BBC Marathi वरील मागील आठवड्यातले खास लेख, जे कदाचित तुमच्या नजरेतून सुटले असतील

फोटो स्रोत, ALT BALAJI/TWITTER
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल. बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.
1. मुनव्वर फारुकी 'लॉकअप'च्या पहिल्या सीझनचा विजेता
स्टँड-अप कॉमेडिअन मुन्नवर फारूकी 'लॉकअप' या रिअॅलिटी शो चे पहिले विजेते ठरले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतच्या या कार्यक्रमात मुनव्वर हे सुरुवातीपासूनच आव्हानात्मक स्पर्धक मानले जात होते.
शनिवारी (7 मे) रात्री या कार्यक्रमाचा 'ग्रँड फिनाले' पार पडला. यावेळी कंगना राणावतने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. मुन्नवरसह अंजली अरोरा, पायल रोहतगी, शिवम हे तीन स्पर्धक शेवटच्या फेरीपर्यंत पोहचले.
मुन्नवर फारूकी यांचा 'लॉकअप' हा रिअॅलिटी शो जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
2. 'पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र, कुंकू, जोडवी काढायची गरज नाही'
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्याचं कारण हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात विधवा महिलांना समाजात इतर स्त्रियांप्रमाणे मानसन्मान मिळावा यासाठी हेरवाड गावाने उचलेलं हे पाऊल कौतुकास पात्र आहे.

पतीच्या निधनानंतर महिलांना दिली जाणारी वागणूक म्हणजे विधवा प्रथा आजही सूरू आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं जातं, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पायातील जोडवी, हातातील बांगड्या तसंच अंगावरील दागिने काढले जातात.
पतीच्या निधनानंतर महिलेचं आयुष्य एकाकी करण्याच्या या प्रथेमुळे विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही. कोणत्याही शुभ कार्यात विधवा महिलांना हीन वागणूक दिली जाते. याच प्रथेच्या विरोधात हेरवाड ग्रामस्थांनी आवाज उठवला. हेरवाड गावातील लोकांनी हा समज झुगारून लावत ग्रामसभेत या प्रथेविरोधात ठराव संमत केला.
3. 'असानी' चक्रीवादळासोबत वाहून आलेल्या सोनेरी रथाचं गूढ काय?
सध्या असानी नावाचं वादळ आंध्रच्या किनारपट्टीवर घोंघावत आहे. या वादळाच्या पाण्याबरोबर एक सोनेरी रथ समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला आहे.

फोटो स्रोत, Ani
स्थानिक लोक याला 'राजा मंदिरम' म्हणत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील मच्छिमारांनी सर्वात आधी हा रथ पाहिला.
हा रथ पाहिल्यावर वादळी लाटा येत असूनही लोक तो रथ ओढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या व्हीडिओत ही दृश्यं दिसत आहेत. पण या रथाचं गूढ काय?
4. ताजमहालाच्या त्या 22 खोल्यांबद्दल याचिकेत काय म्हटलं आहे?
अलाहाबाद उच्च न्यायालयात सोमवार 9 मे रोजी एक याचिका दाखल झाली आहे. ताजमहालात बंद करुन ठेवलेल्या 22 खोल्या उघडाव्यात असं या याचिकेत म्हटलं आहे. तसेच या खोल्यांत असलेल्या मूर्ती आणि शिलालेखांचा शोध घेण्यास पुरातत्व विभागाला सांगावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
1631 ते 1653 या 22 वर्षांमध्ये बांधण्यात आल्याचा दावा असत्य असून मूर्खपणाचाही आहे असं यात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA
ही याचिका डॉ. रजनीश सिंह यांनी दाखल केली आहे. ते अयोध्येजवळच्या बहरामऊ येथे राहाणारे आहेत. त्यांनी दंतवैद्यकाचं शिक्षण घेतलं असून ते भाजपाचे अयोध्या जिल्हा समितीचे सदस्य आणि माध्यम संयोजक आहेत.
अर्थात ही याचिका आपण दाखल केली असून याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं ते म्हणत आहेत.
5. कोण आहेत श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे?
श्रीलंकेचे नवे पंतप्रधानपद म्हणून रनिल विक्रमसिंघे यांनी आज शपथ घेतली आहे. विक्रमसिंघे हे श्रीलंकेच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात.
त्यांचा पक्ष युनायटेड नॅशनल पार्टीला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पक्षाला निवडणुकीतून एकही जागा मिळाली नव्हती.
पण त्यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या संसदीय प्रणालीप्रमाणे राष्ट्रीय यादीनुसार एक जागा मिळाली होती. या राखीव जागेमुळेच रनिल विक्रमसिंघे खासदार बनले आणि आता ते श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत.
कोण आहेत रनिल रनिल विक्रमसिंघे? जाणून घ्यायला इथे क्लिक करा.

फोटो स्रोत, Getty Images
2.2 कोटी लोकसंख्येचा श्रीलंका सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पेट्रोल-डिझेलसह दैनंदिन उपयोगी वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























