उद्धव ठाकरे: 'आधी भरमसाठ किमती वाढवायच्या, नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. आधी भरमसाठ किमती वाढवायच्या, नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा; मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती सिलेंडरच्या किमतीत घट केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
"आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या, आणि नंतर मात्र त्या नाममात्र कमी करण्याचा देखावा करायचा," अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे
"पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे," अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
त्यामध्ये म्हटलं आहे की, "केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढवला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी कर देखील 18.24 रुपयांनी वाढवला होता आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली."
ते पुढे म्हणाले, "आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यास खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे."
2. केंद्र सरकारचे झेंडाबंधन; घरोघरी राष्ट्रध्वज अभियान
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या स्वातंत्र्यदिनी देशभरातील प्रत्येक घरांवर आठवडाभर राष्ट्रध्वज फडकवून जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
केंद्र सरकारच्या या झेंडा बंधनामुळे देशभरातील सुमारे 10 कोटी घरांवर फडकवण्यासाठी ध्वज तयार करणे, त्याच्या संहितेचे पालन करणे, वापरून झाल्यावर अवमान होणार नाही याची खबरदारी घेणे हे मोठे आव्हान असेल.

फोटो स्रोत, Getty Images
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशातील 10 कोटी घरांवर सात दिवस राष्ट्रध्वज फडकवण्याचे 'घरोघरी राष्ट्रध्वज'(हर घर झेंडम) अभियान राबविण्यात येणार असून राज्यात एक ते सव्वा कोटी घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी राज्य सरकारनेही आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
3. प्रेमास नकार दिल्यानं तरुणीची हत्या
प्रेमाच्या हट्टापायी 20 वर्षीय शरणसिंग सेठी याने सुखप्रीतसिंग कौर ऊर्फ कशिश (18) या सुशिक्षित कुटुंबातील तरुणीची अत्यंत निर्दयीपणे क्रूर हत्या केली. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.
वर्षभरापासून शरणसिंग सातत्याने तिचा पाठलाग करत होता. सुखप्रीतसिंगसह तिच्या कुटुंबाने त्याची वारंवार समजूत घातली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी त्याने पाठलाग न करण्याचे आश्वासनही दिले. मात्र ते पाळले नाही.
शनिवारी (21 मे) सुखप्रीतसिंग मैत्रिणीसह एका कॅफेत गेली. शरणसिंग तिच्यापाठोपाठ गेला व तिला बोलण्यासाठी हट्ट करू लागला. इतकेच नव्हे तर हाताला पकडून तिला कॅफेबाहेर आणले व मोकळ्या प्लॉटवर नेऊन धार्मिक शस्त्र कृपाणने तिच्या गळ्यावर एकापाठोपाठ वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
4. प्रकाश आंबेडकरांना ईडीची नोटीस
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अंमलबजावणी संचालनालयानं नोटीस पाठवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "देशात भाजपनं दडपशाहीचं राजकारण सुरू केलंय. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जातात. भाजपानं देशातमोकळं वातावरण ठेवलं नाहीय. मलाही ईडीची नोटीस दिली होती; पण दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी. मग बघा काय होते."
5. धार्मिक स्थळांवरील भोंगे शाळांना भेट
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरून काढून टाकण्यात आलेले भोंगे शाळांमध्ये शैक्षणिक कार्यासाठी भेट म्हणून देण्यात येत आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
गोरखपूर आणि संगम शहराने आधीच ही प्रक्रिया सुरू केली आहे, तर लखनऊ पुढील आठवड्यापासून या लाऊडस्पीकरचे वितरण सुरू करेल, असं जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी सांगितलं आहे.

गोरखपूरचे जिल्हा दंडाधिकारी विजय किरण आनंद म्हणाले, "शाळा या लाऊडस्पीकरचा वापर शैक्षणिक हेतूंसाठी करू शकतात. जसे की स्थानिक लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना विविध सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांची माहिती देणे आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांची माहिती देणे यासाठी करू शकतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























