देवेंद्र फडणवीस : शरीराचं वजन ते सत्तास्थापन, 'या' 5 मुद्द्यांवरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

फोटो स्रोत, facebook
मुंबईतील मुंबईतील नेस्को सेंटमरध्ये भाजपची सभा झाली. तिथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बीकेसीतल्या भाषणाला सडेतोड उत्तरं दिली.
हिंदुत्त्वासह विविध मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं.
या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी कुठल्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंना उत्तरं दिली, ते पाहूया.
1) शरीराचं वजन
"देवेंद्र फडणवीस बाबरीच्या ढाच्यावर चढले असते तरी ढाचा पडला असता," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या शरीराच्या वजनाची खिल्ली उडवली होती. या खिल्लीला फडणवीसांनी आज उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास आहे. माझं वजन 102 आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो आहे. सामान्य माणसाचा एफएसआय 1 असेल तर माझा एफएसआय 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझा एफएसआय 2.5 आहे. तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही."
2) सकाळचा शपथविधी
सकाळच्या शपथविधीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही फडणवीसांनी उत्तर दिलं.
फडणवीस म्हणाले, "सकाळचा शपथविधी केला. तो यशस्वी झाला नाही, याचा आनंद आहे. पण जरी झाला असता, तरी माझ्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासारखे मंत्री नसते. दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवायच्या ऐवजी त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. वर्क फ्रॉम जेल चाललंय."

फोटो स्रोत, Getty Images
"आमची संपत्ती घेऊन दुसऱ्याशी लग्न केलं. आमच्या नावावर मतं मागितली. आमची संपत्ती घेऊन गेले. ऑफिशियल डायव्होर्स करायचा, तेही नाही," असाही टोमणा फडणवीसांनी मारला.
3) बाबरी मशिदीचा मुद्दा
बाबरी मशिदी पाडकामातल्या सहभागाबाबत देवेंद्र फडणवीसांनी आक्रमकपणे उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं.
फडणवीस म्हणाले, "रामजन्मभूमी आंदोलनात अयोध्येत तुमचा एकही नेता नव्हता म्हणालो तेव्हा तुम्हाला मिरची लागली. मैं अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, तुमको मिरची लगी तो क्या करूँ."
"लाठी-गोली खाएंगे, मंदिर वही बनांयेगे. तुम्ही सहलीला गेले होतात. तेव्हा तर सोडाच. त्याच्या एक वर्ष आधी ज्यावेळी पहिली कारसेवा झाली. कोठारी बंधूंना मारलं तरी ढाच्यावर झेंडा फडकला. तेव्हा देवेंद्र तिथे होता. बदायूच्या तुरुंगात होतो. आम्ही वाटत पाहत राहिलो कोणी शिवसेनेचं येईल. कोणी शिवसेनेचं आलं नाही," असं फडणवीस म्हणाले.
"गोळ्या चालताना पाहिल्या, संघर्ष पाहिला. फाईव्हस्टार राजकारण केलं नाही. जेव्हा आवश्यकता असेल तर पुन्हा कारसेवा करू," असंही फडणवीस म्हणाले.
4) हिंदुत्त्वाचा मुद्दा
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादमधील अकबरुद्दीन ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीला माथा टेकवल्याचं उदाहरण दिलं.

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanvis
फडणवीस म्हणाले, "औरंगजेबासमोर माथा टेकणारा ओवेसीला तुम्ही पाहत राहता. संपूर्ण हिंदुस्तानवर आता हिंदुत्वाचा झेंडा फडकवणार. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे, त्यांनी तलवारी म्यान केल्या आहेत. आम्ही तलवार म्यान केलेल्या नाहीत."
5) 'मुंबई महापालिकेत भगवा फडकेल, पण भाजपचा'
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यालाही फडणवीसांनी उत्तर दिलं.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाची औकाद नाही, असं फडणवीस म्हणाले.
"मुंबई महापालिकेत भगवा फडकेल, पण तो भाजपचा असेल," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"मुंबईमध्ये आम्ही काय काय केलं याची माहिती आशिष शेलारांनी दिली. सीलिंक, ट्रान्सहार्बर प्रकल्प, नवी मुंबईचा प्रकल्प. मुंबईसाठी अनेक गोष्टी केल्या. तुम्ही काय केलं? दारूवर टॅक्स कमी केला, बिल्डरांना सवलती," असंही फडणवीस म्हणाले.
"तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. अनौरस बाप कुठून पैदा झाला माहिती नाही. मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा बाप छत्रपती शिवाजी महाराज," असंही फडणवीस म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























