उम्रान मलिक, अर्शदीप सिंगला टीम इंडियात संधी; राहुलकडे नेतृत्व

फोटो स्रोत, FACEBOOK/SUNRISERS HYDERABAD
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या उम्रान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना ट्वेन्टी20 संघात स्थान मिळालं आहे.
सुसाट वेगाने गोलंदाजी करणारा उम्रान आणि हाणामारीच्या षटकांमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप यांची निवडसमितीने राष्ट्रीय संघासाठी निवड केली आहे. लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएल हंगामात धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह जसप्रीत बुमराहला ट्वेन्टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
उम्रानने यंदाच्या हंगामात 13 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपने 10 विकेट्स घेतल्या आहेत. हाणामारीच्या षटकांमध्ये अर्शदीप हाच कर्णधार मयांक अगरवालसाठी हुकूमी एक्का राहिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी20 मालिका आणि इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी याकरता भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उम्रान काश्मीरसाठी खेळतो तर अर्शदीप पंजाबचं प्रतिनिधित्व करतो. यंदाच्या आयपीएल हंगामात उम्रानने प्रचंड वेग आणि अचूकतेने गोलंदाजी करत सगळ्यांना प्रभावित केलं. सनरायझर्स हैदराबाद संघाने उम्रानला रिटेन केलं होतं. संघव्यवस्थापनाचा विश्वास उम्रानने सार्थ ठरवला. यंदाच्या हंगामात उम्रानने 157 ताशी किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघानेही अर्शदीपला लिलावाआधी रिटेन केलं होतं. अर्शदीपने सातत्याने शिस्तबद्ध गोलंदाजी करत निवडसमितीचा विश्वास जिंकला.
आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी20 मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होईल.
भारतीय कॅम्पमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने भारतीय संघाचा इंग्लंड दौरा अर्धवट राहिला होता. चार कसोटी सामने झाले असून, एकमेव कसोटी बाकी आहे. ही कसोटी जिंकत मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे. कसोटी संघात प्रसिध कृष्णाला स्थान मिळालं आहे.

फोटो स्रोत, BCCI/IPL
यंदाच्या हंगामात सातत्याने धावा करणाऱ्या अनुभवी दिनेश कार्तिकचं संघात पुनरागमन झालं आहे. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव अर्थात कुलचा ही जोडी परतली आहे. अक्षर पटेल, रवी बिश्नोई यांच्यावरही निवडसमितीने विश्वास कायम राखला आहे. प्रदीर्घ काळानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याचं संघात पुनरागमन झालं आहे. पण हार्दिक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळणार का अष्टपैलू म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हर्षल पटेल आणि अवेश खान यांच्यावर निवडसमितीने विश्वास दाखवला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची ट्वेन्टी20 मालिका 9 ते 19 जून या कालावधीत होत आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 1 जुलै रोजी सुरू होत आहे.
ट्वेन्टी20 मालिकेसाठी संघ- लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग आणि उम्रान मलिक.
एकमेव कसोटीसाठी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, के.एस.भरत, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























