उम्रान मलिक : जम्मू-काश्मीरच्या फळ विक्रेत्याच्या मुलगा IPLचा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज कसा बनला?

फोटो स्रोत, Facebook/SunRisers Hyderabad
- Author, मोहित कंधारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, जम्मूहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू उमरान मलिक याच्या गोलंदाजीचा एक वेगळाच फॅन क्लब सध्या तयार झाला आहे. जेमतेम 23 वर्षे वयाच्या या खेळाडूने भल्याभल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवल्याचं दिसून येत आहे.
गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या हार्दिक पांड्यालाही उमरान मलिकच्या वेगाचा अंदाज आलेला नाही. उमरानच्या गोलंदाजीचा मार खाण्याची वेळ त्याच्यावरही आली होती, हे विशेष.
दोन दिवसांपूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये सामना झाला. अत्यंत चुरशीच्या या गुजरातने विजय मिळवला. पण चर्चा झाली ती उमरान मलिकच्या गोलंदाजीची.
या सामन्यात उमरान मलिकने 4 षटकांत 25 धावा देत 5 विकेट घेतले. त्यापैकी 4 विकेट त्याने क्लिन बोल्ड करून म्हणजेच त्रिफळा उडवून घेतले होते हे विशेष.
केवळ 22 वर्षे वय असलेल्या उमरान मलिकने आपल्या पहिल्या सामन्यापासूनच आपल्या कामगिरीची चुणूक दाखवायला सुरू केलं. पदार्पणाच्या सामन्यापासूनच त्याने 150 किमी प्रतितासच्या वर वेगाने गोलंदाजी केली आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मलिकने 153.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून आयपीएलमधील सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
पण उमरान मलिक नेमका कोण आहे, त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिला, याची माहिती आपण आज घेऊ -
फळ विक्रेत्याचा मुलगा
मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेला उमरान मलिक जम्मू शहरात राहतो. त्याचे वडील अब्दुल रशीद हे शहरातच फळ आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.
उमरान हे अब्दुल रशीद यांचं सर्वात लहान अपत्य. लहानपणापासूनच उमरानला क्रिकेटची प्रचंड आवड होती. दिवसदिवस तो बॅट-बॉल पकडून क्रिकेट खेळत असायचा, असं त्याची आई सीमा मलिक सांगते.

फोटो स्रोत, Ipl/bcci
उमरानची आई सीमा मलिक यांनी बीबीसीशी बोलताना उमरानबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
त्या म्हणतात, "दिवसभर क्रिकेट खेळताना पाहून आम्ही त्याला रागवायचो. तेव्हा तो म्हणायचा, मी कोणतंही चुकीचं काम करत नाहीये. मी फक्त क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट खेळताना त्याला तहान-भूक कशाचीच काळजी नसायची.
प्रथम श्रेणी
जानेवारी 2021 मध्ये उमरान मलिकने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने आपला पहिला टी-20 प्रथम श्रेणी सामना खेळला.

फोटो स्रोत, Twitter
या सामन्यात त्याने 4 षटकांत 24 धावा देऊन 3 गडी बाद केले. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने काश्मीरकडून आपला पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला.
हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात त्याला बळी मिळाला नाही. पण त्याने आपल्या वेगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सनरायझर्स हैदराबादमध्ये निवड कशी झाली?
जम्मूच्या उमरान मलिकच्या कुटुंबीयांनी याची कहाणी बीबीसी हिंदीला सांगितली आहे.

फोटो स्रोत, MOHIT KANDHARI
सनरायझर्स हैदराबाद संघ त्यावेळी एका जखमी वेगवान गोलंदाजासाठी बदली खेळाडू शोधत होता. त्यावेळी उमरान मलिक डेव्हिड वॉर्नरला गोलंदाजी करत असे. त्यालाही उमरानचा वेग आणि अचूक टप्पा यांमुळे सराव करताना त्रास होत होता.
उमरानची ही कामगिरी पाहून हैदराबाद संघाने त्याला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. उमरानला टी. नटराजन याच्या ठिकाणी संघात घेण्यात आलं.
इरफान पठाणकडून प्रशिक्षण
इरफान पठाण जम्मू काश्मीर क्रिकेट संघाचा प्रशिक्षण असताना त्याने उमरान मलिकची क्षमता ओळखली होती. त्याने त्याला प्रशिक्षण देत त्याच्या गोलंदाजीची धार आणखी टोकदार केली.

फोटो स्रोत, Twitter
पठाणच्या संपर्कात येण्यापूर्वी उमरानचे पूर्वीचे प्रशिक्षण रणधीर सिंह मन्हास यांनीही त्याच्यावर प्रचंड मेहनत घेतली होती.
15 व्या वर्षी उमरान क्रिकेट प्रशिक्षण घेण्यासाठी जम्मूच्या क्रिकेट स्टेडियमवर दाखल झाला होता. तिथं आपल्या गोलंदाजीने त्याने सर्वांना चकित केलं.
भारतीय संघात निवडीची प्रतीक्षा
उमरान मलिक हैदराबादच्या संघात सहभागी झाल्यापासून त्याने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदाच्या लिलावात हैदराबाद संघान मलिकला संघात रिटेन केलं होतं. पण अद्याप त्याला भारतीय संघात निवडीची प्रतीक्षा आहे.
सीमा मलिक म्हणतात, "सुरुवातीला त्याला टीव्हीवर पाहिलं, तेव्हा तो नीट खेळेल की नाही, म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं. पण समालोचकांनी त्याचं कौतुक केल्यामुळे मला जरा बरं वाटलं. आज त्याने त्याने आपलं आणि देशाचं नाव केलं, पाहून मी खूप आनंदी आहे. त्याने आणखी पुढे जावं."
पुढे बोलताना त्याचे वडील अब्दुल रशीद म्हणाले, "उमरान आता आणखी मेहनत घेईल. भारतीय संघात निवड होण्यासाठी तो प्रयत्न करत राहील. त्याने भारताची कीर्ती सर्वदूर पसरवावी, असंच आम्हाला वाटतं."

फोटो स्रोत, MOHIT KANDHARI
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जम्मू काश्मीर क्रिकेट संघाचं कामकाज पाहण्यासाठी एक तीन-सदस्यीय समिती बनवली आहे.
या समितीचे सदस्य मिथुन मन्हास म्हणतात, "जम्मू काश्मीरच्या तरुणांमध्ये क्रिकेटचं प्रेम पाहून राज्यात वेळोवेळी कॅम्प लावले जातात. सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आता फक्त येथील खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड होण्याची प्रतीक्षा आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























