लग्नाला एक महिना होत नाही तोच तिनं नवऱ्याचा पदराने गळा आवळून केला खून

    • Author, बाला सतीश
    • Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील एका महिलेने लग्नाच्या अवघ्या एका महिन्यानंतर पतीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. श्यामला आणि इतर आरोपींनी त्यांच्या जबाबात गुन्ह्याचा सविस्तर खुलासा केलाय.

श्यामला आणि चंद्रशेखर यांच्या लग्नाला अवघा एक महिना झाला असेल. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हापासून त्यांचं लग्न झालंय तेव्हापासून त्यांच्याकडे सणवार, लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. त्या दोघांना स्वतःसाठी असा वेळच मिळाला नाही. तिचे सासू सासरे, दिर भावजय, वहिनी हे सर्वजण एकाच छताखाली राहतात. घरात आलेली नवी सून सासरची समाधानकारक काळजी घेत असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

सगळे सण आणि लग्नसमारंभ संपता संपता श्यामलाच्या पतीला अन्नातून विषबाधा झाली. त्याला 4 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला डिस्चार्ज मिळणार इतक्यात दुसरा लग्नसोहळा आला. त्या कार्यक्रमात नव्या सुनेला हजर राहणं गरजेचं होतं. या सगळ्या गडबडीतून श्यामलाला तिच्या पतीसोबत घराबाहेर थोडा वेळ घालवायचा होता. त्यामुळे हे जोडपं मोटारसायकलवरून त्यांच्या गावाबाहेरील मंदिराकडे निघालं.

हे जोडपं सिद्धीपेट जिल्ह्यातील चिन्नानिझमपेटातील आपल्या घरापासून दूर असलेल्या अनंतसागरकडे रवाना झाले. त्या ठिकाणाहून ते एका बाजूच्या रस्त्याकडे वळले. तितक्यात त्या रस्त्यावर काही अंतरावर चंद्रशेखर यांनी अचानक ब्रेक दाबला. एका कारमधील 5 तरुणांच्या टोळक्याने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली.

त्यांनी चंद्रशेखरला त्याला मोटारसायकलवरून खाली ओढलं. काय घडतंय हे समजण्याआधीच श्यामलाने तिचा पाय चंद्रशेखरच्या गळ्यावर ठेवला. चंद्रशेखरच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही तो तिचा पाय त्याच्या गळ्यावरून हटवू शकला नाही. तो हलू नये म्हणून त्याचे दोन्ही हात आणि पाय त्या तरुणांनी घट्ट पकडले होते.

गळा दाबूनही चंद्रशेखर जिवंत होता. तुम्हाला जे हवं ते घ्या पण मला जिवंत सोडा अशी विनवणी चंद्रशेखरने त्या लोकांना केली. पण त्या लोकांनी धीर सोडला नाही, त्यांनी हाताने त्याचा गळा आवळायला सुरुवात केली.

त्याची तीव्रताच एवढी होती की चंद्रशेखरच्या गळ्यावर नखांच्या खुणा उमटल्या. तरीही तो मेला नाही. त्यानंतर श्यामलाने तिच्या पदराने त्याचा गळा आवळला आणि त्या तरुणांच्या मदतीने नवऱ्याचा गळा दाबून खून केला.

25 मार्च 2022 रोजी श्यामला आणि चंद्रशेखरचं लग्न झालं होतं. श्यामलाने 28 एप्रिल 2022 रोजी त्याची हत्या केली. श्यामला ही सिद्धीपेट जिल्ह्यातील गुडीकंदुला गावची आहे.

हत्येनंतर ती काय म्हणाली?

मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केल्यानंतर श्यामलाने पतीचा मृतदेह कारमध्ये ठेवला. सिद्धीपेठ भागातून ही कार भाड्याने घेतले होती. तिने पतीचा मृतदेह राजीव महामार्गाच्या बाजूला असलेल्या झाडाखाली नेऊन ठेवला आणि घरी फोन केला.

तिनं आपल्या दिराला फोन करून चंद्रशेखरला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तो विचित्र वागत असल्याचं सांगितलं. तिनं स्वतःच्या माहेरी फोन करून अगदी असंच सांगितलं. पतीचं कुटुंब त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चंद्रशेखरला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवलं होतं. तिथे त्याला मृत घोषित केलं. मृतदेहाचं शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह घरी नेण्याचं बाकी होतं.

चंद्रशेखरच्या कुटुंबीयांनी तोपर्यंत मृतदेहाची सविस्तर तपासणी केली नव्हती. पोलिसांनी काढलेल्या एका फोटोत चंद्रशेखरच्या गळ्यावर नखांच्या खुणा पाहून त्याच्या नातेवाईकांना संशय आला.

त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे अंत्यसंस्कार झाले. तोपर्यंत दोन्ही कुटुंबात संशय बळावला होता. अंत्यसंस्काराच्या दिवशी सासरच्या घरी आलेली श्यामला त्याच दिवशी आपल्या माहेरी निघून गेली.

सिद्धीपेठ येथील दोन शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला. पत्नीनेच खून केल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

श्यामलाचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते का? याबाबत कोणाकडे फारशी माहिती उपलब्ध नव्हती. तिने जणू चंद्रशेखरशी स्वखुशीने लग्न केलं होतं असंच दिसत होतं. लाखो रुपये खर्चून हा विवाह मोठ्या थाटात पार पडला होता. किंबहुना तिने स्वखुशीने लग्नाला संमती दिली होती. मात्र, ती लग्नाला तयार नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

पोलीस तपासात असं ही समोर आलं की, श्यामलाचं तिच्याचं गावात राहणाऱ्या सिवा नावाच्या एका वर्गमित्रावर प्रेम होतं. त्यांची अलीकडेच ओळख झाली असली तरी त्यांच्यातील प्रेम बहरायला लागलं होतं. ते एकमेकांशी सिक्रेट असलेल्या फोन नंबरवरून बोलायचे.

श्यामलाचं लग्न झाल्यानंतर, तिने सिवासोबत मिळून आपल्या पतीपासून लांब जाण्याची योजना आखली. मात्र पळून जाऊन लग्न करण्याचा सिवाचा प्रस्ताव श्यामलाला मान्य नव्हता. ती पळून गेली तरी तिला पुन्हा तिच्या पतीकडे आणलं जाईल अशी भीती तिला वाटत होती. म्हणून तिने त्याला मारण्याची योजना आखली.

श्यामलाच्या योजनेनुसार सिवाने आपल्या मित्रांना चंद्रशेखरला मारण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्याच्या चुलत भावांनी आणि मित्रांनी सुरुवातीला त्याला हे करण्यापासून अडवलं. मात्र सिवाने त्यांना पटवून दिलं. शेवटी ते मित्र तयार झाले आणि चंद्रशेखर त्यांच्या पूर्वनियोजित ठिकाणी पोहोचेल याची खात्री केली. श्यामला तिच्या पतीला घेऊन सिवाने निवडलेल्या ठिकाणी आली. आणि सर्वांनी मिळून त्याची हत्या केली.

श्यामलाने पोलिसांना सांगितलं की, ती विवाहित असूनही त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. शेवटी तो वाट पाहून थकल्यावर त्याने तिच्या संमतीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले. आणि मग तिने चंद्रशेखरला ठार मारण्याचा निर्णय घेतला.

चंद्रशेखरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालाय असं तिला सर्वांना पटवून द्यायचं होतं जेणेकरून तिच्याकडे संशयाची सुई वळणार नाही. आणि जर, पोलीस केस झालीच तर संपूर्ण दोष ती तिच्यावर घेईल, असा शब्द तिने तिच्या मित्रांना दिल्याचं ही उघड झालं.

चंद्रशेखरला तिने पूर्वी उंदीर मारायचं औषध दिलं होतं का?

श्यामलाने चंद्रशेखरच्या जीव घेण्याचा यापूर्वीही प्रयत्न केला असल्याचा संशय चंद्रशेखरच्या भावाला संशय आहे. जेव्हा चंद्रशेखरला अन्नातून विषबाधा झाली होती तेव्हा श्यामलानेच त्याला उंदीर मारायचं औषध घातलं होत असा त्यांचा आरोप आहे. त्यादिवशी सर्वांनी एकच अंडाकरी खाल्ली असताना देखील एकट्या चंद्रशेखरलाच हैदराबादच्या मोठ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.

चंद्रशेखरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी श्यामला लग्नासाठी निघाली. चंद्रशेखरच्या आई-वडिलांना तिच्या वागणुकीचा कधीच संशय आला नसल्याचा पश्चाताप होतोय.

आजच्या तारखेला श्यामला, तिचा मित्र आणि त्यांना हत्येसाठी मदत करणारे इतर असे सर्वजण तुरुंगात आहेत. तर श्यामला ही मुख्य आरोपी आहे. खुनाशी संबंधित सिवावर 1 (A1) आणि इतरांवर 2 (A 2) या आयपीसीच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिस लवकरच आरोपपत्र दाखल करतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)