालचालीमुळे हिपला सपोर्ट करणारे स्नायू आणि लिगामेंट्सवर ताण पडतो. यांना सूज आल्यामुळे दुखणं वाढतं ज्यामुळे हिप सहज आणि योग्य पद्धतीने कार्य करत नाहीत.

5. अवास्कुलर नेक्रोसिस (Avascular Necrosis)

यामध्ये हिप बोनला (हाड) होणारा रक्त पुरवठा कमी होतो. ज्यामुळे हाडातील टिश्यू किंवा पेशी मृत होतात. हा आजार प्रामुख्याने हिपला होतो. स्टीरॉईडचा जास्त डोस, फ्रॅक्चर किंवा इतर कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गौरेश पालेकर सांगतात, "या आजारात विविध कारणांमुळे हीपच्या सांध्याचा आकार बदलतो. कोरोनाकाळात रुग्णांना मोठ्या प्रमाणात स्टिरॉईड देण्यात आले. स्टिरॉईडच्या भरमसाठ वापरामुळे अवास्कुलर नेक्रोसिसचं प्रमाण प्रचंड वाढलंय."

(सोर्स- WebMD)

हिप दुखण्याची सामान्य लक्षणं काय?

रुग्णाला नक्की कोणता त्रास होतोय. या परिस्थितीवरून हिपचं दुखणं काय आहे याबाबत डॉक्टर आजाराचं निदान करतात.

मांडी, हिपच्या सांध्यात, हिप सांध्याच्या बाहेर, नितंब याठिकाणी दुखत असेल तर हिपचं दुखणं असण्याची शक्यता असते.

डॉ. भोसले सांगतात, "सांध्यांची झीज झाल्यामुळे होणारा त्रास वाढल्याने लोकांना हालचाल करता येत नाही आणि रोजची कामं करताना अडथळे निर्माण होतात."

हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया काय असते?

अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिप बोन शस्त्रक्रिया प्रकारात सामान्यात: हिप रिप्लेसमेंट शस्ज्ञक्रियेचं प्रमाण जास्त आहे. तर काहीवेळा हिपमध्ये ट्युमर असल्यानेही शस्त्रक्रिया करावी लागते. संधीवात आणि फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांची हिप रिप्लेसमेंट करावी लागते.

पूर्ण हिप रिप्लेसमेंट, काही प्रमाणात (Partial) हिप रिप्लेसमेंट आणि स्क्रूच्या मदतीने करण्यात येणारी शस्त्रक्रिया, असे याचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

हिप रिप्लेसटमेंटमध्ये नैसर्गितरित्या शरीरात असलेली हिप बदलण्यात येते. त्याठिकाणी धातू, सिरॅमिक आणि चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकचा पार्ट वापरला जातो. रुग्ण दुसऱ्या दिवशी चालू शकतो. मात्र रुग्णाला पूर्णत: बरं होण्यास महिनाभर लागतो.

रुग्णाला कोणत्या प्रकारचा त्रास आहे त्याप्रमाणे त्याला हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ काही रुग्णांना पाय दुमडून बसायचं असतं तर काहींना व्यायाम करायचा असतो. डॉ. गौरेश पालेकर पुढे म्हणाले, "जॉगिंग किंवा टेनिस खेळणं या हाय इम्पॅक्ट गोष्टी आहेत. अशांना विशिष्ठ प्रकारच्या हीप रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो."

हिप रिप्लेसमेंट करण्याची पाच प्रमुख कारणं तज्ज्ञ सांगतात,

  • उपचारांनंतरही दुखणं बरं होत नसेल तर.
  • चालताना तीव्र वेदना होणं. वॉकर किंवा काठीच्या मदतीने चालताना देखील त्रास होणे.
  • झोप न येणं.
  • जिने चढणं आणि उतरण्यास अडथळा येणं.
  • बसल्यानंतर उठताना होणारा त्रास.

पण या शस्त्रक्रियेचे काही धोकेदेखील आहेत.

  • शस्त्रक्रियेनंतर पायात रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात.
  • ऑपरेशन झालेल्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता.
  • शस्त्रक्रिये दरम्यान हिपच्या सुस्थितीत असलेल्या भागाला होणारी इजा.
  • काहीवेळा हिप जॉइंटमधील नवीन बॉल सॉकेटच्या बाहेर येऊ शकतो.

हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया खर्चिक आहे. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाच्या परिस्थितीनुसार रिकव्हर होण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो, असं तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)